60 116
Download Bookhungama App

ज्ञानेश्वरीतील कथा - राजा मंगळवेढेकर

Description:

ज्ञानेश्वरीतील निवडक कथांचे रसग्रहण आणि विवेचन या संग्रहात केलेले आहे. ज्ञानेश्वरीतली कथाबीज असलेली ओवी, तिचा संदर्भ, भावार्थ आणि मग कथा, अशी ह्या ग्रंथाची मांडणी केलेली आहे.मनोगत ज्ञानदेवांनी विषय- निरुपणासाठी, अनुवादासाठी, विवरणासाठी अनेक गोष्टींचा आधार घेतलेला आहे. यात नीतिकथांप्रमाणेच पौराणिक कथा, दृष्टान्तकथा, चरित्रकथा, निसर्गकथा, प्राणीकथा, लोककथा आदी कथाप्रकार आले आहेत. रामायण, महाभारत, भागवत, कथाकल्पतरू, शीवलीलामृत, हितोपदेश, पंचतंत्र व अप्रसिद्ध असे लोकसाहित्य यातून ह्या कथा विखुरलेल्या आहेत. ज्ञानदेवांनी त्या निवडून, पारखून योग्य जागी पेरलेल्या आहेत. ज्ञानेश्वरीतील कथांचा मागोवा घेताना मला सुमारे १२० ओव्यांमध्ये ११७ कथाबिजे मिळाली. ज्ञानदेवांची एक खुबी आहे, ते कथांचा वापर करतात, पण संपूर्ण कथा सांगत नाहीत, तर ती बीजरूपाने संकेताने, संक्षेपाने, उल्लेखाने किंवा सूचकतेने केवळ कथानिर्देश करतात. ‘भावार्थ- दीपिके’ च्या निरुपण- प्रवचनाच्या वेळी समोर बसलेल्या सुजाण, विद्वान व रसिक श्रोत्यांविषयी ज्ञानदेवांच्या मनी परम आदरभावना आहे. ‘त’ वरून ‘ताकभात’ ओळखणाऱ्या चोखंदळ, मर्मज्ञ, बहुश्रुत श्रोत्यांना संपूर्ण कथा-विस्ताराची गरज नाही; संदर्भ, संकेत, सूचन पुरेसे आहे, हे त्यांनी जाणलेले आहे. अशा आपल्या श्रोत्यांना उद्देशून त्यांनी ‘प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ती’ असे अत्यंत आदराने संबोधिले आहे. या संदर्भात कै. राजवाडे यांनी ‘ज्ञानेश्वरनीतिकथा’ या आपल्या पुस्तिकेच्या प्रास्ताविकात म्हटले आहे की, “सबंध कथा ज्ञानेश्वरीकार दृष्त्तान्तात देत नाहीत, तर ‘जैसे’ या शब्दाने कथेचा नुसता उल्लेख करतात. दृष्टान्तोल्लिखित संपूर्ण कथेची उकल करण्याचे काम ज्ञानेश्वरी निरुपणकारांकडे सोपविते. आपण कथेचे फक्त स्मरण करून देते. कथा प्रसिद्ध असल्यामुळे ती श्रोत्यांना किंवा बहुश्रुत व्याख्यात्यांना अवगत आहे असा ग्रंथकर्त्यांचा अभिप्राय असतो.” ज्ञानेश्वरीतील कथांचा मागोवा घेताना हेही लक्षात आले की, काही ठिकाणी पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: अपरिहार्यपणे कथांची पुनरुक्तीही झालेली आहे. त्यामुळे या कथांच्या संपादणीतही अशी पुनरुक्ती आलेली आहे. तथापि, जिथे शक्य होते तिथे अशी पुनरुक्ती टाळण्याचाही प्रयत्न केलेला आहे. पुनरुक्तीप्रमाणेच काही कथांमध्ये मुळातच फेरबदल असल्यामुळे तेही या कथांमध्ये आढळून येतील. उदारहणार्थ ‘टिटवीची गोष्ट’ दोन - तीन प्रकारात आढळते. पुराणकथांतही मतभिन्नता दिसते. लोककथांचे वेगवेगळे रूप दृष्टीस पडते. कथानिवेदकांच्या स्मरणातून मुखावाटे कथा प्रवास करीत असते. तिचा असा प्रवास पिढ्यान‍् पिढ्या चाललेला असतो. त्यामुळे देशकालपरिस्थितीनुसार फेरबदल होत जातात. म्हणून कधी कधी एकाच कथेची दोन- तीन रूपे भेटतात. ज्ञानेश्वरीतली कथाबीज असलेली ओवी, तिचा संदर्भ, भावार्थ आणि मग कथा, अशी ह्या ग्रंथाची मांडणी केलेली आहे. ‘ज्ञानेश्वरीतील कथा’ या माझ्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीतील यच्चयावत सर्व कथांचा समावेश झालेला आहे किंवा समाविष्ट झालेल्या सर्वच कथा पूर्णतया निर्दोष आहेत, असा दावा मी करीत नाही. उत्तमाचे धनी ज्ञानेश्वर माउली आहेत, उणिवांचा दोषी मी आहे. तुकोबांच्या शब्दात सांगायचे तर, करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे । । कोणाकारणे हे जालेसे निर्माण । देवाचे कारण देव जाणे । । या ग्रंथलेखनासाठी ज्या महाभागांच्या ग्रंथांचा व लेखांचा आधार मी मुक्तपणाने घेतलेला आहे, त्यांचा मी निरंतरचा ऋणी आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! ज्ञानेश्वरीचा परामर्श आजवर अनेक रसिक, मर्मज्ञ विद्वानांनी विविध अंगांनी घेतलेला आहे. ज्ञानेश्वरीचे हे कथारूपही सर्वांना आवडेल अशी आशा आहे. - राजा मंगळवेढेकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि