60.00 116.00
Download Bookhungama App

दीपमाळेचे रहस्य - भा.रा.भागवत

Description:

‘दीपमाळेचे रहस्य’ शक्तियुक्तियुक्त साहसात गुरफटलेले आहे. चोर-तस्करांवर शिरजोर होणाऱ्या, बर्गलर-स्मगलरांना ठोसे लगावणाऱ्या या साहसबहाद्दर किशोर-किशोरींना आमचे लाख सलाम!प्रस्तावना

कादंबरिकांचा पहिला संच आमच्या बालमित्रांना आवडल्यामुळे हुरूप येऊन हा दुसरा संच आम्ही तयार केला आहे. दहा ते सोळा वर्षांच्या किशोरावस्थेतले वाचक पऱ्यांच्या नि जादूगार-चेटक्यांच्या पकडीतून निसटून खऱ्या जगात पराक्रम गाजवायला उत्सुक असतात. त्यांच्या साहसीवृत्तीला आव्हान देतील, अशाच या पाच कादंबरिका आहेत. पहिल्या संचावर जादूगिरीची थोडी सावली बुद्ध्याच पडू दिली होती; पण आता तसेही काही नाही. आणि तरी याही खेपेस एक तडजोड मी केली आहे. पाचांपैकी एक गोष्ट सोळापेक्षा दहाकडे जास्त झुकणारी– मोठ्यांपेक्षा छोट्यांना अधिक आवडेल अशी आहे. ती म्हणजे सौ. शैलजा राजे यांची ‘शाळेतील भुताटकी’ त्या भुताटकीची सोडवणूक डोकेबाजपणे करणाऱ्या मिंकी आणि मंडळीचे तुम्ही निश्चित कौतुक कराल. बाकीच्या चारही साहसकथा धावपळीने अन् बहादुरीने भरलेल्या आहेत; आणि त्यांपैकी एक– श्री. ग. वि. साळवी यांची ‘सम्राट चंद्रगुप्त’ ही तर ऐतिहासिक सत्यकथा आहे. इतिहासातल्या प्रसिद्ध राजांपैकी कुमारांना आवडणारे कोण म्हणून प्रश्न निघाला, तर दोघांची नावे चटकन् डोळ्यांपुढे आल्याखेरीज राहात नाहीत. एक शिवाजी नि दुसरा चंद्रगुप्त! या दोघांचेही बालपण पराक्रमी खोड्यांनी भरलेले होते. ही मुले पुढे नामवंत राजे होणार, असे भाकीत त्या त्या काळातल्या जोशीबुवांनी वर्तवलेले असले तरी त्यांच्या बालसवंगड्यांना ते कुणी सांगण्याची गरजच नव्हती. त्या त्या काळातल्या जवान पिढीची खात्रीच होती की, आमचा चंद्र सम्राट होणार आणि आमचा शिवबा छत्रपती होणार! चंद्रगुप्ताच्या पराक्रमाची कहाणी त्याच्या बालपणावर भर देऊन लेखकाने इतक्या चटकदारपणे सांगितली आहे की, ती वाचतांना आपण त्या रोमहर्षक काळातून पर्यटन करीत आहो, असेच वाटावे. मुंबई-दिल्लीसारख्या बकाल बनलेल्या शहरांतून जे अंगावर काटा उभा करणारे गुन्हे घडत असतात, त्यांतला एक म्हणजे मुले पळवण्याचा प्रकार! या भयानक प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनसंस्था नि सामाजिक संघटना बद्धपरिकर आहेतच. पण कधी कधी त्याही कमी पडतात आणि मग ‘व्हिलन’चा खात्मा करण्याची जबाबदारी त्या बिचाऱ्या बालबहाद्दरांवर पडते! अशी उदाहरणे खरोखरीच घडलेली आहेत– पोलिसांनाच विचारा! निदान सौ. आशा भाजेकर यांच्या ‘अजबगजब मंडळ’वर आणि सौ. लीलावती भागवतांच्या ‘डाकूंची टोळी आणि बालवीर’वर तसे प्रसंग कोसळले आणि त्यांनी न डगमगता स्वतःच डिटेक्टिव्ह बनून त्यातून मार्ग काढला! ‘दीपमाळेचे रहस्य’देखील असेच शक्तियुक्तियुक्त साहसात गुरफटलेले आहे. चोर-तस्करांवर शिरजोर होणाऱ्या, बर्गलर-स्मगलरांना ठोसे लगावणाऱ्या या साहसबहाद्दर किशोर-किशोरींना आमचे लाख सलाम!

- भा. रा. भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि