Blog

जयवंती - Chandrakant Bhosle

भावशाचे भाबडेपण...आजेचा जिव्हाळा...आणि बाबासाहेबांचे आयुष्यातील अढळ स्थान अत्यंत मनोरम कथा... जयवंती - चंद्रकांत धोंडीराम भोसले ... तर सकाळ पण झाली नव्हती. उजेड पण पडला नव्हता. सगळ्या दुनियेत अंधारच अंधार होता. तरी आजीन माझ्या अंगावरची गोधाडी खसकन ओढली. पण मी कशाच्या उठतोय. तसच झोपलो. उलट गार गार वाऱ्यांनी चांगलच वाटलं. मस्तच झोप यायला लागली. आजी सुकाची चांदणी का फांदनी निघाल्याच मला वरडून वरडून सांगत होती. मी म्हणलं, “ तूच पाहाय कशी दिसतीय ती. मंग मला सांग, मी उठल्यावर.” माझ्या शाळेला आज सुट्टी होती. तरी आजी मला एडपटासारखं उठवीत होती. तिचं असंच असत. जणू मला उठवून औताला जुपायचय. एडपट बैलं औत ओढतात. मी थोडाच ओढणार. अंगणातल्या पहाटच्या गार वाऱ्यात मला मस्तच झोप यायला लागली. भारीच वाटत होतं मला. झ्याक का फ्याक असत ना तसं. असंच खूप खूप खूप खूप दिवस झोपूनच राहावं; असं वाटत होतं. पण आम्हाला कोण झोपू देतंय. आजीचा शिव्या देण्याचा रट्टा झाला ना सुरु. ती सगळ्या पाठ केलेल्या शिव्या द्यायला लागली. तिचं पाठांतर खूपच दांडग. शाळेत गेली असती तर पहिल्या नंबरनी पास झाली असती. आमच्या आसपासच्या एकोणीसशे सत्तेचाळीस गावातल्या बायांपेक्षा सगळ्यात जास्त शिव्या आजीलाच येत. आमची आजी म्हणजे आजीच. बस्स. तिचे म्हणी आणि वाक्प्रचार भलतेच पाठ. पण ते शाळेत उपयोगी पडत नसत. आमच्या पोरापोरांमधे जरी वापरले तरी आमच्या मारामाऱ्या होत. जर गुरुजींनी ते तोंडी परीक्षेत मला विचारले असते; तर मी पहिल्या दणक्यात पहिल्या नंबरनी पासच झालो असतो. मस्तच झालं असत. मी सगळ्यांना मकाचे कणसच वाटले असते. ते पण एकदम कवळे कवळे. रघ्याला अन काशाला दोन दोन दिले असते. आरुणीला नसते दिले. कारण तिला मी एकदाच आजीची एकच म्हण सांगितली. तर तिनं माझ्या कानाखाली जाळच काढला. मला डोळ्यापुढ एकशे पंच्यांशी चांदण्या का फांदन्या दिसल्या. आभाळच फिरल्या सारख झालं मला. सगळी शाळा फिरल्या सारखी झाली. भोवऱ्यासारखी. गरगराच. तर आजीन मला अंथरुणातून उचलून घेतलं. शिव्या देत देतच मला अंघोळीच्या दगडावर नेऊन बसवलं. मकाचे कणीस सोलावं तसे तिनं माझ्या अंगावरचे कपडे काढून की सोलून घेतले. तरी मी डोळे उघडलेच नाही. अंघोळीच्या दगडावरच झोपलो. दगड मस्त गार गार लागत होता. आजीनं मोठ्ठ भगुलभर पाणी तापवल होत. त्यासाठी ऊसाच्या मुलुखभर खोड्क्या तिनं जाळल्या होत्या. कितीकय दिवसापासून शिवारात ऊस तोड चालू असल्यानं खोडक्याची काय कमतरताच नव्हती. ऊसाचं रान नांगरल्यावर महामूर खोडक्या आजी आणि मी गोळा करून आणायचो. आजी पाणी तापवायला कोणतंच दुसरं सरपण वापरीत नव्हती. पाणी तापवायला खोडक्या, दुध तापवायला शेवरीचे लाकडं, सयपाक करायला एड्या बाभळीच्या फांदू-या अशा तिनं जोड्या का फोड्या लावलेल्या होत्या. तर पहाटच्या गार वाऱ्यान डोळ्यावर झापडच आली. गुरकन डोळाच लागला. गोडच वाटलं मला. तेवढ्यात मला पाटात पोहोत असल्यावाणी वाटलं. आजीन माझं बखोटं धरून दगडावर बसवलं. तेंव्हा माझं सगळं अंग गरम पाण्यानं भिजलेलं मला जाणवलं. झोप खटकनच उडाली माझी. सावधच झालो मी. मी आजीला म्हणलो, “ वत पाणी अंगावर. दगडच व्हतो मी आता. व्हऊदिच तुझी हाऊस.” तर आजी म्हणली, “ मातीकोती खेळून काळा कुटकुटीत झालास भावशा. दगडांनीच घाशिते मी तुला आता.” एवढ म्हणती कुठं नाहीतर लागली ना घासायला. त्या खरबूडया दगडानी. माझ्या सगळ्या सगळ्या अंगाची आगाग होऊ लागली. अंगावरच सगळं कातडं सोलून निघतंय की काय असं वाटू लागलं. मग मी घंगाळ्यातलं पाणी माझ्या दोन्ही दोन्ही हातांनी तिच्या तोंडावर फेकू लागलो. पण तिनं मला काय जुमानलच नाही. एका हातानी मला पक्क धरून माझं सारं अंग तिनं घासुनच काढलं. मग सगळं अंग हातानी खसाखसा धुऊन काढलं. मी तिला माझ्या हातांनी मारीत राहिलो. पण तिच्या ताकदीपुढे माझं काहीच चाललं नाही. आजी खरंच लय लय ताकदवान. घंगाळभर पाणी संपलं. तिच्या जुन्या लुगड्याचं एक मस्त पटकूर तिनं माझ्या अंगावर दिलं. त्या पटकूरात मला पायापासून डोक्यापर्यंत गुंडाळून घेतलं. लाकडाच्या बाहुलीला लुगडं नेसवल्या सारखं. नेसलेल्या लुगड्याच्या पदरानं खसाखसाच माझं डोकं पुसलं. टकलाला मस्तच वाटलं. काल अंक्यांन माझं इथून तिथून टक्कल केलं होतं. चव्वेचाळीस वेळा त्यानं दोन्ही हातांनी माझं डोकं धरून इकड तिकड फिरवलं. आम्हाला रागच आला. आम्ही त्याचा कान दातखावून ओढला. टक्कल केल्यावर आम्ही खूप खूप वेळा एडपट सारखं टकलावरून हात फिरवीत राहिलो. मस्तच वाटत होतं. गारीगार खाल्ल्यासारखं. एकदम गारिगारच. आजी म्हणली, “ चाल आता घरात. खमीस घाल. इजार घाल.” पण मी काय जागचा हाललो नाही. पाभरीच्या रुमण्यासारखा दगडावरच उभा राहिलो. ती मला परत चाल म्हणली. मी म्हणलो, “ उचलून घी मला.” मग तिनं मला नवरीसारखं खांद्यावर उचलून घेतलं. घरात जातांना म्हणली, “ आता आमच्या नवरीला गंद पावडर करायची. नवे कपडे घालायचे. मंग जयवंती करायची.” “ आई, कोण ग जयवंती. ?” गुमटून मुमटून बसून मी आजीला विचारलं. तर आजी म्हणली, “ आज जयवंती हाये भावशा. आंबेडकर बाबाची जयवंती. म्हणून त घासून घुसून आन्घूळ घातलीय तुला.” आजीन खरबुडया दगडान चांगलीच घासून घुसून आंघोळ घातल्यानी माझ्या साऱ्या साऱ्या अंगाची आगाग होत होती. दगडांनी रगडून घासल्यांनी अंगाचे सालपट सोलून निघाले होते. एडपट अंग चूरचुरायला लागलं होतं. “ आई, अंगाला जरा गुळ चोळिती का ! लयच अंगाची आग व्हयाला लागलीय.” मी आजीला म्हणलो. तर आजी माझ्यावर डाफरलीच. म्हणली,” भावशा, एड्यावाणी गुळ अंगाला लावित्यात का...! आगाग व्हईन सगळ्या अंगाची.” मंग तिनं माझ्या अंगावरच पटकूर ओढलं. माझ्या सगळ्या अंगाला खोबऱ्याच तेल खसाखसा चोळलं. म्हणली, “ भावशा आता आग नही व्हणार.” पण तिच्या खरबूडया हातांनी आणखीनच अंग सोलल्यासारखं झालं. दगड तरी बरे असे तिचे हात. अंगावर फणीन खाजवल्या सारखं वाटायचं. तिच्या हातातून सुटून पहाटच्या गार वाऱ्यात मी पळालो. तर चिम्या पण माझ्या मागं पळाला. मी चिम्या सोबत उघडं नागडच पळापळी खेळू लागलो. आजीन चीम्याला हाक मारली. चिम्या शेपटी उडवीत आजी जवळ जावून उभा राहिला. मी चीम्याला बोलावलं: तर माझ्याकडे येयीना. मग मी जोरात पळत जाऊन त्याला धडकलो. ठोसच दिली मी त्याला. त्याच्या अंगावरून उडून मी उलटा पालटा पडणार तर, आजीनं मला वरच्या वर चेंडू सारखं धरलं. धरलं कश्याच झेलून घेतलं. मस्तच वाटलं मला. पाण्यातल्या माश्यावाणी, लय भारी. आजीनं बुचकुलभर गुळ घालून मस्तच चहा केला. माझ्यासाठी भल्या पहाटीच तिनं दुध तापवून ठेवलं होत. पण मला चहाच लय भारी वाटत होता. मी मोट्टी ताटली भरून चहा पिलो. तरी आजीनं ते एडपट दुध जरा जास्तच ओतल होतं माझ्या चहात. मी आजीला म्हणलो, “ आई, मला लय लय लय लय लय लय लय चहा दी.” चहा पिऊन कपडे घालून मी जरासाक बसलो. तर माझ्या डोक्यात जयवंतीचा भुंगा लागला गुंssssssगुंssssssssगुंsssss करायला. मला कुठं गपचीप बसवतय. मी आजीला विचारलं, “ आग आई, ही जयवंती कोण असती ग.?” “ अरे भावशा, आजच्या दिशी आंबेडकर बाबा जलामलेत ना; म्हणून जयवंती.” आजी म्हणली. माझ्या डोक्यात आता जयवंती गप्पकन घुसली. डाल्याखाली कोंबडी गप्पकन घुसतीना, तशी. मग मी आजीला म्हणलो, “ अग आई, तिला जयवंती म्हणत नसत्यात. जयंती म्हणत्यात.” तेंव्हा आजी आनंदाने म्हणली, “ हा बाबा. तीच जयवंती.” “ आई, आमच्या शाळेत बी करत्यात जयंती.” मी म्हणलो. “ आंबेडकर बाबाची जयवंती करत्यात का.?” आजीन मला विचारलं. “ अग आई,आंबेडकर बाबाची नय. ते नय का, शेंगांचे टरकालं येचून टाकायला नय म्हणत्यात. गुरुजीन सांगितल्यालं ऐकत नही, त्यांची.” मी तिला माहिती का फाईती दिली. “ अरे भावशा, आंबेडकर बाबा गुरुजीच ऐकायचे. तू बी ऐकत जाय बाबा. चांगलं व्हत असत.” आजीन लयच कळकळीन सांगितलं मला. आजून जळत असलेली चिमणी मला तिच्या दोन्हीच्या दोन्ही डोळ्यात दिसली. मी एडपट सारखं पहातच राहिलो. आमच्या शाळेत गुरुजी गांधी जयंतीपण साजरी करतात. आमच्या गावातला उम्या डव्हार बापूजींचा खूपच भक्त का फक्त. नेहमी तो धोतराच एक पटकूर नेसूनच गावभर हिंडायचा. लोकांना म्हणायचा, “ आपले एवढे मोठे बापु जिंदगीभर दोनच पटकूरात राह्यले. मोठ्या माणसाची बराबरी नको; म्हणून म्या एकाच पटकूरात रहातो. म्या आदर्श घेतलाय बापूचा.” त्याच्याकड धोतराच एक पटकूर घ्यायलाही पैसे नसायचे, हे काय तो लोकांना सांगत नसायचा. गावातले लोकं त्याला आदर्श उम्या डव्हार याच नावाने ओळखायचे. तर या दोन जयवंत्या का फयवन्त्या शाळेत होत असल्यानं मला चांगल्याच माहित होत्या. जयवंतीच्या दिवशी सकाळी सकाळीच आम्ही शाळेचे पोरं मोठ्ठी रांग करून गावात हिंडायचो. जयजयकाराच्या घोषणा द्यायचो. मग वर्गाच्या पुढच्या वाळूत दोन खुडच्या ठेवायच्या. मोडक्या खुड्चीवर फोटो ठेवायचा. त्या फोटोला पोरांनी इकडून तिकडून आणलेल्या फुलांचा हार घालायचा. उदबत्ती लावायची. गुलाल लावायचा. शेजारच्या चांगल्या खुडचीवर गुरुजी बसणार. मग पोरांच्या भाषणाला झालीच सुरुवात. लय पोरं “ गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो ” एवढच म्हणून खाली बसायचे. आठ दिवस गुरुजीनी घोटून पाठ करून घेतलेलं भाषेन ते विसरून जायचे. जयवंती झाल्यावर गुरुजी वल्या तरवडाच्या फोकान “ गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो ” वाल्याच्या टिरी हाणायचे. अगोदरच टिंगरावर चड्ड्या फाटक्या. एका फोकाच्या फटक्यात पोरं दुमतेचे तीमते व्हायचे. म्हणून जयवंती माझ्या डोक्यात पक्की फिट बसलेली. आजीला मी बे साती चौदा वेळा सांगितलं. तरी ती जयंतीला जयवंतीच म्हणती. “ आई, मला आंबेडकर बाबा कसे व्हते ते सांग. म्या आंबेडकर बाबा पाह्यलेच नय ना.” मी आजीला विचारलं. “ भावशा, आंबेडकर बाबा आबेडकर बाबा वाणीच. मी तुला त्याह्यचा फोटू दाविते ना..” अस म्हणून आजी तटकन उठली. तिच्या त्या कळकट प्राचीन पेटीत ती उचक पाचक करू लागली. मी म्हणलो, “ आई, मला फोटू दाखव पटकन.” तर ती म्हणली, “ थांब. जरा कळ काढ. म्या मोगलाईतून बाबाचं पुस्ताक तुला वाचायला आणलंय. पण ते मी तुला बाबाच्या जयवंतीच्या दिशी द्यावा आस योजून ठिवलं व्हतं. तव्हा ते मी आत्ता तुला देते.” आस म्हणून तीनं कागदाच्या लय भारी पुडक्यात गोडवाणी बांधेल पुस्तक मला दिलं. हातात घेतल्यावर लयच जड लागलं ते. मी कर्कन वाकलोच. मी तिला म्हणलो, “ आई, आंबेडकर बाबा लय जड हाये ग...!” “ भावशा, आंबेडकर बाबा काय हलके नौते. ते इठाल्या बड्या बड्यानला ठेपले नही.” एवढं बोलून ती जरा शांत बसली. घराच्या वास्याकड पहात ती म्हणली, “ त्यानं आपल्याला कुत्र्या मांजराच्या जिण्यातून माणसात आणलं. तो नसता तर त्याची जयवंती झाली झाली नसती. तुला नवे कपडे मिळाले नसते. आपल्याला इज्जतीन पेयाला पाणी मिळालं नसतं. आपुन जनवारच राहिलो असतो रानचे.” आजी लय काय काय गुरुजीवाणी बोलत होती. ऐकतच रहावा असं वाटत होत. एडपट सारखी आजी एवढी हुशार आसण आस वाटतच नव्हतं. तर आजीन दिलेलं पुडक का फुडक कुणीकडून फोडावा...! कायच समजांना. सगळीकडून ते एकदम प्याकबंद होतं. माझं डोकच चालाना. मी ते आजीकड दिल. तिला सुद्धा काय उमजणा. मग मला म्हणली, “ भावशा, वरचा काय पेपराचा कागोद हाये. टाक फाडून.” ती असं म्हणती कुठ नाही तर मी कागद टरकणच फाडला. पुस्तकच काढलं त्याच्यातून मी. कोरंखट्ट पुस्तक. हे ssssssssss टप्पूरंच.... टप्पूरं..! त्याचा वास पण मस्तच येत होता. मी लय वास घेतला. मस्त मस्त मस्त मस्त मस्तच वाटत होतं. पुस्तकावरचा फोटू, निळा कोट, कोटाला दोन पेन. एकाची शाई संपली का लगेच दुसऱ्या पेणनं लिहायचं. आडून पडायचं नाही. ( असं आजी म्हणली.) लाल टीपक्याची टाय, काळेभोर केस. “ पहाय किती उच कपाळ व्हतं आंबेडकर बाबाच.’’ आजी म्हणली. “ आई, आंबेडकर बाबा माझ्याकडच पहात्यात तस्म्यातून.” मी म्हणलो. मग आजीन पुस्ताक हातात घेवून पाहिलं. तर आंबेडकर बाबा तिच्याकडच पाहात्यात असं तिला वाटलं. मग आम्ही पुस्तक बाजरीच्या पोत्यावर ठिवून लांब जावून पाहिलं. तर आंबेडकर बाबा एकाच वक्ताला आम्हा दोघांकड पहात्यात असं आम्हाला दिसलं. तर आजी म्हणली, “ भावशा, बाबा एक्याच वक्ताला सगळ्यांकड ध्यान देत्यात. म्हणून सतत सगळ्याकडच पहात्यात. “ आजीच खरच असणार म्हणा. ती नाही म्हणता म्हणता खूप खूप खूप हुशार झालीय. ती मला म्हणली, “ चाल भावशा, उठ. उभा राहाय. आंबेडकर बाबाला जयभीम कर.” “ आई, जयभीम कसा करायचा पण ?” मी गोंधळून आजीला विचारलं. “सव्वीस जानेवारीला झेंड्याला करतोस ना, तसा कर.” आजी म्हणाली. मी मनानेच शाळेत होवून गेलेल्या सव्वीस जानेवारीत गेलो. मला ‘एकसाथ राष्ट्रीय झंडेको सलामी देंगे सालामी दो’ खडखडाच आठवलं. मी आजीला म्हणालो, “ देवळीत पुस्तक ठिव. मी जयभीम करतो.” तिनं देवळीत नीटनेटकं पुस्तक ठेवलं.तेंव्हा आंबेडकर बाबा नजर न हटवता माझ्याकडेच पहात होते. मला लयच बर वाटलं. मी सावधानमधी उभ राहिलो. “जयहिंद” म्हणून झेंड्याला सलामी देतात तशी मी बाबाला जयभीमची सलामी दिली. आजी खुदकनच हसली. तिने माझे मटामटा मुकेच घेतले. जयभीममधी ताकद असल्यावानीच मला वाटायला लागलं. आजीन पण हात जोडून डोकं टेकवून ‘जयभीम’ केला. आता चांगलच उजाडलं होतं. आम्ही शेळयांपुढ गवत टाकलं. गाईला वाढे टाकले. कोंबडयांना बाजरी टाकली. माझ्यापुढ शेपटी हालवीत उभा राहेल चीम्याला दुध-भाकरीचा काला दिला. पुस्तक घेवून मग मी बकानाच्या फांदीवर जावून बसलो. पुस्तक नीटच न्याहाळून पाहू लागलो.आंबेडकर बाबाचा फोटू निरखू निरखू पाहू लागलो. पुस्तक जवळ धरून, लांब धरून. तर मला आंबेडकर बाबाचे कपडे भलते आवडले. म्हणजे खूप म्हणजे खूपच. म्हणजे बकानाच्या झाडापेक्षा जास्ती. तसे कपडे आमच्याकड फक्त फादर बाखरच घालतात. ते कोट, टाय असच. ते नेहमी आमच्या गावात, वावरात, वस्तीवर येतात. त्यांची ती ढूर्रssssss ढूर्रssssssss जीपकार का फिपकार घेवून येतात. सा-या सा-या दुनियेत हिंडतात ते. माझ्यासारखे बिट्टे बिट्टे बारके पोरं त्यांचे चांगले मित्र. काशा तर त्यांच्या खांद्यावरच बसतो. मी काय फक्त त्यांच्या टायला लोंबकाळून झोका खेळतो. आम्ही सगळे शेंबडे-मेमब्डे पोरं मातीत खेळून खेळून ढवळे फटक झालेले आसतो. मात्र फादरच्या कपड्यांचा पार चुराडा करून टाकितो आम्ही. तरी ते काय म्हणत नाहीत पोरांना. उलट सतरा पोरांना उचलून घेतात. पोरांना एका ठिकाणी गोळा करतात. सगळे एडपट पोरं गोळा झाल्यावर ते गोष्टी सांगतात. गाणे शिकवितात. गाणे म्हणताना पोरांसोबत नाचतात. त्यावेळी खूप खूप खूप भारी वाटत. गाण्याच्या आवाजान सारं रान भरून जातं. पोरं गाण्यात एकदम तल्लीन का फल्लीन होतात, असं एकदा गुरुजी म्हणत होते. मग फादर झाडाखालीच सगळ्या पोरांना खावू देण्याअगोदर प्रेयर करतात. प्रेयर म्हणजे प्रेयरच असती. आपण पाणी पितो ना, तशी प्रेयर आपल्या एकदम आत आत घुसत जाती. खोल खोल पोटात जाती. छाताडाच्या मधी जावून ती पोरांना गदगदा हालवते. फादरच्या आवाजाची जादू लय न्यारी. माणूस आतून बाहेरून प्रेयरच्या हवाली होणार, म्हणजे होणारच. फादर बाखरच ते. जर्मनीतून आलेत. टिंगल नही. आंबेडकर बाबाच्या टाय मधल्या लाल टिपक्या सारखा त्यांचा रंग, लालजरत. त्यांचा आवाज म्हणजे दुथडी भरून वहाणाऱ्या नदीच्या हवार पाण्यासारखा.... कानात घुमतच रहाणारा. सारखा ऐकावा वाटणार म्हणजे वाटणारच. तर मी आजीला विचारलंच. म्हणलो, “ आई, आंबेडकर बाबा फादर वाणीच दिसत्यात.” तर आजी म्हणली, “ भावशा, आंबेडकर बाबा म्हंजी फादरचा फादर...!” मी जरा फोटूकड पहात कधी नाही तो विचार करायला लागलो. बाखर फादरचा फादर म्हणजे लयच मोठा. बकाणा एवढा. पण बकानात आणि माणसात जमीन आसमानचा फरक रहातो, असं आजी म्हणती. म्हणून मी जरा दुसऱ्या वाटांनी विचार करायला लागलो. एडपट डोकं डोंगर, आभाळ, नदी, चंद्र, चांदण्या, सूर्य असं कुठ कुठ भटकायला लागलं. मग मी तो विचार करायचा सोडूनच दिला. उगच नको म्हणलं डोक्याला ताप. पुस्तकात काय लिहिलंय ते पहावा, म्हणून मी बकानावरून खाली उतरलो. बकानाखालच्या मातीत एक पोतं टाकलं. रुबाबशीर बसलो. चिम्या माझ्या शेजारी येवून बसला. पुस्तकातलं काही वाचता येतंय का ते पाहू लागलो. वाचू लागलो. आमचं वाचन तसं भारीच. आमचे गुरुजी आमच्याकडून कविता पाठ करून घ्य्यायचे. धडे पाठ करून घ्यायचे. पुस्तक न वाचता पोरांचं सारं सारं पुस्तक पाठ म्हणजे पाठच व्हायचं. पुस्तकातल्या कवितेच्या नाहीतर धड्याच्या ओळीवर बोट ठेवून वाच. असं कोणी म्हणल्यावर आमची दातखीळ बसणारच, याची बारा आणे ग्यारंटी. कधी कधी हिम्मत करून आम्ही ओळीवर बोट ठेवून वाचणार. पण बोट आमचं रहायचं पहिल्या ओळीवर आणि वाचून धडा संपलेला असायचा.गंमतच. आमचं वाचन पुस्तक बंद असतांनाच व्हायचं. हे आजीला सुद्धा डीक्टो माहिती. तर पुस्तकावर फोटुखाली ढबाड्या अक्षरात लिहिलेलं होतं. त्याच्यातल काही मी वाचण्याच धाडस केलं. ते आजीला झटक्यात वाचून दाखवावं असं मला वाटलं. पण ते वाचायला लागलो, तर आजी म्हणते तशी माझी दातखीळ बसली. ज्यामच एकदम. माझं थोबाड का फिबाड उचकाटानाच. बिल्या मांजरी सारखी गत झाली माझी. उगं भीटीभीटी पहात बसलो मी आमच्या शिंगरी शेळीकड. ती गवात खात होती. मला एडपट सारखं तिच्या पुढ जाऊन गवत खावा असं वाटलं. पुस्तकावरच आणि पुस्तकातलं काहीच वाचता येयीना मला. पुस्तकात सगळी उजळणीच लिहून काढलीय असं मला वाटल. ओळखू न येणारी उजळणी. माझा वाचनाचा आटोकाट प्रयत्न चालू होता. तर मारती काळ्याचा सुक्या आला. जर तो शेळी तर मी ससा अस आम्ही दिसण्यात होतो. आर्धा पायनडेल मारीत मारीत आणलेली सायकल त्यानं उभी केली. माझ्या हातातलं पुस्तक पाहून तो म्हणला, “ भावशा कंच पुस्ताक वाचितोस रे...! लयच ढोल पुस्ताक हाये रे भो.” एवढ म्हणून त्यानं माझ्या हातातून पुस्तक ओढूनच घेतलं. पुस्तक पाहून तो म्हणला,“ अरे हे विंग्लिश पुस्ताक हाये भो. तू काय वाचणार हायेस... ढेकळ !’’ सुक्या कोल्हारच्या न्यू. इंग्लिश स्कूल मधे शिकत होता. आठवीला होता तो. तो सांगायचा, “ आम्हाला आता कंडेन्स कोर्स विंग्लिश हाये.” आमच्या पुढ तो त्याच्या पुस्तकातलं काय काय वाचायचा. आम्ही उगं कान पाडून भेदरलेल्या मांजरा सारखं ऐकायचो. या ढबू पुस्तकातलं मला काहीच वाचता येयीना. आडाण्यावाणीच माझी गत झाली. आजीसारखीच. आजी आडाणी गोळाच. मालाही मी आडाणी गोळा असल्यावाणी वाटू लागलो. तर त्याला मी म्हणलो, “ सुक्या, आंबेडकर बाबाच्या फोटूपशी काय लिव्हलंय, जरा वाचून दाखवितो का...!’’ तर चुलीपशी खुटपुट करीत बसल्याली आजी ओरडली, “ भावशा, तुला काय वाचता येयीना का..! तुला वाचाय करतानी त पुस्ताक आणलंय.म्हणलं, तू वाचून दाखवशिन मला.” तर आजीच ओरडण पुरं होतंय कुठ नाहीतर सुक्या म्हणला, “ जाय आय नही वाचता येणार भावशाला. विंग्लिश पुस्ताक हाये हे. आमच्या सारके कंडेन्स कोर्स वाले हुशार हुशार पोरं एरबाडून जात्यात अशा पुस्ताकाला पाहून. भावशा काय वाचीन हे.” “ सुक्या, ते फोटूपसल दाखव ना वाचून. मला लय वाचावा वाटलय. पण काय करतो, येयीनाना.” मी पुन्हा सुक्याला म्हणलो. तर सुक्यान एक्या रट्टयात ते खडाखडा का फडाफडा वाचलं, “ डी आर टिंब बी ए बी ए एस ए एच ई बी ए एम बी ई डी के ए आर एल आई एफ ई ए एन डी एम आय एस एस आय ओ एन ” तर त्याने एका झटक्यातच वाचलं. मी एडपट सारखं पहातच राहिलो त्याच्याकड. म्हणलो, “ म्हणजे काय रे सुक्या..?” तर तो म्हणला, “अरे आम्हाला विंग्लिश वाचायला शिकवलंय. ते मराठीत कसं करायचं ते नै न शिकावल आजून. सर म्हणले दोन्ही लिप्या पाठ झाल्यावर शिकवू. माझ्या दोन्ही लिप्या पाठ हायेत ना. म्हणून म्या सगळं खडाखडाच वाचलं. भावशा, खूप आभ्यास करावा लागतो भो. मी चिमणी उशाला घेवून रातरात आभ्यास करतो. “ सायकलच्याच पायेन्डेलवर पाय ठेवून सुक्या खूप म्हणजे खूप म्हणजे खूप बोलत होता. तर आजीन हाक मारली. मला म्हणली, “ झिरमाळ्या लावायच्यात दारापुढ. जाय व्हय लवकर दुकानातून दो-याचा बिंडल आण.” एवढ म्हणून तिनं चार आणे माझ्या हातावर टेकवले. मी लगेच ते हारवतीन म्हणून तोंडात टाकले. नवे कोरे कपडे अंगात घातले. ( मी कशाचे घातले, आजींच अंगात ओवले.) सात वेळा ढूर्रsssssssss ढूर्रssssssss करून जीपकार चालू केली. एकदम दामटीतच नेली मी जीपकार. कुठंच उभी नाही केली. थेट गुलूकाकाच्या दुकानापुढच. गुलूकाका म्हणला, “आज लय नवे कपडे घातलेस भावशा...! दिवाळी बिवाळी हाये का काय आज?” मी म्हणलो, “ आज आमच्या आंबेडकर बाबाची जयंती हाये.” दुकानातून चार आण्याचा दोऱ्याचा बिंडल घेवून रप्पासमधी माझी जीपकार घराकडे निघाली. तर रस्त्यात काशाची जीपकार जोरातच येत होती. दोन्ही जीपकारी ठोस होता होता वाचल्या.एकमेकीपुढ उभ्याच केल्या आम्ही. ब्रेकच दाबल आम्ही दातखावून. तर काशा म्हणला, “ सकाळच्या चहाला गुळ नौता.आई म्हणली, ‘लवकर जाय अन आठ आण्याचा गुळ आण.’ तव्हा निघालोय.” “ आमच्या घरी जयंती हाये. आंबेडकरबाबाची. माझी आजी भाषेन करणार हाये. झिरमाळ्या लावायच्यात. तू लवकर यी जयंतीला.” मी जीप्कार चालू ठेवूनच बोलत होतो. “ आपल्या वर्गातल्या पोरांना घेवून येतो मी.” अस म्हणून त्याची जीप्कार धुमाट गेली. आमची जीप्कार घरी आली. आजीनं मोगलाईतून खूप खूप रंगीबेरंगी झिरमाळ्या आणल्या होत्या. मला ते रंग लयच आवडले. मस्तच होते ते. आम्ही दोघांनी अगोदर दोरा घर-बकाण-बाभूळ असा बांधून घेतला. गव्हाच्या पिठाची खळ केली. दोऱ्यावर शेजवार रंगीबेरंगी झिरमाळ्या चिकटवल्या.आमच आंगण लयच गोड दिसायला लागलं. खूप मस्त. आंबेडकर बाबा घरी आल्यावाणीच वाटलं मला. आजी आज नेहमी सारखं तिरंगी लुगडं नेसलीच नव्हती. इथून तिथून एकदम एकरंगीच होत ते आजी आज नेशेल लुगडं. आंबेडकर बाबाच्या कोटावानी. एकदम नीळंनीळं. माझी एकट्याची काळी कुळकुळीत आजी लय न्यारी दिसत होती. मग मी सुद्धा तिला सव्वीस जानेवारी सारखा जयभीम करून सलामी दिली. आम्ही बाभळीची मोठ्ठी गंड्डी लोटून भिंतीला उभी करून ठेवली. आजी मला म्हणली, “ जाय,... तुझ्या सोबत्यांना बोलवून आण.” “काशा घेवून येणार हाये सर्व्यांना. तो मला म्हणलाय.” मी आजीला सांगितलं. तेवढ्यात काशा, दत्या, आंब्या, राम्या, रघ्या, सुब्या आणि मध्या गायीच्या वासरा सारखे हुंदडत हुंदडत आलेच. आल्या आल्याच कामाला लागले. आम्ही साऱ्या अंगणात चारीच पाणी मारलं. सगळं सगळं आंगण ओलचिंब करून टाकलं. चढत्या उन्हात एकदम गार गार आणि आल्हाद दायक वाटू लागलं. काम आवरल्यावर आम्ही सगळे बकानाच्या पारावर बसलो. आजीनं आंबेडकर बाबाचं पुस्तक फोटू ठेवल्या सारखं बाभळीच्या गंड्डीवर ठेवलं. तसे सगळे माझे सोबती एडपट सारखे तिकडं धावले. फोटूच पाहू लागले ते नेह्ळू नेह्ळू. रघ्या म्हणला, “आस वाटतंय, आंबेडकर बाबा फोटूतून निघून लगेच बोलतीन.” दत्या म्हणला, “ आंबेडकर बाबाचं हे पुस्ताक वाचायला लागण भो. वाचायला किती का दिवस लागाना वाचावाच लागण. लय भारी आसण.” आजीन तिच्या हातांनी करेल फुलांचा हार आंबेडकर बाबाला घातला. मेणबत्ती लावली.आम्ही सगळ्या पोरांनी आंबेडकर बाबाला एकसाथ जयभीम केला. एडपट सारखे आम्ही सगळे मोठ्या आवाजात एकसाथ म्हणल्याने लयच भारी म्हणजे लयच भारी वाटलं. सव्वीस जानेवारीसारखच डीक्टो. आजी म्हणाली, “पोराहो, तुम्ही तुमच्या शाळात जयवंतीच्या दिशी साऱ्या साऱ्या गावात वरडत हिंडाता. दोन दोनच्या रांगा करून. ...” ती बोलतच होती. तर मध्या मधेच म्हणाला,” आग, आई त्या घोषणा रहात्यात.” तर काशा म्हणाला, “ पहात काय उभे राहिले. द्या घोषणा.” आम्ही जीवतोडून घोषणा दिल्या, “ आंबेडकर बाबाचा, विजय असो. एक दोन तीन चार,आंबेडकर बाबाचा जयजयकार.” घोषणा देत देतच आम्ही बकाण आणि बाभळी भोवती फिरलो. थकल्यावर बकाणाच्या पारावर बसलो. मी आजीला म्हणलो, “ आई, भाषेन कर.” तर ती म्हणली, “ आंबेडकर बाबा चिक्कार शिकेल व्हते. म्हून त्याह्यनी इंग्रजी पुस्ताक लीव्हलेत. तव्हा पोराहो, लय मोठ्ठ गठुडभर शिका. तुम्हाला आंबेडकर बाबाचे पुस्ताक वाचता येवा. मला तुम्ही ते वाचून दाखवावा.” एवढ बोलून जरा ती थांबली. तिनं आंबेडकर बाबापुढ डोकं टेकवल. तिच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं. ते तिन तिच्या पदरानं पुसून घेतलं. म्हणाली, “ पोराहो, आपुन आता जयवंतीच गोड धोड करू. सगळ्यांनी दोन दोन घास खा.” आजीन बाजरीच्या भाकरी केल्या. भगुलभर गुळवणी केलं. आम्ही पोटभर खाल्ल. ढेकर येईस्तोवर गुळवणी पेलो. त्या दिवशी आम्ही दिसन त्याला जयभीम करीत होतो. सगळं सव्वीस जानेवारी सारखच वाटत होतं. Read more....

निर्ल्लज-Mukund Bhalerao

शेवटाने परिचित कथानकाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे... निर्ल्लज – मुकुंद भालेराव मी नेहमीप्रमाणे मझ्या ऑफिसमध्ये पोहचलो. साधारणतः सकाळचे नऊ वाजले असतील. आमची संस्था पुण्यात गेली २५ वर्षे कार्यरत आहे. “दुसरे घर” हे वयोवृद्धाचे आशास्थान. आमच्याकडे बरेचशे वृद्ध स्वत:होऊन आलेले आहेत. मुल शिकलीत. अमेरिकेमध्ये नोकरी करतात. पैसे पाठवतात. जणूकाही पैशाने सगळ्या गोष्टी मिळतात. “नमस्कार”.....एक वृद्ध गृहस्थ....बोलण्यावरून शिकलेले वाटत होते. “मला व माझ्या पत्नीला आपल्याकडे यायचे आहे. आमची दोन्ही मुलंल अमेरिकेत असतात. ते आम्हाला बोलावतात पण आम्हाला तिकडे करमत नाही. पैसे एकदम वर्षाचे भरण्यास तयार आहोत आम्ही.” एवढे बोलून त्यांनी चेकबुक काढले. “कितीचा चेक लिहू?” त्यानंतर, रीतसर ते आमच्याकडे रहायला आले. वरील गोष्टीला आज दहा वर्षे झालीत. आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली. ते म्हणाले मुलं अमेरिकेतून इकडे आलेली आहेत. घरीच असतील बहुधा. त्यांनी मुलाचा फोन नंबर दिला. फोन एंगेज येत होता. इतक्यात आमच्या संस्थेचे डॉक्टर आले व त्यांनी देशमुखांना तपासले. “काळजी करण्यासारखे काहीच नाही देशपांडे साहेब. हे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. मी देशमुखांना म्हणालो,”मी पुन्हा मुलाला फोन करतो”. मी त्यांच्या मुलाला फोन केला.....”आपण सदानंद देशमुखाच बोलताय नं?” “हो......का?” “मी दुसरे घर मधून बोलतोय.” “ओह...पैसे संपलेत का?” “नाही. तुमच्या बाबांना काही दिवस घरी रहावेसे वाटते. डॉक्टरही म्हणाले की थोडासा बदल उपयोगाचा ठरेल.” “ओह....पण मी सध्या पुण्यात नाही.....मी दिल्लीत आलोय एका कॉन्फरन्स करिता.....तुम्ही प्लीज काळजी घ्या ना. हवे तर मी आताच पैसे पाठवतो. किती पाठवू?” “अहो...पैसे नकोत. तुम्ही याच महिन्यात पाच लाख पाठविलेत ना....” “मी दिल्लीवरून येताच भेटतो”...इतके बोलून मुलाने फोन ठेवला. मी देशमुखांना म्हणलो, “देशमुख साहेब...आपले चिरंजीव दिल्लीला गेलेत कॉन्फरन्स करिता. आल्यावर येतो म्हणालेत. चला मीच तुम्हाला माझ्या गाडीत्तून तळ्यातल्या गणपतीला नेऊन आणतो. देशमुख म्हणाले, “देशपांडे साहेब आपण आम्हा सगळ्यांकडे किती लक्ष देता....आपले कल्याण होवो......” “मी म्हणालो,” देशमुख साहेब आपले पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत.” मी देशमुखांना व त्यांच्या सौभाग्यवतीना मागे बसविले. आम्ही कात्रज वरून निघालो. स्वारगेट जवळ सिग्नलला मी थांबलो. समोर पहिले तर श्री. सदानंद देशमूख........ओह माय!!!!!!!!!!! माझा डोळ्यांवर विश्वास बसेना.....आता थोड्यावेळापूर्वी सदानंद देशमुखांशी मी बोललो...ते म्हणाले ते दिल्लीत आहेत. मी पटकन गाडी बाजूला घेऊन उभी केली. सदानंद देशमुख मला ओळखत नव्हते, पण मी त्यांचा फोटो देशमुखांच्या फाईलमध्ये पाहिलेला होता. मी देशमुख व सौ. देशमुखांना म्हणालो, “देशमुख साहेब...चला आपण थोडे इथल्या हॉटेलमध्ये जाऊ. इथे भेळ छान मिळते. सदानंद देशमुखांचे आमच्याकडे लक्ष नव्हते. मी श्री. देशमुख व सौ देशमुखानं हात धरून सदानंद देशमुखांच्या समोर नेऊन उभे केले. “बाबा...आई....तूम्ही इथे....!!!!!!!!!!” सदानंद देशमुखांच्या तोंडून कसाबसा प्रश्न बाहेर पडला. चेहरा उतरला होता. आणि पाहता पाहता सौ देशमुख झरकन समोर गेल्या आणि काय होते ते कळायच्या आत त्यांनी सदानंदच्या तोंडात मारली. सगळे आजूबाजूचे लोक आवक होऊन पाहू लागले. देशपांडेसाहेब चला, असे म्हणून देशमुख व सौ देशमुख मागे न पाहता मझ्या गाडीच्या दिशेने चालू लागले. Read more....

ती – मृणाल वझे

मृणाल ने साधारण ती नावाची कथा लिहिली होती...ही सुद्धा त्याच नावाची होती...मी साधारण काढले आहे ह्या कथेतले...कारण तुम्ही ओळखा. ती – मृणाल वझे आज ती फार थकलेली होती. दिवस कसा शेवटाला आला हे तिला समजलाच नाही. घराकडे पाय ओढत निघाली ती! ट्रेनमध्ये शिरतानाच तिची नजर भिरभिरंत होती जागा मिळण्यासाठी! अगदी चौथी सीट सुद्धा चालली असती...! तिला फक्त शांत डोळे मिटून बसायचे होते. पाय गळून गेले होते. डब्यातल्या वरच्या हॅण्डलला धरूनधरून हातपण भरून आले होते. धावत ट्रेन पकडल्याने ' गाडीत बिस्कीट तरी खाऊ ' म्हणून ठरवलेला बिस्किटाचा पूडा घ्यायला पण वेळ मिळाला नव्हता. स्टेशने पुढे सरकत होती आणि तरीही कुठेही जागेची आशा दिसत नव्हती. मनाने शरीराने खूप थकून गेली होती ती!!! आता फक्त २ स्टेशन राहिली होती. तिला उतरल्यावरचे सगळे दिसायला लागले होते....! जाताना कायकाय न्यायचे...कायकाय संपलंय ...रिक्षा मिळेल का? सचिनचा अभ्यास....! आलोकसाठी पनीर...! इतक्यात एका बाईला तिची दया आली. तिचा मरगळलेले चेहेरा, थकलेलं शरीर..तिने तिला कोपऱ्याची जागा देऊ केली. चेहेऱ्यावर किती उपकार केल्याचे भाव! कसनुस हसत... चेहेऱ्यावर खूप उपकार झाल्याची भावना दाखवत ती सीटवर बसली आणि पाच मिनिटासाठी तरी शांत राहावे म्हणून तिने पटकन डोळे मिटून घेतले. .... डोळे मिटले खरे पण आज मन शांत होत नव्हते.... डोळ्यापुढून सकाळपासूनच्या प्रसंगाची चित्रमालिकाच सुरु झाली ..... सकाळी गजर ऐकूच आला नाही...कालचं नको असलेलं जागरण...मनचं कडू झालं तिचं! त्यामुळे भरभर आवरताना उतू गेलेले दूध....दुध पिताना सचिनने फोडलेला कप... ते दोन्ही वेळचे दुधाचे निस्तरणे...मग नावडती भाजी म्हणून आलोकने दार आपटून ऑफिसला जाणे. गिझर ऑन करायचा राहिल्याने उशीर होतो म्हणून थंडीत केलेली ती गार पाण्याची आंघोळ ... रस्त्यात रिक्षासाठी धावताना तुटलेला चपलेचा आंगठा...लागलेली ठेच.... रिक्षाच्या खिळ्यात अडकलेली आणि मग फाटलेली ओढणी...मग ट्रेन चुकणे... ऑफिसचा लेट मार्क...!!! इतक्यात गाडी शेवटच्या स्टेशनला आल्याने गाडीला आणि तिच्या विचाराला ब्रेक लागला...! डोळे चोळत तिने डोळे उघडले. भानावर आली ती. खूप बरं वाटलं तिला...कशाचं ??? जागा मिळण्याचं?..की ब्रेकमुळे पुढे दिवसभर घडलेल्या अशाच बोचणाऱ्या क्षणाच्या चित्र मालिका थांबल्याचं? ती उठली आणि सावकाश स्टेशनच्या गर्दीत मिसळून गेली ..... Read more....

क्षण-Bhagyashri Kalghatti

ही एक मनोवस्था कथा आहे...त्या क्षणाची...त्या क्षणापुर्ती ...सुंदर कथा. क्षण – भाग्यश्री कलघटटी मी उभी आहे. एका पुलावर! पुलाखालून खूप सारं पाणी वहात जातंय! पाणी आहे? की माझ्या आयुष्यातले सगळे क्षण? चांगले, वाईट , उत्कट, रागाचे, लोभाचे, अपमानाचे, विरहाचे, वात्सल्याचे., भ्रम नैराश्याचे.....अनंत! प्रत्येक क्षणा बरोबर मीच आहे. कधी दुःखी, कधी आनंदी, कधी आतुर तर कधी निराश! मी एकटी, इतकी कशी झाले?? गोळा करायला हवंय मी, माझं मलाच! उरलेच नाही मी माझ्यापाशी? वाटले गेले सगळ्या क्षणात? पिसले गेले? गोळा करायला हवं, खरच हवं ! इतकं विखरण बरं नव्हे! हे मी उचललं स्वतःला, या क्षणापासून, आणि अलगद सोडलं स्वतःच्या तुकड्याला, स्वतःमध्ये ! अरे, हा क्षण चालला सुटून, माझ्या एका भागाला घेऊन, पटकन पकडलं मी त्याला, केलं माझं मन त्यापासून सुट्ट आणि टाकलं त्याला माझ्याच मनाच्या कुपीत परत ! असे केले सगळे तुकडे एकत्र, विखुरलेले आणि दिले सोडून ते सगळे क्षण ! गेले वाहत तेही पुढे! तसं त्यांनाही नव्हतंच काही अप्रूप माझ्या असण्याचं! जे कोणी प्रवाहात असेल, त्याला भिजवायच, एवढंच काम होतं त्यांचं! मी माझं अडकलेलं मन सोडवून घेतलं , तेंव्हा फोलपणा समजून आला, त्या प्रत्येक क्षणाला फक्त आपलं समजून , अडकून रहाण्याचा! आज किती छान वाटतंय! मागून आलेल्या नव्या क्षणांचा प्रवाह , मस्त भिजवून टाकतोय, पण मन मात्र कुपीत बसलंय! सगळ्याचा आनंद घेत . Read more....

कहानी हतोड़े की-Bhagyshri Valsange

भाग्यश्री वळसंगे ने एक सुंदर कथा लिहिली आहे...खूपच बहार... कहानी हतोड़े की – भाग्यश्री वळसंगे कभी ऐसा हुआ, एक हतोड़े को पत्थर मिला कहीं हतोड़े ने सोचा, कहीं ये मेरा दोस्त तो नहीं? पास जाके देखा, पता चला इसे हतोड़े कि ही तलाश है पत्थर ने भी कहा, हाँ दोस्त, बस्स तेरी ही कमी थी नजदिकीयाँ बढी तो पता है क्या हुवा -------? पत्थर अब धिरे धिरे रूप संवरने लगा अंदरूनी सुकून भी तो ऊसीसे पनपने लगा ईधर हतोड़े का भी कुछ ऐसा ही हाल था पत्थर को निखरते देख, लुत्फ ऊसे मिला था दिन गुजरे, साल भी हुवा... पत्थर को अब एक नया चेहरा मिला दोनों ही खुशी में झुमते रहते एक-दुसरे को देख सुकून से रहते फिर.... अचानक एक दिन, पत्थर कहीं दिखा नहीं हतोडे ने बहोत ढूँडा पर कहीं मिला नहीं बेचैन सा पडा हतोड़ा, कहीं मन नही लगा 'कहाँ मै तूझे ढूँडू', सिसक के रो पडा कहीं से खबर मिली, कोई आया था और पत्थर लेकर चला गया सुना है, पैसे भी काफी मिले थे, लेन देन की बात भी चली थी ले जाने वाले को पत्थर कहाँ,........ मुरत जो मिली थी हतोड़ा सोचता ही रेह गया घाँव तो पत्थर को दिये थे, फिर ये दर्द ऊसमें कहाँ से आया था? ठनकता हुवा रेह गया हतोड़ा.. जो पाया था वही अब खोया था. Read more....

लाडू –Babarao Musale

बाबाराव मुसळे विदर्भातील ख्यातनाम साहित्यिक...त्यांनी नुक्कडवर लिहावे हा नुक्कडचा बहुमान आहे! लाडू – बाबाराव मुसळे हिवादवाची म्हातारी थरथरत गावाकडून आली. येतो, येतो म्हणता म्हणता महिना उलटून गेला. येईल तरी कशी? तुरी बडवायच्या उधड्याच्या कामातून सुटका होत नव्हती. परवा त्या कामाचा शेवट झाला. सटीसहा महिन्यानं पोराच्या, सुनंच्या, नाताच्या भेटीला जायचं तर सडी कशी जाऊ? म्हणून ती काल अनसिंगला बाजारात गेली. अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो उम्रावती साखर, पावभर बिब्याची गोडंबी घेतली. दुकानदार म्हणे म्हणून शंभर ग्रॅम काजूही घेतले. पोरासाठी, नातवासाठी लाडू करायचे म्हणून. नाहीतर एरव्ही गरिबाला काजू काय परवडतात? हिवाळा आला की, म्हातारा लाडूचं सगळं सामान आणून द्यायचा. नुसती कामाची मरमर करते. खा. काम करायला ताकद येईल, असं म्हणायचा.पोरगा एकुलता एक. शिकवला. अकोल्यात नोकरी करू लागला. म्हातारा असताना लग्न झालं. तो गेला. अन त्याच दिवशी सून बाळंतीण झाली. म्हातारीला वाटलं, नाताच्या रूपानं म्हातारा जन्माला आला. नातू दिसतोही सुद म्हातार्यासारखाच. रंग, चेहरेपट्टी. त्याला पुन्हा पुन्हा भेटावं वाटे. पण जमत नव्हतं. पोरगा म्हणे आमच्या सोबत चल. पण शहरात म्हातारीचा जीव रमत नव्हता. माय आली याचा आनंद पोराला झाला. तिनं नाही नाही म्हणे तरी नातवाचा जबरदस्ती मुका घेतला. सून मात्र अधर अधरच होती. सून अन नात्याची भुणभुण. सोबतच्या झोर्यातून लाडवाचा डबा काढला. पोरानं पटकन उचलून घेतला. नाकाला लावला. तुपाचा घमघम वास. म्हातारीनं पोराला एक लाडू दिला. नातालाही एक दिला. पण सुनेनं त्याच्या हातचा खाऊ नको म्हणून पटकन काढून घेतला. खाऊ दे गं? म्या सुदे केले. सून म्हणाली, त्याचं पोट खराब आहे. नातू रडू लागला. दुसर्याू दिवशी सकाळी म्हातारी ऊन खात अंगणात बसली. बाजूला कुत्रं उभं होतं. तेवढ्यात सुनेनं घरातून म्हातारीचा लाडवाचा डबा आणला. अन म्हातारीनं काय करतं असं विचारायच्या आत कुत्र्यासमोर उबडला. अगं अगं. म्हातारी कळवळली. सून काही ना बोलता घरात गेली. म्हातारी उठली. घरात आली. तिनं लाडवाचा डबा झोर्यात कोचला. अन पोराला म्हणाली, बाबा, चालली रे मी. पोरगा म्हणाला, काऊन मा? थांब ना चार दिवस. म्हातारी म्हणाली, नको. तुले, बाळाले पाह्यलं. माहा पोट भरलं. म्हातारी घराबाहेर पडली.अंगणात कुत्र्यानं लाडू संपवत आणले होते. म्हातारी रस्त्याला लागली. पण डोळ्यातल्या आसवांनी तिला रस्ता दिसत नव्हता. मागून पोरगा माय थांब, मी येतो स्टॅन्डलोक म्हणत येत होता. मात्र म्हातारीला काहीच ऐकू येत नव्हतं Read more....

ओळख - Manik Gharpure

ओळखणे खूप जवळ असले की कधी कधी खूप कठीण होते.... ओळख – माणिक घारपुरे आभाने गुणगुणतच स्कुटी पार्किंगमध्ये लावली .आणि तिला बाबाची गाडी आलेली दिसली . खुशच झाली ती...सगळं कसं मागील अंकावरून पुढे चालू असल्यासारखंच वाटायला लागलं होतं. पूर्वीही ती क्लास घेऊन घरी यायची तर तिच्या आधी नुकताच बाबा आलेला असायचा ... मग दोघे मिळून कॉफी प्यायचे. आई जरा उशिरानेच यायची ऑफिसमधून . आताही बाबाला आलेलं पाहून तिला वाटलं की मधले तीन महीने जसे आलेच नव्हते कधी . असा विचार येताच तिचा हात नकळत गळ्याशी असलेल्या नाजूक मंगळसूत्रावर स्थिरावला . संकेतच्या आठवणीने मोहरली ती . त्याच्याकडे जावंसंच वाटलं एकदम . पण मग आईबाबांचा चेहरा डोळ्यासमोर आला .लग्नानंतर मांडवपरतणीला ती संकेतसह दोन दिवसासाठीच आली होती . तेव्हाची ह्या दोघांची तगमग बघून तिने ठरवलं होतं की पुढल्यावेळी जास्त दिवस राहायचं . त्याप्रमाणे ती ह्यावेळी चांगली आठवडाभर राहायचं ठरवून आली होती . आईला तिला कुठे ठेऊ आणि कुठे नको असं झालं होतं . तिच्या बारीकसारीक आवडी आवर्जून पूर्ण होतील ह्याकडे आईचं लक्ष होतं . पण बाबा अजून भेटला नव्हता . ऑफिसच्या कामाने बाहेरगावी जावं लागलं होतं त्याला .जरा हिरमुसलीच होती ती . आल्यावरचे १ - २ दिवस तर ती कुठेच गेली नव्हती . तिची खोली, आवडती पुस्तकं, गाणी ह्यातच रमली. मग जरा कुठे तिला स्वतःशीच भेट झाल्यासारखं वाटलं आणि मग मित्र मैत्रिणी, गप्पांचे अड्डे आठवायला लागले. आज दिवसभर मित्रमैत्रिणींबरोबर हँगआऊट करून घरी परतली होती आत्ताच . बाबाला आलेलं बघून जामच खुश झाली. चला आख्खा दिवस मनासारखा! आता तिला फक्त तिच्या बाबाशीच बोलता येणार होतं. बाबाचं आणि तिचं फार गुळपीठ होतं. कधी आईने बाबाविषयी बोलतांना तक्रारीचा सूर लावला की खूप चिडायची ती, 'माझ्या बाबाला काही म्हणायचं नाही.' हे 'माझ्या' वर जोर देत म्हणायची. लहानपणापासूनच ती बाबावेडी होती अर्थात आईलाही त्याचं कौतुकच होतं. तिने उत्सुकतेने स्वतःजवळच्या किल्लीने दार उघडलं . आणि ' बा s बा s ' अशी हाक मारायला तोंड उघडलं तेवढ्यात तिला सेंटरटेबलच्या काचेवर कॉफीचं वर्तुळ काढत बाजूला विसावलेला, रिकामा, वाळलेला कॉफीचा मग दिसला. फॅन, टीव्ही तसाच सुरु..वर्तमानपत्र सोफ्यावर अस्ताव्यस्त फडफडत होतं. शुरॅक वर एकच बूट...दुसरा जमिनीवर कुशीवर पडलेला. ती तशीच स्वयंपाक घरात गेली तर ओटाभर कॉफी केल्याचे पुरावे पसरलेले. बेडरूममध्ये पलंगावर अंगातून उपसून काढलेले प्रवासातले कपडे तसेच, अंघोळ झाल्यावर ओल्या टॉवेलचा बोळाही पलंगावरच....आणि बाल्कनीतल्या खुर्चीत डोळे मिटून बसलेला बाबा. अगदी संकेतसारखाच! अगदी तस्साच कॉपी पेस्ट केलेला. थोडयाफार फरकाने इतक्या कश्या सारख्या सवयी दोघांच्या? तिला प्रथमच राग आला बाबाचा...घराचा अवतार बघून तिला कळतच नव्हतं की बाबाच्या ह्या सगळ्या सवयी जुन्याच तर असणार ना?..हो , होत्याच की! आठवलं तिला.... मग तिला का नाही कळल्या आजवर? ती एका नव्याच नजरेने बघू लागली बाबाकडे. पण त्याहीपेक्षा तिला आठवली आई! तिला जसा संकेतच्या ह्या सवयीचा राग येतो तसाच बाबाच्या ह्या सवयीचा आईलाही येत असणारच. गेली अनेक वर्ष..आईचं 'माणूसपण' तिला अवचित उलगडायला लागलं. अनेक गोष्टी आठवल्या. आजपर्यंत आईला किती गृहीत धरलं गेलं होतं तेही तिला समजत चाललं होतं हळूहळू. छे ! चुकलंच होतं खूप काही. पण आज आईची झालेली नवी ओळख ती आता विसरणार नव्हती कधीच. आभाने बाबाला झोपू द्यायचं ठरवलं आणि शांतपणे वर्तमानपत्राची घडी करायला घेतली...जरा घाईनेच. आई येण्यापूर्वी तिला सगळं घर आवरून ठेवायचं होतं आणि जमलं तर भाजीसुद्धा करून ठेवायची होती! Read more....

फुले-आरती देशमुख

असे काही सकाळी वाचले की समृद्ध झाल्यासारखे वाटते. आरती देशमुख..तिळगुळच्या लेखिका...कथेच्या प्रांतात सुद्धा वाह! फुले - आरती देशमुख “तात्या, अहो तात्या...”, हाक ऐकून तात्या थबकले. हातात फुलांची टोपली तशीच. काहीही न बोलता, आवाज देणाऱ्या क्षितीकडे पाहत. परागशी भांडून आणि आज तात्यांना विचारायचेच असे ठरवून हाक मारणारी क्षिती; फाटक उघडून तात्यांच्या जवळ आली. एकटेच राहणारे, कोणालाही कसलाही त्रास नसलेले, अगदी कामाशिवाय किंवा कोणी काही बोलल्याशिवाय न बोलणारे, दिवसभरात ५-१० वाक्ये मोठ्या मुश्किलीने बोलत असूनही - वेळप्रसंगी मदतीला तत्पर, चहाड्या नाही, मागण्या नाहीत, सोशिक - सालस- सभ्य - सात्विक- ... त्यामुळे तात्यांचा एक अबोल धाक वस्तीवर. तरीही, अशा तात्यांना आज विचारायचेच म्हणून हिय्या केलेली क्षिती त्यांच्यापुढे उभी होती. `तात्या, मी रोज पाहते... तुम्ही सगळीकडची सगळी फुले का तोडून घेता?' `मी खूप उशिरा, म्हणजे सगळ्यांची तोडून झाल्यावर राहिलेली आणि मुख्य म्हणजे फक्त बाहेर आलेल्या फांद्यांचीच फुलं तोडतो बाळा.' `ते ठीक आहे हो. पण मी म्हणते का? एवढी फुलं कशाला लागतात तुम्हाला? काय करता एवढ्या फुलांचं? ना देवपूजेला एवढी फुलं लागत, ना तुमच्याकडे कोणी माळा करणारं, ना गजरे-वेण्या करणारं !!' बाळा संबोधन ऐकल्याने, आवाजात किंचित नरमाई आणून क्षिती म्हणाली. `तुझं सगळं खरं आहे बाळ. पण मी त्यासाठी तोडतच नाही फुलं. कोणी प्रेमाने खुडून जवळ न घेता तसंच राहू देणाऱ्या त्या फुलांना काय वाटत असेल? म्हणून तोडून जवळ घेतो मी त्यांना. माझ्याशिवाय कोणाला ठाऊक असेल त्यांचं दु:ख? पण तू म्हणतेस तर नाही तोडणार...' तात्या क्षितीकडे पाठ फिरवून चालू लागले. - आरती देशमुख Read more....

ती–नेहा लिमये

किती तरल गोष्ट आहे ही..नेहा जियो...खूप आवडली...आजचा दिवस दोन लेखिका साजरा करीत आहेत. व्वा! ती – नेहा लिमये ती मोलमजुरीच काम करते...तिच्या श्वासातून दगड, विटा, वाळू, सिमेंट, खडी यांचा वास भरून राहिलाय. इलेक्ट्रिकच्या वायर, खिळे, फरश्या, पीओपी यात तिने एक आडोसा शोधलाय. त्यात तिने पत्र्याच्या घरात संसार मांडलाय. रोज पहाटे उठून ती स्टोव्ह वर आधण ठेवते आणि 'ह्यांना' तार स्वरात हाक मारते. आजूबाजूचं जग साखरझोपेत असताना ती राखेचा लेप हाताला लावून भांडी लक्ख करत असते. मग आत बाहेर अशी लगबग करत एकदा आधण आणि एकदा लेकरू अस लक्ष ठेवते. लेकरू कडेवर घेऊनच आधण उतरवते तोवर 'हे' आन्हिके उरकून आलेले असतात. मग लेकराला जवळ बसवून मघा स्वच्छ केलेली वाटी, तापेली चमचे खेळायला देते. आणि 'ह्यांच्या' बरोबर चहा खारी खाते. लेकराला आपल्यातला थोडा चहा आणि ग्लुको बिस्कीट खायला घालते. मग 'हे' वरच्या मजल्यावर पाहणी करायला जातात. लेकरू एव्हाना बाकी लेकरांच्या कळपात गेलेलं असतं. मग ती छानपैकी रांगोळी काढते...सुंदर वेलबुट्टीची बॉर्डर. काहीतरी गुणगुणते. मग आवरून साडी नेसते. वेणी फणी करून पहिल्या मजल्यावर कामाला लागते. मध्ये न्याहारीचीच काय ती वेळ, बाकी सगळा दिवस काम आणि काम...कधी साईट वर कधी स्टोव्ह पाशी. बदल काय तो एकच..... तिची रांगोळी रोज वेगळी वेलबुट्टी घेऊन वावरते Read more....

पतंग - Abhishek Patil

शेवटच्या तीन ओळींनी ही कथा कुठल्या कुठे नेली.... पतंग - अभिषेक पाटील एक पतंग हळू हळू आकाशात वर सरकत होता .. त्याला जोडलेल्या धाग्याला जमिनीवरचा एक हात ढिल देत होता... त्याच्या सोबत आकाशात अनेक पतंग होते.. कुणाचे धागे नुसते सुती होते तर कुणाचे धार धार काचेची कच लावलेले.. प्रत्येक पतंगाचं सारं काही स्वतंत्र होतं... पण स्वातंत्र्य कुणालाच नव्हतं.. ना कापायच ना कापण्याच...! Read more....