80 300
Download Bookhungama App

चिंतनिका - दि. य. कानविंदे

Description:

चिंतनिका सर्वसामान्य लोकांच्या नित्य बोलण्यात, चर्चेत येणारे विषय एका वेगळ्याच दृष्टीकोनातून येथे आले आहेत. उदारणार्थ गाताजान्मातील कर्माचे भोग, पुनर्जन्म,विधिलिखित, फलज्योतिष, मी कोण? वंशाचा दिवा, श्रद्धा आणि बुद्धी, परमेश्वर व त्यांचे स्वरूप, विश्वामागील आधारभूत शक्ती, चमत्कार. तसेच परमेश्वराची जात, परमेश्वराचे अंश यासारखे अति अपरिचित पण वैशिष्टपूर्ण विषय, शिवाय आपले शरीर, आपला मेंदू, DNA या सारखे नित्य परिचयात असलेले पण ज्यावर आपण सहसा कधीच विचार करत नाही असे विषयही 'चिन्तनिके'त अंतर्भूत आहेत. तेव्हा वाचा, विचार करा आणि पाहा पटताहेत का......माणूस रस्त्यातून जातायेताना दिसतो किंवा विवाहसमारंभासारख्या समारंभात दिसतो तेवढ्यावरून आपल्याला त्याची खरी ओळख होते असे म्हणता येत नाही. कारण ते त्याचे वरवरचे, औपचारिक, छोटेसे आणि अगदी तात्पुरते दर्शन असते. त्याचे खरे रूप त्याच्या विचारांतूनच स्पष्ट होते. मात्र हे त्याचे विचार त्याच्या जडणघडणीतूनच तयार झालेले व म्हणून त्याच्या स्वभावाशी जुळणारे असले पाहिजेत. आणि म्हणून माणसाचे ओझरते का होईना पण खरे दर्शन होण्यासाठी त्याच्या अंतरंगात किंचित डोकावून पाहता आले पाहिजे. आणि त्यासाठी त्याच्या डायरीतील काही पाने चाळून पाहता आली तर ते त्याच्या खऱ्या परिचयाचे एक उत्तम व सुलभ असे साधन ठरू शकेल.तारीखवार डायरी लिहिण्याची माझी पद्धत नाही. पण अवतीभवती जे घडतंय त्याची निरीक्षणे, आप्तमित्र व इतरेजन यांच्याबरोबरचे संवाद आणि मुख्यतः वाचन यांच्या माझ्या मनावर होणाऱ्या प्रतिक्रियांपैकी, सर्वचे नव्हे पण, काही तीव्रतर असत. आणि त्यांच्या नोंदी मी माझ्या डायरीत वेळोवेळी करत असे. पुढे कधीतरी, काही कारणाने डायरीची काही पाने चाळली जायची आणि त्या नोंदी माझ्या मलाच काहीशा स्वारस्यपूर्ण (interesting) वाटत. कारण मी स्वतःकडेच काहीशा अंतरावरून मागे वळून, जणू काही, पाहत आहे असे मला त्या नोंदी वाचून वाटे, भिन्न वयातील आपले स्वतःचे फोटो पाहताना वाटते, अगदी तसेच.अगदी अलीकडे वयाच्या ७९-८० व्या टप्प्यावर काही डायऱ्या मुद्दाम चाळून पाहत असता मनात विचार आला की यातील काही नोंदी पुन्हा स्वतंत्रपणे लिहून काढल्या तर ? आणि त्यातूनच या ‘ चिंतनिके ’चा उदय झाला. चिंतनिकेत आपल्या मनात व बोलण्यात वारंवार येणाऱ्या मुद्द्यांनाच स्पर्श केलेला आहे. आमचे एक शिक्षक नेहमी म्हणत की योग्य विचार कोठूनही आले असले तरी ते आत्मसात करा म्हणजे ते तुमचे होतील. या चिंतनिकेतील विचार याच अर्थाने माझे स्वतःचेच आहेत असे मी निक्षून म्हणू शकतो. अर्थात या विचारांचा मूळ उद्गाता कोण हे सांगणे कठीण आहे. तरी या विचारांमागील जे जे कोणी मूळ विचारवंत असतील त्यांचे ॠण कृतज्ञतापूर्वक मानत आहे. जाताजाता एवढेच म्हणेन की हे विचार सर्वांना पटतीलच असे नाही. तरी त्यातील निर्दिष्ट प्रश्नांकडे चिकित्सापूर्वक पाहण्यास चालना देणारी ही चिंतनिका ठरली तर तिच्यामागील उद्देश सफल झाला असे होईल.संपूर्ण हस्तलिखित वाचून, अंजली कानविंदे, प्रसाद कानविंदे व माया गायतोंडे यांनी काही सुधारणा केल्या, काही उपयुक्त सूचना केल्या. याचा मनःपूर्वक ॠणनिर्देश करत आहे. शेवटी माझी पत्नी, सौ. कुंदा हे पुस्तक तयार होण्याच्या प्रत्येक टप्प्यावर बारीक लक्ष ठेवून असे, माझ्या प्रयत्नात शिथिलता, कोणत्याही प्रकारची कमतरता येऊ नये याबद्दल सतत जागरूक असे. याचा कृतज्ञतापूर्वक निर्देश करत आहे.अंतिम टप्प्यावर श्री. प्रसाद कुळकर्णी यांनी काही बहुमोल सुधारणा मुख्यतः मुखपृष्ठाविषयी - सुचवल्या. त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत आहे.- दिनकर कानविंदे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि