Firasti

मिरच्या लिंबं – स्वाती चांदोरकर

स्वाती चांदोरकर ह्यांचे आपल्या कुटुंबात सहर्ष स्वागत...ही फिरस्ती एखाद्या चलत चित्रपटा सारखी वाटली...सगळे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर साकार झाले... खूप वाचा...आणि दाद द्या... विक्रम मिरच्या लिंबं – स्वाती चांदोरकर शुक्रवारी भल्या पहाटे ती उठली. बाजारात जाऊन अर्ध पोतं मिरच्या, अर्ध पोतं लिंबं आणि तारेची भेंडोळी तिला आणायची होती. त्याआधी घरातली कामं, न्याहारी उरकायची होती. चार कच्ची बच्ची एकमेकांना बिलगून झोपलेली तिने पाहिली. त्यांच्या अंगावर धडूतं पांघरून तिने कामाचा सपाटा लावला. पोती घरात आणेपर्यंत सूर्य मध्यानी आलेला होता. चार घास पोरांच्या तोंडी, दोन स्वतःच्या तोंडी घालून तिने भांडी घासली आणि पोरांनी ती जागच्या जागी रचून ठेवली. पोरं उंडारली. तारेचं भेंडोळं, मिरच्या, लिंबू तिने मोकळे केले, सुरी घेतली आणि फतकल मारून बसली. तार मापून तिला एका अंगाला वळण देऊन तिने रचून ठेवले. कोळश्याची टोपली घेतली आणि एक एक तुकडा फोडत गेली. हात, नेसण काळे काळे झाले. तारेत एक एक तुकडा कोळश्याचा, त्यावर एक लिंबू आणि पाच मिरच्या ओवत गेली. टोपली भरत गेली. शनिवार ना कर्त्याचा वार हे लिंबू, मिरच्या कर्त्याचा करतात. झोपडी मिरच्याच्या ठसक्याने भरून गेली. तरी ती टोपल्या भरत गेली. शनिवारची सकाळ सगळ्यांच्या कामाची. प्रत्येकाला एक एक टोपली तिने दिली. झोपडीला अडसर घातला आणि ती हमरस्त्यावर आली. सिग्नल पडत होता, थांबत होता. चार रस्त्यावर चार कच्चे बच्चे रिक्षा, गाडीच्या मागे धावत होते. दोन दोन रुपयाला ना कर्त्याचा वार कर्त्याचा करण्यासाठी. जे शुभ, अशुभ मानणारे होते ते गाडीला मारच्या लिंबाचा आकडा लावून घेत होते. सिग्नल मिळाला की गाड्या सुसाट होत होत्या. तो बच्चा “घ्या की साहेब, दोन रुपये फक्त.” असं म्हणत गाडीच्या मागे धावत होता. गाडीवाला कावला आणि “लाव आकडा” असं म्हणाला. तो खूष झाला. आकडा लावला बम्परला आणि पिवळा सिग्नल हिरवा झाला. दोन रुपये साब...असं म्हणत बंद काचेच्या गाडीमागे तो धावू लागला. ती बघत होती. त्याला जाऊ दे, थांब म्हणून ओरडत होती. गाड्यांच्या होर्नच्या आवाजात त्याला त्याच्या मायचा आवाज ऐकू आला नाही. तो धावत राहिला आणि गाडीने वेग घेतला. तो दमून थांबला, बाजूला होई पर्यंत मागून एक सुसाट गाडी, आणि मग एकच किंकाळी. त्याच्या हातातले शुभ मिरच्या लिंबाचे आकडे इतस्थः फेकले गेलेले, त्याचे मिटणारे डोळे, त्याला फक्त त्या उडवणाऱ्या गाडीच्या बम्परला लटकवलेला मिरच्या लिंबाचा हिंदकळणारा रक्ताळलेला आकडा बघणारे.... Read more....

उशीर...- vIjAy

विजय उतेकर -- हा येतो आणि सगळ गदा गदा हलवून टाकतो...वाचा विक्रम उशीर...- vIjAy चार पावलांचा प्रवास अन आता गाव लागणार होतं. इतकी पायपीट की जीव मेताकुटीला आलेला. आपल्याला तहान लागूच शकत नाही, असं काहीसं ठरवून तो नुसता पळत होता. गावकुसाजवळ शिंदीचं रान संपतं तिथं एक टेकाड लागतं. त्या टेकाडावर तो उभा राहिला नि गावाकडे पाहिलं. संध्याकाळ गडद होऊ लागलेली अन दिवे पेटू लागले होते. हत्ती गेला अन शेपूट राहिलेलं. धीर अशाच वेळी खचतो. त्याच्या पोटातला गोळा आणखी मोठा होत होता. वाटलं याच्या पुढे आपण जाऊच शकत नाही. कमरेत वाकला. दोन्ही हात गुडघ्यावर रोवून पेलून धरलं स्वत:ला. चपलेचा अंगठा तुटून लटकत होता. पँट सैलसर तोकडीच. रेघारेघांचं शर्ट. त्याचे गबाळ्यागत दुमडलेले हात. शरीर तर जाणवतच नव्हतं. छातीचा भाता नुस्ता फडफडत होता. त्यात थोडी हवा भरून पुन्हा पावलं गावाकडे ओढत धावू लागला. तसा धावतच होता तो, शिक्षणासाठी, नोकरीसाठी. घर, गाव, माणसं मागे सोडून. आज मात्र शहरातून साखरवड पर्यंत बसने. ते तालुक्याचं गाव. तिथून गावी जाणारी शेवटची एसटी हुकली. खूप गयावया केल्यावर एका दुधाच्या जीपनं सोडलं तेरणे फाट्यापर्यंत. याचं गाव तिथून नऊ किलोमीटर. तिथून मात्र तो धावत होता.... अंधार पडायच्या आत त्याला गावात पोहोचायचं होतं. नाहीतर उशीर.... उशीर... तसा झालाच होता. घराजवळ येतायेताच दुरून नजर टाकली... गर्दी ओसरली होती. पुढे न जाता तिथूनच नदीवर धावत गेला. अंधार पडला होता. काठावर लालबुंद ज्वाळांचं मोहोळ उठलं होतं. उरलेले श्वास कसेबसे पुरवत तिथवर पोहोचला. गांगरून गेलेला लहान भाऊ जवळ येत होता हेही त्याला दिसलं नाही. पेटलेल्या चितेसमोर घेरी येऊन पडण्याअगोदर एक अस्पष्ट किंकाळी त्याच्या तोडून बाहेर पडली...... आई ! Read more....

स्वयंपुर्ण? - स्वाती फडणीस

खूप महत्वाची आहे ही फिरस्ती....हे असे पाहणे..आणि ते आपल्या मनात रुजणे...हेच तर फिरास्तीचे उद्दिष्ट आहे... विक्रम स्वयंपुर्ण? - स्वाती फडणीस रस्त्यावर डांबरीकरणाचं काम चालू होतं. बाया, बाप्ये खडीने भरलेली घमेली इकडून तिकडे वाहून नेत होते. तिथे जवळच सावली बघून तान्ह्या बाळासाठी झोळ्या बांधलेल्या. झोळीत न राहण्याजोगी कच्ची बच्ची उन्हा-सावलीत जमेल तसा आपापला जीव रमवत होती. मध्येच त्यांच्यात कुरबुरी होत. शिव्यांपासून सुरुवात होऊन हातापायीवर भांडण गेलं की कामगारापैकी कोणीतरी पुढे होऊन हाताशी येईल त्याच्या पाठीत धपाटे घाले. त्याने पोरं आपली हाणामारी विसरून जात. मुले शांत झाली की थंडावलेला बाप्या पुन्हा एकदा घमेलं उचले. आणि पाट्या टाकू लागे. झोळीतलं पोर किरकिरू लागलं की मात्र त्याच्या मायेलाच पुढं व्हावं लागे. घमेलं खाली ठेवून ती पोराला झोळीतून बाहेर काढून तिथेच फतकल मारे. आणि पोराला छातीशी घेऊन तंबाखूचा बार भरायला घेई. कसला आडोसा ना आडपडदा. अशा तिच्याकडे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या कोणाची नजर गेलीच तर पचकन तंबाखूची पिक टाकून त्याला त्याची जागा दाखवून देई. की बघणाऱ्याची नजर आपसूख पापण्या ओढून घेई. तरी आज मात्र ती सारखी दिसत होती. अवघ्या चाळीस दिवसाच्या मुलीला खांद्यावर घेऊन डायपर, झबली, दुपटी असलेली पिशवी सांभाळत कामावर रुजू झालेली ती. आधीही अगदी चाळीसच दिवसांपूर्वी देखिल ती जमेल तसं काम रेटतच होती. तेव्हा तिची तान्हुली तिच्या उदरात नाळेतून मिळणारा जीवनरस निवांतपणे घेत होती. आज कार्यालयात तिमाही नियोजनाची मीटिंग. तान्हुलीची आई विभाग प्रमुख. मीटिंग नेहमीप्रमाणेच वेळेचा अंदाज चुकवत लांबत चाललेली. त्या तान्हुलीला थोडीच कळणार होती. अर्धा-पाऊण तास कसा बसा गेला असेल नसेल. तान्हुलीची चुळबुळ चालू झाली. तान्हुलीच्या आईतल्या विभाग प्रमुख कर्मचारिणीने मांडी डोलवत वेळ मारून नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तरी पुढच्या दहाव्या पंधराव्या मिनिटाला तान्हुलीचा संयम संपुष्टात आला. नाजूक आवाजातला टॅहँ सभागृहात घुमला. आता मात्र विभाग प्रमुख बाईंच्यातली आई त्यांना स्वस्थ बसू देईना. गळ्याभोवतीचा स्ट्रोल पांघरून घेत तान्हुलीची आई सर्वांना देखत तान्हुलीला पाजू लागली. सगळ्यांनी सभ्यपणे पापण्या ओढून घेतल्या. मी देखील त्यातलीच एक. मनातल्या मनात चुक, बरोबरचा वाद रंगला. तान्ह्या जीवाला आवश्यक निवांतपणा, त्याच्या आईला आवश्यक असलेले सुरक्षित, मोकळे वातावरण, स्त्री सुलभ लज्जा, पदाचा शिक्षणाचा अहंकार आणि त्याच बरोबर आईचं मन. अंगावरच पाजायचा अट्टहास? पण हे झाले माझे विचार. तिच्या बाजूने पाहताना.. दोनच दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेली एका प्रथितयश व्यावस्थापिकेची मुलाखत आठवून गेली. तिने तर बाळंतपणानंतर अवघ्या पंधराव्या दिवशी बाळाला घरी सोडून, दोन दिवसांच्या निवासी सभेत हजेरी लावून व्यावसायिक निष्ठा प्रमाणित केलेली. मोठा हुद्दा असल्याने ब्रेस्टपंपची मागणी पुरवली गेली. इथे काहीच नाही. ना घरचा आधार ना कार्यालयीन सहकार्य. यायला नकार देता आला नसता का? वेळीच उठूनही जाता आलं असतंच की.. सगळ्या आघाड्यांवर पूरं पडण्याचा अट्टहास कशासाठी..! रस्त्यावरची ती, ती तरी हे आपखुषीने करत असेल काय? या क्षणी तरी त्या सारख्याच भासतायत. अगतिक..!! स्वयंपूर्ण..? एक आल्या परिस्थितीला तोड देत आणि दुसरी परिस्थिती अोढावून घेत. स्वतःच्या मर्जीने..? Read more....

त्या बकुळीच्या झाडाखाली.............' - मृणाल वझे

मृणाल ची ही फिरस्ती प्रथमच एक काव्यात्मक फिरस्ती झाली आहे... विक्रम 'त्या बकुळीच्या झाडाखाली.............' - मृणाल वझे सकाळचे ६ वाजलेत. आज थंडी खूपच पडली आहे. मी आज तिची जरा लवकरच वाट बघते आहे . मी माझ्या वासात धुंद होऊन गेलेय. ती येईल बरोबर ७.३० वाजता. माझ्याकडे बघेल, एक दीर्घ श्वास घेईल. माझा गंध पूर्ण शरीरात साठवून घेईल. एक एक करून मला वेचेल, प्रत्येक वेळी मला वेचताना ती कोणाच्या तरी आठवणीत विरघळून जाते, दर वेळी मी तिला जागे करायचा प्रयत्न करायला जाते, पण नंतर थबकते! तिची समाधी भंग करण्याचा मला काहीच अधिकार नाही. थोड्यावेळात तिला वेळेचे भान येते, आम्हा सर्वाना आपल्यात सामावून न घेता आल्याने तिचा चेहेरा दु:खी होतो. तरीपण ती गुणगुणत उद्या यायची हमी देते !!!! 'त्या बकुळीच्या झाडाखाली.............' Read more....

खरे-खोटे – सुचिता प्रसाद घोरपडे

तशी वरवर पाहता साधी सरळ आहे ही फिरस्ती.....पण तिच्या अंतरंगात डोकावून पहिले तर...दिसणारे सत्य आणि आंतरिक सत्य ह्यातला फरक जाणवतो... विक्रम खरे-खोटे – सुचिता प्रसाद घोरपडे कोकणची ट्रीप नेहमीच एक वेगळा उत्साह आणते जीवनात.नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात काहीतरी वेगळे हवे असते ना आपल्याला.त्यामुळे ठरविले ह्यावेळी परत कोकणात ट्रीप काढायची.आणि सगळे मस्त मजा करीत निघालोही.चोहोबाजूंनी हिरवाईने नटलेली वनराई पाहून मन मोहरून जात होते.एकीकडे उंचच उंच डोंगर तर दुसरीकडे खोल खोल दरी.निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेल्या सौंदर्यावर मन थरतच नव्हते.कधी इकडे तर कधी तिकडे मन धाव घेत होते.आणि कोकणच्या मेवाची तरच बातच निराळी.आता दुपार झाली होती त्यामुळे पोटात कावळे ओरडायले लागले होते.एक सुंदरसे हॉटेल पाहून जेवणास थांबलो.तिथे जेवण इतके मस्त होते की तृप्तीची ढेकर आली.सोलकढीने तर अमृताची सर आणली.जेवण संपलेच होते इतक्यात बाहेर गलबला ऎकू आला.हॉटेल रस्त्यावरच असल्याने तिथून रस्त्यावरचे सगळे नीट दिसत होते.त्यामुळे बसलेल्या ठिकाणाहून बाहेरचा गोंधळ ऎकू येत होता. तिथे एक माणूस रस्त्यावर पडला होता व त्याचा छोटा मुलगा त्याला उठवीत होता.बहुधा तो प्यायलेला असावा, कारण त्या मुलाने त्याला उठविले की उठायचा आणि परत हेंदकाळून पडायचा. त्या मुलाची त्याला उचलायची केवीलवाणी धडपड चालू होती. ते पाहून मन हेलावत होते. आम्ही मदतीला उठणार तेवढयात काही माणसे त्या मुलाजवळ आली बहुधा त्यांना वाटत होते की हा दारूडा बाप दारू पिवून त्रास देत आहे त्या मुलाला. त्यामुळे ते त्या माणसाला थोडे ओरडून मारल्यासारखे करून उठवू लागले. तर तो छोटा मुलगा त्यांच्याच अंगावर धावून गेला व त्यांना दूर ढकलले. तोवर आम्ही सुध्दा त्याला समजावायला त्याच्या जवळ गेलो तर तो आम्हालाही ढकलू लागला, आम्ही त्यास खुप समजावयाचा प्रयत्न केला पण सगळे व्यर्थ ठरले. तो खुपच ओरडू लागला त्यामुळे नाईलाजाने आम्हाला तिथून निघावे लागले. आता पुढचा सगळा प्रवास रटाळवाणा वाटू लागला.त्या मुलाचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता.आमच्या सगळ्यांचीच अशी अवस्था झाली होती. परतताना त्याच रस्त्याने जायचे असल्याने आम्ही त्या हॉटेलमध्ये चौकशी केली.मग वेटरकडून कळाले की तो माणूस तेथील जवळच्याच वस्तीमध्ये रहातो व तो हमाली करतो,हात गाडी चालवितो.खुप कष्ट करतो आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी.त्याने त्याला एका शाळेतही घातले आहे.त्याच्यासाठी तो रात्रंदिवस काम करतो,त्याला त्याच्या देवाघरी गेलेल्या आईचीही कमतरता त्याने कधी भासू दिली नाही.त्या मुलाच्या सगळ्या इच्छा तो पुर्ण करतो.त्यासाठी तो राब राब राबतो, ओझी उचलतो.ऊन वारा पाऊस कशाचीच पर्वा करीत नाही. पण एवढी मेहनत केल्यामुळे त्याच्या शरीरात काही त्राणच उरत नाहीत,मग अंगाचे दुखणे त्याला असह्हाय करते,त्या वेदना त्याला सहनच होत नाहीत म्हणून तो कधी कधी रात्री दारू पितो. काल रात्री त्याला इतकी दारू कोणी पाजली नाही माहीत. आता कळाले की तो छोटा मुलगा आपल्या वडीलांना का मारू देत नव्हता.रस्त्यावर पडल्यावर त्याचे वडील दारूडा बाप आहे असे जेव्हा सगळ्यांनी म्हटंले तेव्हा त्याला खुप वाईट वाटले असेल,कारण तेव्हा फक्त त्यालाच माहीत होते की त्याचा बाप दारूडा नाही तर त्याच्यासाठी झटणारा,काबाडकष्ट करणारा, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा त्याचा प्रेमळ बाप आहे. Read more....

उघडा पाऊस…..शिल्पा पै परुळेकर

अस्वस्थ केले ह्या फिरस्तीने...खूप खूप अस्वस्थ केले ..... का गुन्हा केला त्यांनी, जन्म घेण्याचा.... प्रत्येक श्वासां मध्ये, पुन्हा गुदमरण्याचा..... आहे उत्तर आपल्याकडे? विक्रम उघडा पाऊस…..शिल्पा पै परुळेकर ? पाऊस बनुन त्याच अस्तित्व, नभातुन जेव्हा बरसत हाेत... एक उघड जग त्या धुंदित, परसात एकटच भिजत हाेत.. *** वसई विरार हायवे ईथल्या ढेकाळे वरील वांद्री धरणावर फीरायला गेलाे हाेताे.किती सुंदर वातावरण,अवर्णनीय..शब्दात ही मांडता येणार नाही अस.!!!! निर्सगाच साैर्दय.पाण्यानी भरगच्च भरलेल धरण.अथांग पसरलेल्या नदिच्या पात्रावर थुयथुय नाचणारे पाण्याचे थेंब.झाडाझुडुपांनी गजबजलेल्या निर्सगरम्य सृष्टीदेविच्या लावण्यमय साैर्दयाचा आम्ही मुक्तपणे आनंद लुटत हाेताे.निर्सगाला लावण्याची जणु पर्वणीच लाभली हाेती.काेसळत्या जलधारा अंर्रमनाला स्पर्शुन जात हाेत्या.थेंबाथेंहातील पाऊसाच अस्तित्व ओंजळीत साठवुन ठेवावस वाटत हाेत. अचानक नजर एका लहान मुलावर गेली.सहा ते सात वर्षाचा असावा.डाेक्यावर प्लास्टिकची पिशवी ठेवुन धरणावर मासे पकडत हाेता. त्याला पहाताच आम्ही सर्वानी तिथे धाव घेतली. आमच्यासाठी ताे एक कुतुहलाचा विषय हाेता. पण आमचा गाेंधळ बघुन,त्याचा चेहरा मात्र प्रश्नांच्या भडीमाराने गाेंधळुन गेला.बिचारा थाेडा बावचळला.तरीही आमचा गाेधळ मात्र चालुच हाेता. पण.......!! पण त्या मुलाचा चेहरा मनावर एक अनामिक ओरखडा ओढुन गेला.किंत्येक प्रश्नांची नांदि हाेती त्याच्या चेहऱ्यावर.त्याच्या अवती भवती भिरभिरणाऱ्या असंख्य प्रश्नांच वादळ,मनाला हाेरपळुन गेल. संवेदनांची जाणिव प्रत्येकालाच असते.पण त्या काेवळ्या जिवाच्या वेदना मनाला अलवार हेलकावुन गेल्या.परिस्थिती मुळे,खेळण्याच्या वयात ही,पाेटासाठी चाललेली काेवळ्या जिवाची धडपड नजरेतुन सुटली नाही... पुढे गेलाे तर त्या ईवल्याशा गावात छाेट्या छाेट्या झाेपड्या. आदिवासी पाडा, विस ते पंचविस झाेपड्यांचा माेडक्या स्वप्नांचा व तुटलेल्या छप्परांचा. प्रत्येकांच्या अंगणा लगत वितभर शेती .....कुंपण लावलेली. माझ्यासाठी ती शेती वितभर हाेती...पण त्यांच्या साठी वर्षभराची शिदाेरी.. आम्ही पहील्या पाऊसाचा आनंद घेत भिजत हाेताे पण तिथल्या बायका..त्यांच्या झाेपडीला ठीगळ लावायला,शेतीला कुंपण लावताना भिजत हाेत्या. परसात तिचे पाय धावले, शेती सावरायला... विझलेल्या विस्तवाला, पुन्हा नवी उब द्यायला... *** पाऊस अनुभवायला,पाऊसात पाऊस बनुन साठायला गेलेली मी,तिथल्या या दृष्याने....काेसळत्या पाऊसात मनाची कडा न कडी काेरडी झाली... विस ते पंचविस झाेपड्यांचा ताे गाव,कारव्याची भिंन्त.मातीची जमिन.पाऊसात थेंब अन थेंब थिबकणारी तुटकी काैंल.कुठे कुठे म्हणुन ठीगळ लावायची.हा संसार ह्या काेसळत्या पाऊसात कसा सावरायचा..असे ना ना प्रश्न डाेक्यावर घेवुन संसाराच रहाटगाड चालवायच.आयुष्याच्या या तर्कहिन पसाऱ्यात कुठ..कुठ उघड पडायच अन कुठ झाकायच..किती ते साेसण अन किती ते भाेगण. बाहेरचा हा पाऊस, आत ही तसाच काेसळत हाेता.हा वेगळा निसर्ग माझ्या जगा पासुन उपेक्षीत हाेता.. इवले इवले त्यांचे संसार,माेजुन चार भांडी देखिल नसावित.शहरापासुन लांबलांब घर...पायवाटा देखिल थकतील इतक लांब..संसाराच ओझ डाेक्यावर घेवुन, फक्त चालत रहायच. रस्त्याला ही संभ्रम पडेल की मी किती चालु. संसाराचा सांधा जुळवत असे किती पाऊसाळे पाठशिवणिचा खेळ खेळत असतात.....!!!! जिवाला चटका लावुन साेडणारी, कल्पनेला भव्य उडान द्यायला लावणारी व सहजतेने स्मरणसाखळीत गुंफली जाणारी, ही आदिवासी जिवनसरणी. मी..मी म्हणाऱ्यांची देखिल त्रेधातिरपिट ऊडुन जाईल अशी.. घरातल्यांच्या चाऱ्यासाठी रानातल्या वाऱ्यासाठी,अंगावर उन्हाचे,पाऊसाचे प्रहार झेलत पायाची चाळणी करुन रानाेमाळ जगणारी ही माणस...आज स्वत: पाहीली..पाेटासाठी दिवसभर रान तुडवणे,रात्री दमेपर्यन्त फेर धरुन नाचणे हेच त्यांच्या लेखी जिवन.. फटकारलेल्या या जिवनाचा प्रवास हा असाच चालु रहाणार का??? का गुन्हा केला त्यांनी, जन्म घेण्याचा.... प्रत्येक श्वासां मध्ये, पुन्हा गुदमरण्याचा..... पाऊस अनुभवायला गेले हाेते..पण हा उघडा पाऊस..चिखल बनुन मनात कायमचा रुतला.. Read more....

आनंद - मृणाल वझे

किती विहंगम फिरस्ती आहे ही....व्वा! आनंद लुटणे शेवटी आपल्या हातात असते...कसा कुठे....ते सुद्धा आपल्याच हातात असते... विक्रम आनंद - मृणाल वझे संध्याकाळची वेळ … घरी जायची गडबड … खरं तर खूप उशीर झालेला … पळत पळतच स्टेशनवर आले. लवकर घरी पोहोचायचे आहे. घरातली कामे डोळ्यासमोर दिसत होती. दिनू चा अभ्यास! जाताना भाजी घ्यायची आहे. इस्त्रीचे कपडे न्यायचे आहेत. काम… काम… काम ! पण अचानक एका घोळक्याने लक्ष वेधून घेतलं आणि मी थबकलेच. एखाद्या चित्रकाराने चित्र रेखाटावे तसे होते. सुर्य अस्ताला चालला होता.तिथे स्टेशनवर एक बायकांचा घोळका होता. सगळ्या नटून थटून होत्या. प्रत्येकीच्या डोक्यात गजरे होते. तोंडाला छान लिपस्टिक पावडर होती. डोक्याला रंगीबेरंगी पिना होत्या. हातात… कानात… चकाकणारे नवीन खड्यांचे चमचमते दागिने होते. पुढ्यात वेफ़र्स, केक गोळ्या, जीरागोळ्या चिंचेच्या गोळ्या असे अनेक खायचे पदार्थ होते. मधुर आवाजात त्यांचे गाणे म्हणणे पण चालले होते. मला राहवलेच नाही मी तडक त्यांच्या जवळ जाऊन पाहू लागले आणि …… माझ्या लक्षात आले कोण होत्या त्या !!! रोज गाडीत पिना, आकडे, इअररिंग्स, गळ्यातल्या माळा विकणाऱ्या होत्या त्या. गजरे विकणारी होती. वेफर्स, वडे विकणारी होती. ज्या ज्या गोष्टी गाडीत मिळतात ते सर्व विकणाऱ्या होत्या त्या !… त्या काय करत होत्या … !!!!! मला राहवलेच नाही मी अजून थोडी पुढे गेले. तेव्हा दिसले त्यांच्या मध्ये एक छान नटलेली मुलगी होती. मेहेंदी विकणारी तिच्या हातावर मेंदी काढत होती. त्या तिथेच तिचा मेंदीचा आणि संगीताचा कार्यक्रम करत होत्या. आज सगळ्यांनीच आपल्या धंद्याला २ तासाची सुट्टी दिली होती. जिने तिने आपल्या विकण्याच्या गोष्टी तिला आणि सर्वाना देवून आनद वाटला होता. तिथे त्या मुलीचे केळवण पण चालू होते. किती सुखात आणि आनंदात होत्या त्या !!! मी पण एक गाणे गुणगुणतच गाडीत गर्दीत मुसंडी मारली. आज ह्या गर्दीचा मला अजिबातच त्रास होत नव्हता. वाऱ्यावर झुलतच होते …! Read more....

गर्दीचा मुखवटा - विनया पिंपळे

किती सुंदर लिहीले आहे..मुखवटे चढवूनच जगावे लागावे...धुमसणारी मने...ओंजळीत घेऊन जगावे लागावे.... विक्रम गर्दीचा मुखवटा - विनया पिंपळे धावपळ करत कशीबशी साडेदहाची बस गाठून मिळेल त्या जागेवर रेलून बसताना 'आता पुढचा दीड तास निवांत जाणार असा एक आश्वस्त विचार तिच्या मनात डोकावतो. जवळ आलेल्या कंडक्टरला 'पास' नावाच्या कागदाचं एकदा दर्शन करवून दिलं की बसमधला नंतरचा पूर्ण वेळ फक्त तिचा आणि तिचाच असतो. ह्या गर्दीतल्या गोंगाटातही आपण आपली शांतता शोधू शकतो हा शोध तिला कधीचाच लागलाय. ती निवांत बसते. खिडकीजवळची जागा मिळाली तर अधिकच खुश होत; सीटवर रेलून बसत, डोळे मिटून, भरार वारा अंगभर झेलत स्वतःचा एकांत अधिक गडद करून घेते… ...ती खरंच खूप नशीबवान आहे. धुमसणारी मने ओंजळीत घेऊन घरात वावरणारं मौन तिच्यावर फारसं आघात करत नाही. कारण तिला तंद्रीत जगता येतं. तिच्या एकांतात ती स्वतःशी बोलू शकते..पण फक्त दीड तास! ! ...नंतर येणार्या थांब्यावर स्वतःशी चालणारे सगळे संवाद थांबतात...आजूबाजूच्या गडबड, गोंधळात तिचाही स्वर मिसळू लागतो...पण फक्त वरवर!! ... संध्याकाळी परतीच्या वाटेवरील पुन्हा एकदा दीड तासाच्या अवकाशाची वाट बघत ती सद्ध्याच्या गर्दीचा एक मुखवटा चेहर्यावर डकवते .... Read more....

कटाक्ष! - कृत्तिका शहा

फिरस्ती म्हणजे काय? ह्याचे ही फिरस्ती एक सोप्पे उत्तर आहे...शाब्बास कृत्तिका. कृत्तिका लिहिते...माझा रोजचा प्रवास फिरस्ती मुळे जास्त ओब्झर्व्हिंग झाला आहे..कुठेतरी काहीतरी सापडतय का ह्याचा शोध चालू असतो...व्वा! क्या बात है! हेच तर मला हवे होते... विक्रम कटाक्ष! - कृत्तिका शहा वेळ: ६-६.१५ स्थळ: अलका चौक, पुणे. अलका चौक आणि लकडी पुलाची खासियत म्हणजे चार चाकी गाड्या आणि सिग्नल वरच राहणारी गरीबी! श्रीमंती-गरीबीचं टोकाचं मन हेलावून टाकणारं दर्शन! त्या संध्याकाळी आम्ही दोघी गाडीवर सिग्नलला थांबलेलो! ५-६ वयाची ४ मुलं, आम्हाला इतक्या संध्याकाळीही हवेत गारवा जाणवत होता पण ही सारी पलटण अंगावर वितभर कपडा ओढून भिक मागत होती, त्यांच्या गरीबीपेक्षा आपल्या वाढीव गरजांना लाजवत होती! प्रत्येकाच्या पाया पडत अगदी निर्लज्ज होऊन, तेच कितीतरी वेळ चाललेलं! आयुष्यात जरासं वाकलं की काही मिळतं हे इतकं कसं अंगवळणी पडावं?? ते ही या वयात? अंगावर थंडीने पडलेली कोरड, निस्तेज झाली तरीही त्या वेगळ्याच गोंडसपणामुळे तुकतूकीत दिसणारा चेहरा! तितक्यातच त्यांना मिळालेल्या पैशाच्या झालेल्या वाटण्या, मार बसू नये म्हणून, सगळंच कळल्यासारखं. आणि शेवटचा तो कटाक्ष लाजवणारा, गोंधळलेला, परोपकाराचा, कृतज्ञतेचा थांग पत्ता न लागू देणारा! Read more....

फ्रीवे - राजश्री जोगळेकर

फ्रीवे - राजश्री जोगळेकर फ्रीवेची आणि माझी दोस्ती तशी जुनीच. मुंबईत तो हायवे होता. मला तो समुद्रासारखा अथांग वाटायचा. शिवाय सारा रस्ता तुम्हाला मोकळा, आडकाठी करायला सिग्नलच नाही. तारुण्यातील वेडी स्वप्न पाहणाऱ्या माझ्या मनाला वाटायचं, आयुष्य असच असाव, ह्या मोकळ्या रस्त्यासारख. रुढीनियामांचे, इतरांच्या अशाअपेक्षांचे लाल सिग्नल नसलेल. मग आपलं ध्येय आपण आपल्या ताकदीवर जरूर गाठू. ती मोटार जशी सुसाट धावते ना, तशीच मीही धावेन आणि सगळ्यांना मागे टाकून यश मिळवेन. अमेरिकेत आल्यावर पाहिलं तर फ्रीवेच जाळच विणलेले. खूपदा ह्या फ्रीवेवरून जायची जरुरी भासायची. मीही टेचात माझी मोटार सुसाट पळवायची. इतर मोटारी मागे पडताना पाहून एक नशा डोक्यात जायची, सर्वात आधी मुक्कामाला पोचायची. लहान मुलाला भोज्या केल्यावर जो आनंद होतो तोच आनंद माझ्या मनात असायचा. ह्या साऱ्यातून एकटेपणा कधी अंगवळणी पडला कळलच नाही. ह्या फ्रीवेवर सिग्नलसारखे अडथळे नव्हते खरे, पण सापशिडीतला साप मात्र होता, “एक्सिट”. तो तुम्हाला पार त्या फ्रीवेवरून गावात घेऊन जायचा. म्हणजे वेग कमी, सिग्नलचे अडसर वैताग साला! अशीच एकदा मी जोरात कुठेतरी निघाले होते, आणि काय झाल हे कळायच्या आत मी एक्झिटच्या वाटेवर होते. जीवाचा चडफडत झाला, आता पोचायला उशीर. थांबत थांबत जायचं. भोज्या तर विसरूनच जाव लागणार. पण चूक माझीच होती, दोष कोणाला देणार? एकदा स्वतःची चूक कबूल केली आणि मन शांत होऊन बाहेरचा परिसर न्याहाळू लागले. एका छोट्या टुमदार गावातून माझी कार जात होती. एका बाजूला नदी होती आणि दुसऱ्या बाजूला टुमदार घरे, फुलझाडांनी नटलेली. मधूनच कोणीतरी सायकल चालवीत सावकाश जात असलेला दिसायचा, जणू काही वेळ ह्याच्यासाठी थांबणारच आहे. कुठे ती फ्रीवेवरची शर्यत, “कायदा पाळ गतीचा, थांबला तो संपला” हे समजावणारी आणि कुठे हा सायकलस्वार, तिला आव्हान देणारा. मी खिडकीची काच खाली केली आणि कानावर खिदळण्याचे आवाज आले. तिकडे नदीकाठी तरुण मुलेमुली मजेत गप्पा मारत होती. काहीजण छोट्या उपहारगृहात मस्तपैकी खातपीत बसली होती. लहान मुले आपले खेळ खेळण्यात दंग होती. सगळीकडे एक छान शांतता होती. ना घाई, ना गडबड. ते पाहताना, फ्रीवेच्या शर्यतीत जाणवणारा एकटेपणा कुठे दूर पळून गेला, आणि तो आजूबाजूचा कोलाहल माझ्या मनाला शांतता देऊ लागला. आता मला प्रत्येक सिग्नल लाल असावा असे वाटू लागले. ते वातावरण अनुभवण्यासाठी. त्या वातावरणात होती मानवी अस्तित्वाची आश्वासक ऊब. मनाला आधार देणारी. वाट चुकल्याचा आनंद मनात उसळी मारू लागला. भोज्या करायला न मिळाल्याच दुक्ख दूर पळून गेल. वाटल, का त्या एका ठिकाणाकडे धावायच? लवकरात लवकर पोचायची शर्यत लावायची आणि हा वाटेवरचा आनंद नजरेआड करायचा? एका भोज्याला हात लाऊन रिकाम्या हातानी परत यायचं आणि मग परत दुसऱ्या भोज्याकडे धावायच. काय साधणार ह्यातून? त्यासाठी ह्या वाटेवरच्या आनंदाला का मुकायच? मनाला कचकन ब्रेक लागले. मी काय गमावलंय ह्याची जाणीव झाली आणि मी निश्चय केला, भोज्या करण्याला आता अवाजवी महत्व द्यायचं नाही. वाटेवरच सौंदर्य टिपत जायचं. आता मला प्रत्येक सिग्नल आवडतो आणि मी शक्यतो गावातल्या रस्त्यानेच जाते. Read more....