80 144.00
Download Bookhungama App

बोलकी हाडे - डॉ. आनंद जोशी

Description:

न्यायसहाय्यक मानववंशशास्त्र ही विज्ञानाची नूतन व विकसनशील शाखा आहे, तसेच ती एक अॅकॅडेमिक डिसीप्लीन विद्याविषयक शाखा आहे हे दाखवणे. हा या पुस्तकाचा उद्देश आहे.शाळा-कॉलेजात असताना शेरलॉक होम्स वाचला होता. त्यानंतर अॅगाथा ख्रिस्तीच्या हर्क्युल पॉयरॉटच्या कथाही वाचल्या होत्या. पण खरा भावला होता तो शेरलॉक होम्स. त्याच्या कथेतील रहस्याइतकीच त्याने गुन्हेशोधनासाठी वापरलेली तर्कशुद्ध विचारसरणी, निमवैज्ञानिक विश्लेषणपद्धती आवडली होती. शेरलॉक होम्सचे लेखक सर आर्थर कॉनन डायल हे एक डॉक्टर होते. रोगाच्या निदानासाठी लागणारी निरीक्षणपद्धती ते त्यांच्या गुरूकडून एडिंबरा मेडिकल स्कूलमध्ये शिकले होते. तीच पद्धती त्यांनी शेरलॉक होम्सच्या निर्मितीसाठी वापरली होती. मी सेकंड एम्.बी.बी.एस्.ला असताना ‘न्यायसहाय्यक वैद्यकशास्त्र’ (फोरॅन्सिक मेडिसीन) हा विषय अभ्यासक्रमात होता. त्याचप्रमाणे निरीक्षण, विश्लेषण आणि संश्लेषण ही निदानीय पद्धती माझ्या विचारसरणीचा भाग बनली होती. ‘न्यायसहाय्यक मानववंशशास्त्र’ वाचताना या सर्वांचा उपयोग झाला. पण मी या विषयाकडे वळलो कसा? ‘नवी क्षितिजे’ या अनियतकालिकाचे संपादक श्री. नाना जोशी यांनी अमेरिकेहून येताना ‘बोन्स’ हे न्यायसहाय्यक मानववंशशास्त्रावरचे पुस्तक आणले होते. ते त्यांनी मला वाचायला दिले आणि ‘नवी क्षितिजे’ साठी या पुस्तकाआधारे लेखमाला लिहा असे आवाहनही केले. ‘बोलकी हाडे’ या शीर्षकाखाली ती लेखमाला ‘नवी क्षितिजे’ मध्ये प्रकाशित झाली. या लेखनाचे पुस्तक व्हावे, अशी श्री. नानांची इच्छा होती; ती आज पुरी होत आहे. ‘बोन्स’ हे पुस्तक दिल्याबद्दल, या विषयावर लिहिण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दल व या लेखमालेवर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी परवानगी दिल्याबद्दल मी श्री. नाना जोशी यांचा आभारी आहे आणि ऋणीही आहे. ही लेखमाला वाचून पुस्तकाच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्याबद्दल मी कविता महाजन यांचा आभारी आहे. चाकोरीबाहेरच्या या विषयावरचे पुस्तक काढल्याबद्दल प्रकाशक श्री. अरविंद पाटकर यांचा व पुस्तकाला सुयोग्य असे मुखपृष्ठ तयार करणाऱ्या चित्रकार यांचाही मी आभारी आहे. हे पुस्तक म्हणजे गुन्हेशोधनाचे ‘गाइड’ नाही. “न्यायसहाय्यक मानववंशशास्त्र ही विज्ञानाची नूतन व विकसनशील शाखा आहे, तसेच ती एक अॅकॅडेमिक डिसीप्लीन विद्याविषयक शाखा आहे हे दाखवणे.” हा या पुस्तकाचा उद्देश आहे. भौतिक विज्ञान, रसायन विज्ञान, आधुनिक वैद्यकीय विज्ञान व रेणवीय जैवविज्ञान या विषयातील शोधांचा न्यायसहाय्यक मानववंशशास्त्राच्या विकासात महत्त्वाचा सहभाग आहे. विज्ञानाने समाज जीवनाच्या प्रत्येक अंगावर आपला ठसा उमटवला आहे. न्याय आणि कायदा या विभागांनासुद्धा विज्ञानाने निराळे मार्ग दाखविले आहेत. न्यायसहाय्यक मानववंशशास्त्र हे त्याचे उदाहरण आहे. मी न्यायसहाय्यक मानववंशशास्त्रज्ञ नाही. त्यामुळे तज्ज्ञांना या पुस्तकात काही उणिवा सापडू शकतीलही. पण तरुणांना मराठीतून या विकसनशील विज्ञान शाखेची तोंडओळख व्हावी, त्यांचे कुतूहल जागृत व्हावे; एवढाच मर्यादित हेतू या पुस्तक-लेखनामागे आहे. - डॉ. आनंद जोशी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि