60 140
Download Bookhungama App

दुष्काळ (ग्रामीण कथासंग्रह) - रेखा बैजल

Description:

काही गावांत तर अगदी पाणी नसतं. आठशे फूट खोल बोअर घेऊन चारशे (४००) वर्षापूर्वीचं पृथ्वीच्या पोटात साठलेलं पाणी काढलं जातं, तेही अपुरं, अशा गावातल्या मुलांची लग्न होत नाही. आपल्या मुलीला पाणी नसणाऱ्या गावात नांदायला कोण पाठवणार?मनोगत

‘है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सुरमें गाते है’ हे काव्यात ऐकताना बरं वाटतं पण जगताना, दुःख भोगणाऱ्याला त्या दुःखाचा दाह कळत असतो. चाळीसच्या वर वर्षं मराठवाड्यात काढली आहेत. इथल्या शेतकऱ्यांचं जगणं बघते आहे. जेव्हा निसर्गच आव्हान म्हणून पुढे उभा राहातो तेव्हा माणूस किती तोकडा पडतो हे दरवर्षी कोरड्या पावसाळ्यात पाहत आले आहे. शेतकऱ्यांची नांगरट होऊन उसासणारी शेतं, तळकाठ दिसणारी विहीर, पोटलीत बांधलेली बियाणं, लग्नाला आलेली पोर आणि खुद्द शेतकरी असावून मान वर करून आकाशाकडे पाहत असतात. त्याचं अख्खं जीवन त्या बियाणाच्या पोटलीत बांधलेलं असतं. बायाबापड्या, पोटुशा पोरी डोक्यावर, कमरेवर घागर घेऊन मैलोन्मैल पाण्यासाठी वणवणतात. पाण्याचा टँकर आला की पाण्यासाठी भांडणं करून एकमेकांना माणसं मारतात, रात्रं रात्रं पाण्याच्या हपशावर पाणी काढतात, दिवसभर लोडशेडिंग असल्यानं रात्री पिकाला पाणी देताना अंधारात साप चावून माणसं मरतात, पोटच्या पोरासारख्या सांभाळलेल्या गुरांना चाऱ्याअभावी चारा छावणीत चार महिने ठेवतात आणि पाण्याच्या तुटवड्यानं पीकपेरा न झाल्यानं दूर प्रदेशात (पश्चिम महाराष्ट्रात) ऊस तोडीला जाताना ‘बालगृहा’त मुलांना वर्षानुवर्षं आईवडील ठेवतात हे चित्रं मी पाहाते आहे, नव्हे अनुभवते आहे. आमची शेती असल्यानं शेतकऱ्याचं दुःख काय असतं... दोन पानं उगवायची वाट शेतकरी कसा पाहातो हे मी जाणलंय. पाच वर्षांपासून बालगृहाशी जोडल्या गेल्यानं आईवडिलांपासून दुरावलेल्या मुलांची अवस्था पाहाते आहे. काही गावांत तर अगदी पाणी नसतं. आठशे फूट खोल बोअर घेऊन चारशे (४००) वर्षापूर्वीचं पृथ्वीच्या पोटात साठलेलं पाणी काढलं जातं, तेही अपुरं, अशा गावातल्या मुलांची लग्न होत नाही. आपल्या मुलीला पाणी नसणाऱ्या गावात नांदायला कोण पाठवणार? मराठवाड्यातल्या कोणत्याही माणसाला देव प्रसन्न झाला आणि ‘वर माग’ म्हटलं तर तो पाणीच मागेल, पाणी नाही म्हणून कारखाने नाहीत, स्वच्छता नाही, दूधदुभते नाही, विकास नाही. मराठवाड्यातल्या माणसाला म्हणून शेतीवरच अवलंबून राहावं लागतं, हे दुर्दैव आहे. उन्हाळ्यात तर खेड्याच्या खेडी उठून जालन्यासारख्या शहर गावी येतात. मोठ्या झाडाखाली वस्तीला राहातात. भीक मागणाऱ्याचं, चोऱ्यांचं प्रमाण वाढतं. पाण्याचीही चोरी होते. सध्या शेततळी, बांधारे, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत, तलावांचा गाळ काढला जातो आहे लोक सहभागातून. हातांची ओंजळ तयार आहे पण वरून पाणी पडावं तेव्हा खरं ना! ‘सुजलाम् सुफलाम् सस्यशामलाम्’ यातला पहिला शब्द ‘सुजलाम्’ हा महत्त्वाचा, ते नसलं तर सुफल, सस्यशामलही नाही. या परिस्थितीवर उपाय काय असू शकेल म्हणून ‘जलपर्व’ ही कादंबरी २००४ मध्ये लिहिली होती. पण गेल्या चार वर्षांत मराठवाड्याच्या भूमीत बीजाऐवजी दुष्काळ पेरला गेला. पिकाऐवजी मरण उगवून आलं. त्या अश्रुतून ‘दुष्काळ’ मधल्या कथा लिहिल्या गेल्या. प्रत्येक कथेतलं आयुष्य आणि दुःख मी पाहिलं आहे. म्हणून अर्पणपत्रिका ही त्या दुःखालाच अर्पण केली आहे.  रेखा बैजल


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि