60 110
Download Bookhungama App

देश विदेशच्या परीकथा - इटाली - मालती दांडेकर

Description:

:1634 साली गेबलिस्ट नावाच्या इटालियन प्रवाशाने तेथल्या समाजात प्रचलित असणा-या  या कथा जमवून लिहिल्या व प्रसिद्ध केल्या. त्या काळाचा हा एक उत्कृष्ट ग्रंथ समजला जातो परीकथा म्हणजे जादूगारांच्या, यक्षपर्या , चेटकिणी यांच्या, बोलक्या अद्भुत प्राण्यांच्या व अद्भुताहून अद्भुत जादुमय वस्तूंच्या कथा. यात शूर नायक व सुंदर नायिका तर असणारच ! या कथा अद्भुत असल्या तरीही मोठ्या चित्तवेधक असतात, इतकेच नव्हे तर त्यातूंन नीतिबोधाची व माणुसकीचीही शिकवण असते. भारतात प्रांतोप्रांती या कथा आहेत, आणि महत्वाची गोष्ट अशी की, भारताप्रमाणेच जगातल्या प्रत्येक देशात व जमातीत अगदी वन्य जमातीतही या अशा रंजक परीकथा आहेत. त्या तेथेही फार प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. त्याच या देशविदेशच्या परीकथा !कथा 1. कुक्कुटमणी मिनको बिचारा गरीब म्हातारा. आधीच घरात काही नाही, बरं, मोलमजुरी करावी तर हातपाय थकत चालले, शेवटी घरातले किडूक-मिडूक विकायची पाळी आली. आज मोडकी खुर्ची विक, उद्या एखादे भांडेविक, असे करता-करता फक्त एक कोंबडा राहिला. अगदी मरतुकडाच झाला होता तो, उगीच पहाटेपासून ओरडून कटकट लावण्यापलिकडे याचा उपयोग तरी काय? ठरलं... तो विकायचाच. गावात दोन जादुगार होते. मिनको त्यांच्याकडे गेला व त्याने कोंबड्याचा सौदा ठरवला. त्यांतला एक जादुगार म्हणाला, ‘अरे जा ! तुझा कोंबडा तो काय ? अगदी मरू घातलेला न् हाडं निघालेला; पाहिलाय मी. देऊ चांदीचं एक नाणं ? हवा तर दे,’ चला ! एक तर एक नाणं. सौदा ठरला. दुसरा म्हणाला, ‘उद्या कोंबडा आणून दे, पैसे घेऊन जा,’ अन् मग तो परत निघाला. मिनको तसा मोठा अनुभवी म्हातारा. ‘ आपण दूर गेल्यावर जादुगार काय म्हणतात ते ऐकावं,’ असं मनात योजून तो परत जादुगारांच्या बंद दाराच्या फटीला कान लावून त्यानं ऐकलं. एक जादुगार म्हणाला, ‘अरे वा ! नशिबच उघडलं आपलं ! काय स्वस्त अन् मस्त सौदा झाला कोंबड्याचा नाही ?’ दुसरा म्हणाला,‘कसला मस्त ? त्या कोंबड्याचं कालवणसुध्दा धड व्हायचं नाही.’ पहिला : ‘पण तो फार गुणी कोंबडा आहे. त्याच्या डोक्यात मणी आहे- अन् तो इच्छामणी आहे. त्या वेड्या मिनकोला ते ठाऊक कुठाय ?’ दुसरा : ‘इच्छामणी ? म्हणतोस काय ?’ पहिला : ‘इच्छामणी म्हणजे मागितलं ते देणारा. अन् तो आपल्याला, फक्त एका चांदीच्या नाण्यात मिळणार !! मग नशीब उघडलं नाही तर काय ?’ मिनको घाईघाईनं घरी आला. ‘अरेच्या असा हा कोंबडा गुणवंत आहे होय? ठीक. आता अडलंय माझं खेटर त्या लुच्च्यांना कोंबडा विकायचं ! कोंबडा माझा अन् तो कुक्कुटमणी पण आता माझाच. बसा कोकलत म्हणावं.’ तो मनाशी म्हणाला. मग त्याने कोंबडा मारला. अन् खरोखरच त्याच्या डोक्यातून एक मणी निघाला. तो काढून घेतला. आता मण्याची परीक्षा बघण्यासाठी काहीतरी मागायला हवं. काय बरं ? रामराम, हे म्हातारपण नको झालं आहे. डोळे पिचके, दात किडके , हात थरथरतात अन् पाय कापतात. केस पांढरे, कान बहिरे ! ह्याच्या ऐवजी तरूणपणा मागून बघू का ? देईल का हा क्षुद्रमणी इतकं मोठं चैतन्य ? त्याने चिंतन केले व म्हटले, ‘ कूक्कुटमणी ! कुक्कुटमणी, मला पंचविशीचा तरूण कर.’


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)