60.00 116.00
Download Bookhungama App

दर्शन-ज्ञानेश्वरी - वि. ग. कानिटकर

Description:

श्री. वि. . कानिटकर यांनी या छोट्यादर्शन-ज्ञानेश्वरीपुस्तकामध्ये आजच्या साहित्यप्रेमी धावत्या वाचकास ज्ञानेश्वरीच्या साहित्यिक गोडीची भरपूर वानगी दिली आहे. ज्ञानेश्वरीकडे धर्मप्रेरणेने आणि धर्मजिज्ञासेनें वळणाऱ्या वाचकांइतकेच आजच्या काळांत ज्ञानेश्वरीच्या साहित्यगुणामुळें आकर्षित होणारे लोक पुष्कळ आहेत. आधुनिक सुशिक्षितांचा कल ज्ञानेश्वरीच्या अवलोकनाकडे वळतो तो मुख्यतः तिच्या वाङ्मयात्मक श्रेष्ठतेमुळे. गूढतत्त्वज्ञाची उकल, भक्तिरसाचा गगौंघ, साहित्याचे लेणे होण्यासारखे भाषासौष्ठव आणि उपमालंकाराचें वैभव यांचा अपूर्व संगम ज्ञानेश्वरींत झाला आहे. “सोने आणि परिमळें। इक्षुदंडा लागती फळें। गौल्य माधुर्य रसाळें। तरी ते अपूर्वता।।असे श्री समर्थांनी म्हटलें आहे. तशी ज्ञानेश्वरीची अपूर्वता आहे.प्रयोजन

ज्ञानेश्वरी लिहिली जाऊन जवळजवळ पावणे सातशे वर्षांचा काळ लोटलेला आहे. त्यानंतर अनेक स्थित्यंतरें होऊन आतां स्वतंत्र भारतात महाराष्ट्र राज्यही निर्माण झालें. आतां मराठी भाषा पुनश्च राजवैभवाची स्वप्नं पहात आहे.

संत ज्ञानेश्वरांनी गीतेवरील मराठीतील हें टीकाकाव्य करतांना विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवला होता. वेदांसंबंधीं ज्ञानदेवांनी अशी तक्रार मांडली आहे कीं, वेद फक्त ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य या तीन जाती-वर्णांशीच कानगोष्ट करतो. स्त्रिया किंवा शूद्र म्हणत असत त्या दलितांच्या बाबतीत वेद कृपण आहे. हा कलंक टाळण्यासाठी वेद गीतेच्या उदरांत लपला आणि वेदांचे रहस्य गीतेच्या रूपाने सर्वांनाच उपलब्ध झालें. परंतु ही गीता अखेर संस्कृत भाषेत असल्यामुळें, ज्यांच्याकरितां या सातशे श्लोकी काव्याचे असाधारण महत्त्व त्या बहुजनांना मुळांतून समजणे दुरापास्त झालेलें. श्री ज्ञानेश्वर म्हणतात -

तेणें आबाल सुबोधें। ओवियेचेनि प्रबंधे।

ब्रह्मरससुखास्वादें। अक्षरे गुंथिली।।

जी मराठी भाषा लहान मुलालाही समजेल असा आत्मविश्वास ज्ञानेश्वरांनीं प्रगट केला, तीच भाषा आज पुष्कळ मराठी वाचकांना समजावयास कठीण वाटते. भाविकपणें-शब्दप्रामाण्य राखून ज्ञानेश्वरी मराठी समाजाच्या अगदीं सर्व थरांत वाचली जाते, ही गोष्ट खरी असली तरी भाविकपणेंच ज्ञानेश्वरीकडे वळू न शकणाऱ्या, मराठी सुशिक्षितांना ज्ञानेश्वरी वाचनांत अडचण वाटते ती भाषेचीच. ज्यांनी मराठी विषय शाळेत व महाविद्यालयांत अनेक वर्षे अभ्यासिला अशा सुशिक्षितांची जर ही अवस्था तर केवळ अक्षरज्ञानाच्या आधारावर ज्ञानेश्वरीकडे वळणाऱ्यांची याबाबतींत किती निराशा होत असेल?

ज्ञानेश्वरीच्या बाबतीत भाषेची अशी अडचण निर्माण होण्याचे कारण काय? याचे उत्तर कठीण नाही. ज्ञानेश्वरी ही गीतेची समश्लोकी नाही. ती लिहिली गेली असामान्य प्रतिमेच्या ज्ञानेश्वरांसारख्या श्रेष्ठतम कवीकडून. ज्ञानेश्वरांची बरोबरी करील असा एकही कवी मराठी भाषेत तरी आजतागायत निर्माण झालेला नाहीं. कवी हा शब्दांची रूपे काव्यानुकूल करून घेण्यास मुख्त्यार असतो. परिचयांतलेच शब्द पुष्कळ वेळां तो असे वाकवतो की त्याचा ध्वनी ओळखीचा वाटला तरी रूप ओळख देत नाही. शिवाय ज्ञानेश्वर केवळ कवी नव्हते. ते तत्त्वज्ञ होते. सांगण्यासारखे-जगाला देण्यासारखे त्यांच्याजवळ पुष्कळ होतें. तेव्हां विद्वत्ता आणि तत्त्वज्ञान या गोष्टींचा असामान्य प्रतिभेशी मिलाफ झाल्यावर जी वाङ्मयीन कृति निपजली, ती सरळ बालबोध होऊं शकेल किती यालाही मर्यादा पडतात.

एखाद्या चित्रावरची धूळ चित्राला धक्का न लागता पुसावी त्या प्रमाणें, मूळ ज्ञानेश्वरीच्या रूपाला न डागळतां त्याचें सोप्या मराठीत काव्यरूप करणें ही अशक्य गोष्ट आहे. ज्ञानेश्वरी पाठांत म्हणूनच बदल करणारा विचार करणेंच इष्ट नाहीं. काव्य हें कवीच्या आत्म्याचेच उद्गार असल्यामुळें त्याच्या काव्यांत सोईसाठी ढवळाढवळ करण्याचा तसा अधिकार कुणाला पोंहचतही नाही. म्हणूनच सोप्या प्रचलित मराठीत पदरचे अक्षरं न घुसडतां भावार्थ सांगणे, हा खटाटोप मराठीत लेखकांनी करणें अगत्याचे झालें आहे.

ज्ञानेश्वरीची ओवीसंख्या नऊ हजार आहे. या नऊ हजार ओव्यांत दोन ते अडीच हजार पंक्ती उपमा-दृष्टान्तांनीं नटलेल्या आहेत. या गुणांमुळे साहित्यप्रेमी माणसे ज्ञानेश्वरीकडे पुनः पुनः वळतात. या ओव्यांतून भावार्थाला साहाय्यभूत होतील अशा ओव्या मी माझ्या अभिरुचीप्रमाणे निवडल्या आहेत. ओव्या निवडतांना पुढील धोरण पाळले आहे :

()    ज्या ओवीची रचना काव्यदृष्ट्या सरस आहे किंवा जिचे अर्थसौंदर्य मनावर ठसा ठेवून जाणारे आहे अशा ओव्याच निवडल्या आहेत.

()   जी ओवी निवडली, ती संपूर्ण दिली आहे. तिचा अर्थ भावार्थात संपूर्ण दिल्यानंतर त्या अर्थाभोवती मागचा पुढचा संदर्भ जोडून सर्व भावार्थाला ओघवते रूप राहील असा प्रयत्न केला आहे.

()    केवळ गीतेचे तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या भागांतील ओव्याच निवडलेल्या नाहीत. संजय, धृतराष्ट्र, श्रीकृष्ण, अर्जुन, निवेदक ज्ञानदेव आणि निवृत्तिनाथादि श्रोते या सर्वांचे अस्तित्व ज्ञानेश्वरींत पदोपदी जागते राहिलेले आहे. यामुळे ज्ञानेश्वरीच्या कथनाला विशिष्ट रम्य घाट आलेला आहे, तो तसाच कायम रहाण्याच्या दृष्टीने, ओव्या सर्व भागांतून निवडल्या आहेत आणि भावार्थही त्याच पद्धतीने मांडला आहे.

एखादी रचना जवळ शब्दकोश ठेवून वाचायची म्हटली कीं त्याला अभ्यासाचें रूप येऊन वाचनाच्या आनंदांत मोठेच न्यून निर्माण होते. या दृष्टीने निवडलेल्या ओव्यांचा शब्दशः अर्थ भावार्थात दिलेला आहे. तो संदर्भाच्या अनुषंगाने सहज समजू शकेल असें वाटल्यानं, कठीण शब्दांचे अर्थ निराळे दिलेले नाहीत.

संतश्रेष्ठ नामदेवांनी - “नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी।।असें म्हटलेलें आहेच. अशा या अमृतमय वाङ्मयीन कृतीकडे वळल्यानंतर तिच्या प्रेमांत कोण गुरफटणार नाहीं? या प्रेमांतूनच हें लिखाण झाले आहे. ज्ञानेश्वरांनीं अनन्यप्रीतीचे रूप सांगतांनातेणें काजेवीणही बोलावे। ते देखिले तरी पहावे।।अशा शब्दांत अशा कृतीला परवानगी दिलेली आहेच.

- वि. . कानिटकर

पुणे,

१ एप्रिल १९६२

 “परमेश्वर दरएक जातीला, त्यांच्या भाषेत संदेश देणारा

पाठवितो. मराठीमध्ये प्रभूंची काय योजना होती? या प्रश्नाला

माझे निःशंक उत्तर असें की त्यांनीं ज्ञानदेव पाठविले.”

 

- विनोबा.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि