30.00 58.00
Download Bookhungama App

दुःख पर्वताएवढे: भाग चौथा - देव तेथेचि जाणावा - भा. रा. भागवत

Description:

दुःख पर्वताएवढे भाग चौथा देव तेथेचि जाणावा हे ‘ला मिझरेबल्स्’ चे भाषांतर आहे. निवेदन

आतापर्यंत अनेक पुस्तकांची भाषांतरे - रूपांतरे मी केली आहेत, पणला मिझरेब्लचा अनुवाद करतांना लाभले तसे समाधान मी पूर्वी कधी अनुभवले नव्हते. कधी कधी आपल्याला पंख फुटून आपण स्वर्गात भराऱ्या मारीत आहो असे वाटायचे ! त्यामुळे तीनशे साडेतीनशे पानात जे संक्षिप्त पुस्तक आटोपावे असा अंदाज होता त्याची पृष्ठसंख्या सारखी वाढतच गेली. मूळ कादंबरी १३६७ पृष्ठांची आहे ! (कॉलिन्स आवृत्ती). अनुवादाला देण्याच्या नावाबाबतही स्थित्यंतरे झाली. ‘गांजलेले जीवहे नाव आधी योजले होते, ते जरा रुक्ष वाटून पुढेजे का रंजले गांजलेही तुकोबारायांची काव्योक्ती शीर्षक म्हणून निवडली. पृष्ठसंख्या प्रमाणाबाहेर वाढली तेव्हा त्याचे दोन तीन खंड पाडावेत असे ठरले. आणि मग खंड पाडायचेच तर शीर्षक तरी अभंग का ठेवायचे, त्याचेही चार खंड पाडावेत किंवा, चुकलेच जरा ! हे शीर्षक अभंग ठेवून अभंगाच्या आणखी तीन पंक्ती उचलाव्यात अशी नावीन्यपूर्ण कल्पना सुचली, आणि तीच आता अमलात आणली आहे. ‘जे का रंजले गांजलेनंतरत्यासी म्हणे जो आपुले’, ‘तोचि साधु ओळखावाआणिदेव तेथेचि जाणावाअसे आणखी तीन खंड निघाले.

ला मिझरेब्लवरून मुलांसाठीदुःखीहे छोटे रूपांतर कै. साने गुरुजींनी केले आहे. ते उत्कृष्ट असले, आणिले मिझराब्लमधील मानवतावाद हा जगात सर्व ठायी सारखाच आहे हे खरे असले, तरी या विवक्षित ग्रंथाच्या बाबतीत रूपांतराच्या भरीला पडून मूळ कथेतले सत्य, शिव आणि सौंदर्य यांना जरासुद्धा धक्का लावणे मला प्रशस्त वाटले नाही. फ्रेंच राज्यक्रान्तीचा सत्याग्रह किंवा अठराशे सत्तावन बनवणेही मला योग्य वाटेना. काही कथा अशा असतात की त्याचे रूपांतर करण्याने काही बिघडत नाही. काहींचे मात्र शुद्ध भाषांतर करणेच आवश्यक असते. पुस्तकविक्रेता रूपांतर अधिक पसंत करतो; कारण गोळी जितकी शर्करावगुंठित तितकी गिळायला बरी असते. ती परदेशी गावे नि नावे हवीतच कशाला ? टाका गाळून ती ! पण मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकात हे एक वेळ क्षम्य मानले तरी मोठ्या वाचकांनाही नेहमीच स्वतःचे क्षेत्र इतके मर्यादित करून आता चालणार नाही. जगाच्या पाठीवर भारताशिवाय दुसरे देश आहेत, विविध प्रकारचे लोकाचार आहेत, हे आपण नुसते सिनेमाच्या पडद्यावर पहावे आणि पुस्तकात ते आले की बिचकावे; असे का ? विशेषतः इंग्रजीचे वाचन जसजसे कमी होत आहे तसतशी पाश्चात्त्य ग्रंथांची व ग्रंथकारांची ओळख नवी पिढी विसरते की काय अशी भीती उत्पन्न झाली आहे. उत्कृष्ट पाश्चात्त्य कादंबऱ्यांचे सरळ सरळ अनुवाद एवढ्यासाठीच स्वागतार्ह समजले पाहिजेत.

हे सर्व कटाक्ष मान्य करूनही, कागदाच्या टंचाईच्या या काळात मोठे पुस्तक काढणे म्हणजे एक प्रकारचे साहसच होय. ते साहस पत्करणारे श्री. बेदरकर व श्री. देशमुख यांच्यासारखे रसिक व उत्साही तरुण प्रकाशक प्रथमावृत्तीला लाभले हे मी माझे भाग्य समजतो.

पुढे मित्रोत्तम गो. नि. दांडेकरांनी अनुवाद वाचून संपवला मात्र - ‘‘फारच हृदयस्पर्शी ! वा, वा, भागवत ! मी तुमचा ऋणी आहे.’’ अशा मोजक्या शब्दात मला अभिनंदन पाठवून त्यांनी मलाच ऋणी करून ठेवले. हा संक्षिप्त रूपातला चार खंडी अनुवाद त्यांच्या प्रमाणे सर्वांना आवडो ही प्रार्थना !

 

भा. रा. भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि