80 190
Download Bookhungama App

दुर्ग तोरणा - आनंद पाळंदे

Description:

लेखक श्री. आनंद पाळंदे व इतिहासप्रेमी श्री. रमाकांत पाळंदे यांनी अतिशय मेहनत घेऊन इतिहासाची सत्यता टिकविण्यासाठी अनेक साधनांचा वापर करून या पुस्तकाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले असून नव्या अभ्यासकांना ते मार्गदर्शक ठरणार आहे. सामान्य वाचकालाही इतिहासाची गोडी निर्माण होईल अशा भाषेत मांडणी केली आहे.मनोगत मी तोरणा प्रथम पाहिला तो पुण्यातील संभाजी पुलावरून. सिंहगडाच्या उजवीकडे दुर्ग तोरणा हा एक लक्षवेधी डोंगर आहे. पावसाळ्यानंतर आकाश स्वच्छ झाले की ३५ कि. मी. अंतरावर असूनही याच्या डोंगरसोंडाही अगदी लख्ख दिसतात.  प्रत्यक्ष तोरण्यावर जाऊन आल्यावर त्याच्या प्राकृतिक रचनेचा रांगडा, रौद्रपणा यामुळे तो अगदी मनात घर करून बसला. त्यानंतर मग कितीतरी वेळा - कधी भर उन्हात, तर कधी पावसात, एकदा सायकलने, तर एकदा राजगडावरून डोंगरयात्रा करीत, कधी वेल्ह्यातून तर कधी भट्टी, मेट पिलावरे गावातून - तोरण्याची यात्रा घडली. पण अजूनही तोरणा संपूर्णपणे परिचित झालाय असे वाटत नाही. तात्यासाहेब अर्थात ग. ह. खरे यांचे ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ हे तोरण्यासंबंधी साधार माहीती देणारे एकमेव पुस्तक. शिवचरित्रातून भावलेले तोरण्याचे ऐतिहासिक महत्त्व या पुस्तकाने आणखीन वाढविले. त्यानंतर वाचनात आली ती रमाकांत पाळंदे यांनी आसमंतात हिंडून कोकाटे, शिळीमकर, मरळ अशा शिवकालीन घराण्यांच्या वारसांकडून जमविलेली माहीती. फार्सी कागदांच्या अनुवादातून सेतुमाधवराव पगडी, गो. त्र्यं. कुलकर्णी यांच्या पुस्तकातून आलेली आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पेशवे दप्तर इथे असलेली शिवकालीन, पेशवेकालीन कागदपत्रांमधील तोरण्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी माहीतीही वाचनात आली. देवस्थानांचा, तोरण्यावर लढलेल्या, जगलेल्या माणसांच्या कथा व इंग्लंडमधून इथे आलेल्या एका धर्मगुरूचे तोरण्याचे वर्णन ‘स्वराज्य’ साप्ताहिकातून वाचण्यात आले आणि थक्कच झालो. यामुळे तोरणा म्हणजे केवळ निसर्गाचा साक्षात्कार उरला नाही. तर इतिहासाच्या दस्तऐवजातून तो पुराणपुरुष म्हणून समोर उभा ठाकला. वरील सर्व साहित्यावर रचलेले आणि अनुभवातून पारखलेल्या तोरण्याचे चित्र म्हणजे हे प्रस्तुतचे पुस्तक. यात माझे स्वतःचे असे श्रेय फारच थोडे आहे. अनेकांच्या हातभाराच्या उतरंडीवरचा मी दहीहंडी फोडणारा एक छोटासा मावळा, एवढेच! महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्मारके, स्थळे ही आजवर दुर्लक्षामुळे अधिकाधिक ढासळत आहेत. डोंगरी दुर्गांच्या अवघडपणामुळे अशी स्थळे अधिकच उपेक्षित राहिली आहेत. तोरण्यासारखा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा दुर्गही या उपेक्षेचा बळी ठरला आहे. आणि म्हणून तोरण्यावर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याची प्रेरणा एक गिर्यारोहक आणि दुर्ग अभ्यासक या नात्याने झाली व प्रस्तुत पुस्तक सिद्ध झाले. इसवी १८८० मध्ये ब्रिटिशांनी जिल्हावार गॅझिटियर्स तयार करण्याचे ठरवून त्याप्रमाणे इसवी १८८५ मध्ये पुणे जिल्ह्याचे तीन खंडात गॅझिटियर प्रसिद्ध केले. त्यात तोरण्याची माहीती नाही. त्यानंतर १९५४ मध्ये मुंबई सरकारने पुणे जिल्ह्याची गॅझिटियरची सुधारलेली आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यात तोरण्याची माहीती फक्त ४ ओळीच आहे. गॅझिटियरकारांनी भारतातील गॅझिटियर्ससाठी माहीती देण्याची एक विशिष्ट पद्धत ठरवून घेतली. ती पद्धत योग्य व अचूक माहीती देणारी वाटल्याने त्या पद्धतीशी अधिक जवळीक होईल अशा पद्धतीने सदर पुस्तकाची मांडणी केली आहे.  या पुस्तकात तोरण्यासंबंधी काही नव्याने उजेडात आलेली अथवा आकलन झालेली माहीती समाविष्ट करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे- पुस्तकाचे हस्तलिखित तयार झाल्यावर त्यातील माहीती व पूर्वीच्या पुस्तकामधील माहीती पडताळून पाहण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसमवेत तोरणा मे १९९६ व १९९७ मध्ये पाहिला. १९९५ मध्ये रमाकांत पाळंदे, महेश शिळीमकर, पंडित गोखले, सौ. स्वरलता गोखले, ग. ना. धावडे, मु. ना. जोशी तोरण्यावर गेले असता बुधला माचीतील कापूरटाक्यापाशी खूप अडचण होती. टाक्याच्या प्रवेशद्वारापाशी फक्त एक बारीक फटच उघडी होती. बाहेर गाळ असून तेथे दलदल होती. आत अंधार होता. आत डोकावून पाहण्याचे कुणास धाडस होईना. महेशने धाडस करून आतील भाग डोकावून पाहिला. तो त्यास खांब दिसून त्यावर नक्षी आढळली. इतरांनी आत डोकावून त्याची माहीती पडताळून पाहिली. कापूरटाक्याबद्दल अधिक जिज्ञासा उत्पन्न होऊन १९९६ मध्ये महेश शिळीमकर, यशदीप माळवदे, सागर शाळिग्राम, आदित्य पाळंदे, साईप्रकाश बेलसरे, मु. ना. जोशी, अजय ढमढेरे, श्रीमती उष:प्रभा पागे इ. नी माझ्याबरोबर आत प्रवेश करण्यापुरते साफसफाईसाठी श्रमदान केले. गिरिकूजन संस्थेचे गायकर, अमृते यांच्यासह अनेकजणांनी श्रमदान केले व त्यानंतर आणखीन जिज्ञासा उत्पन्न होऊन मे १९९७ मध्ये अजयने व सागरने संपूर्ण टाके पाहिले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद डॉ. म. श्री. माटे यांच्याशी याबाबत संपर्क साधला. त्यांना नकाशे, फोटो दाखविले. त्यांनी गडाच्या पायथ्याशी असलेल्या भट्टी या गावी भेट देऊन गावातील देवळाच्या प्रवेशद्वारावर कानद गावाच्या हद्दीतील सिद्धेश्वर मंदिराच्या देवळाची बसविलेली चौकट पाहिली. चौकटीवरील नाग आणि कापूरलेण्यातील खांबावरील उलटे कोरलेले नाग व इतर गोष्टींवरून कापूरटाके हे पाण्याचे टाके नसून यादवकालीन शैव आश्रम असावा असे अनुमान त्यांनी काढले. त्यामुळे तोरण्याचा इतिहास शिवकालाच्या चारशे वर्षे मागे जाऊ शकतो. तोरण्यावर बाराव्या शतकापर्यंत वस्ती होती असा निष्कर्ष काढता येतो. संशोधनाअंती त्याची अधिक निश्चिती होऊ शकेल. बुधल्याच्या दक्षिण उतारावर गंगालजाई तळ्यानजीक गंगालजाई म्हणून पूजा होत असलेल्या सात मुखवटे शिल्पाचेही नव्याने आकलन करू पाहता ते वेगळे आहे असे लक्षात आले. वरील कापूरलेणे व सात मुखवटे शिल्प यांचा या पुस्तकाद्वारे प्रथमच परिचय होत आहे. शिवचरित्र साहित्य खंडात कानदखोऱ्याचे देशमुख यांच्याकडील इसवी १६३२ च्या मोडी महजराचे लिप्यंतर इतिहास मंडळाने इसवी १९४२ मध्ये छापले. या पुस्तकात मोडी लिपीतील संपूर्ण महजर प्रथमच छापण्यात आला आहे. पुणे पुरालेखागारातील मराठा काळातील तोरणा गडावरील देवस्थाने दाखविणारा इसवी १७८७ चा मोडी कागदही या पुस्तकात प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. इसवी १८७९ चा तोरण्याचा नकाशाही या पुस्तकात प्रथमच प्रसिद्ध होत आहे. इसवी १६३२ च्या महजरात तोरणा गडाच्या सीमा दिल्या आहेत. त्यातील दोन ओळीचे शिवचरित्र साहित्य खंडात ‘मशचा हाडी सीग/ झोडीन डुकरबोर अहे, असे लिप्यंतर केले आहे. महजरातील मूळ मोडी पाहून अचूक लिप्यंतर करण्याचा व अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष तेथे जाऊन संपूर्ण घेऱ्यातून प्रदक्षिणा घालीत त्या जागा पाहण्याचा प्रयत्न केला. पण योग्य अर्थ लागत नाही. इसवी १६३२ च्या महजरातच घेऱ्याच्या सीमा नमूद करताना वाभागड असा उल्लेख आला आहे. वाभागड या शब्दात गड असा शब्द असल्याने वाभागड असा दुर्ग असावा असे वाटल्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. महजरात वाभागड उगवतेस असे म्हटले आहे व वाभागडापासून वोग सुरू झाला असे म्हटले आहे. वाभागडाचे वाचन वज्रगड केल्यास तोरण्याच्या पूर्वेस पुरंदर व वज्रगड असे दुर्ग आहेत. परंतु ते खूप दूर आहेत. त्यामुळे महजरातील वाभागड हा वज्रगड होऊ शकणार नाही. मग तोरण्याच्या पूर्वेस झुंजारमलमाची आहे. हा माचीचे दुसरे नाव वाभागड असू शकेल का? तोरण्याच्या परिसरातील ग्रामस्थांकडे चौकशी करता कुणीही झुंजारमल माचीचे दुसरे नाव वाभागड सांगत नाही. ग्रामस्थ परंपरा असल्याचेही सांगत नाहीत. झुंजारमल माची म्हणजेच वाभागड असल्याबद्दल दुसरा सबळ पुरावा दाखविणारा कागद आढळला नाही. त्यामुळे वाभागड स्थान निश्चित कोणते हे इतिहासाला अज्ञात आहे. तोरण्याच्या झुंजारमल माचीस संपूर्ण तट आहे. बालेकिल्यासही आहे. बुधला माचीसही आहे. तोरणा इसवी १४८६ मध्ये मलिक अहमदने घेतल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर सुमारे १५० वर्षानंतर म्हणजे शिवजन्मापूर्वी काही काळ उल्लेख मिळतो. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तोरण्याची माहीती मिळू शकत नाही. सह्याद्रीतील दुर्गांचा वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने काही साधन नाही. त्यामुळे तोरण्याच्या सुबक तटाचे बांधकाम कोणी केले हा प्रश्न अनुत्तरित आहे असे म्हणावे लागते.  संदर्भ-सूची ऐतिहासिक उल्लेखांपुरती आहे तर विषयानुरूप संदर्भ-सूची दिली आहे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि