Firasti

तिची तऱ्हा – स्वाती फडणीस

असे एक वेगळे रूप फिरस्तीचे..... विक्रम तिची तऱ्हा – स्वाती फडणीस त्याला वाटलं; ती घाबरते आहे.. झोकून द्यायला..! नाही आहे तिचा विश्वास.. त्याच्या समर्थ हातांवर..! नाही तिची तयारी.. त्याच्यासोबत वाहत जायची..! नाहीये ती तयार त्याच्यासोबत मरायला..! आकंठ बुडायला..! ती घाबरत होती.. तिच्यामुळे तो अडकून तर पडणार नाही ना..? वाकून तर जाणार नाहीत त्याचे खांदे..!! ती कसी बघू शकेल त्याला वाहताना, बुडताना..!? म्हणून.. ती बुडून गेली.. एकटीच. Read more....

फिरता रंगमंच – स्वाती फडणीस

आजची फिरस्ती पुन्हा घराच्या आतली आहे...बाहेरची नाही...म्हणजे ती बाहेर निघाली आहे...आणि....... विक्रम फिरता रंगमंच – स्वाती फडणीस नव्यानेच घरात आलेली ती.. मालवत्या संधेच्या साक्षीने घरात प्रवेश करे तेव्हा.. नाटकाच्या मध्यांतरात नव्या प्रवेशा आधी रंगमंचावरील पूर्ण सेट बदलून जावा तशी घराची मांडणी बदलेली असायची. नुकत्या नुकत्याच काही खुणांची ओळख बांधून आलेल्या तिला जरा ओळख होती आहे असं वाटत असतानाच सगळं पुन्हा अनोळखी होऊन जात असे.. ठाणी भिरभिरत्या नजरेने ती पुन्हा नव्याने घराची ओळख करून घेण्यात हरवून जात असे. त्याच त्या सात, आठ वस्तू.. ती तेवढीच जागा.. त्याच भिंती, तेच कोपरे.. आणि तिच ती रोज बदलणारी रचना.. जागेचं अपुरेपण आणि रोज बदलणाऱ्या त्रुटींसहित सगळ्याशी तिची ओळख होत होती. तरी आश्चर्य होतंच.. हातात हात घेतल्यावर पोकळ भासणाऱ्या सुरकुतल्या दोन हातांना सामान सुमानाने भरलेली कपाटं, दिवाण, भारी भरकम टेबल वगैरे हालवण्याचा बळ कुठून येत असेल..? वर भीती.. उद्या हेच सगळं तिनेही करावं अशीही अपेक्षा असेल..!? का करायची ही एवढी हालवा हालावीत..? सात, आठ वेळा वेग वेगळ्या रचना केल्यावरही त्यातल्या त्यात सोयीच काय हे कळूच नये..? रोज नवेपणाचा कसला हा सोस..! आणि ते आणणार तरी कुठून..? रोजच्या बदलांना सामोरं जाणं तिला नकोसं व्हायला लागलं. आपलं घर आपल्या मनाप्रमाणे सजवावं असं कोणालाही वाटतंच.. निदान तिचा तिच्यापुरता एखादा कोपरा तिला हवा तसा राहावा असं वाटणं चुकीचं तर नाही ना..! निदान तिच्या तिने मांडलेल्या चार दोन वस्तू तरी ती परतेपर्यंतही तिथेच राहाव्यात.. बोलावं का..? वस्तू तिच्या पण घर तर त्यांचंच आहे ना..! ती स्वतःला समजवायचा आटोकाट प्रयत्न करत राहिली. तोंडातून निषेध बाहेर पडणं तसं अवघडच. कारण तिला त्याची सवयच नव्हती. पण रोज दाबून ठेवलेली भावना कुठून तरी बाहेर पडणारच.. तिला अजून कळलं नव्हतं. रोज रात्री बदललेले घर बघितला की.. आधी दार उघडल्यावर मनमोकळं हसणारी ती हसायची बंद झाली. ओठांच्या धनुकलीच्या जागी कपाळावर तीरासारखी उभी आठी चढू लागली.. आता त्यांच्यावर तिच्या चेहऱ्याची वरचेवर बदललेली रचना पाहायची वेळ येऊ लागली.. कसं आहे ना बदल कोणालाच फार मानवत नाही. Read more....

डोंबाऱ्याचा खेळ - डॉ. माधवी वैद्य

एक अनुभूती आहे ही फिरस्ती विक्रम डोंबाऱ्याचा खेळ - डॉ. माधवी वैद्य सुरेखा लगबगीनं उठली. काम करता करता तिचं लक्ष घड्याळाकडे गेलच नव्हतं. तिने घड्याळाकडे पाहिलं. अरे बापरे ! साडे सहा हा वाजले? मरणाचा उशीर झाला होता. म्हणजे आपली सहाची बस चुकली का? आता तब्बल एक तास दहा मिनिटांनी पुढची बस. हे राम! तिच्या डोळ्यांपुढे आता तिचं घरकुल दिसायला लागलं. घरी जाऊन सारंच व्हायचं होतं. सगळा स्वयंपाक व्हायचा होता. सकाळी जरा उशिरा उठलं न, तर सर्वच गोंधळ होऊन बसतो. आणि मग होणाऱ्या त्रेधा तिरपीटीला पारावर राहत नाही. सकाळी जरा आळस झटकून वेळेत कामं झाली, तर खरोखर सुखाचं होतं ! घरी गेल्या गेल्या पदर खोचून लगेच कामाला जुंपून तरी घ्यावं लागत नाही. आधीच ऑफिसची कामं, खरंच उबग येतो या साऱ्याचाच. त्यात परत एकादशीच्या घरी संक्रांत हजर असतेच. घरी गेल्यावर पाण्याचा खडखडाट ! घरी जाऊन अंगभर अंग धुवावं, आणि फ्रेश व्हावं म्हणावं, तर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत वाट पहावी लागते. रामा ! रामा ! रामा ! डोक्यात विचारांची टकळी सुरूच होती तिच्या. तिनं सारी आवरा आवर केलीन आणि ती झपाझप बस स्टॉपच्या दिशेने चालायला लागली. साऱ्यांचीच जगण्यासाठी अशी चाललेली तारेवरची कसरत ! काय करणार? सुरेखा बसस्टॉपवर आली. आजूबाजूला तिच्या सारखीच चेहरे ओघळलेली, घामाटलेली, कोमेजलेली माणसं उभी होती. कोणाच्या हातात भाजीच्या पिशव्या, कोणाच्या हातात जड फाईली, कोणाच्या दमून ओघळल्या खांद्याला कॉम्प्यूटर लटकलेला, कोणाच्या कडेवर रडून रडून बेजार झालेलं चिमुरड, तर कोणाच्या खांद्याला लटकलेली लहान पोरं. सगळेच जगण्याची अडथळ्यांची शर्यत जिंकण्याच्या च अविर्भावात धावणारे. सगळीच अवजड वाहनांसारखी, संवेदना बोथट झाल्या सारखी. बसचं ते धूड केव्हा एकदा येतं याकडे डोळे लाऊन बसलेली. बस आली की एकच हलकल्लोळ होत होता. बसमध्ये चढण्यासाठी. त्यातच काही हात आशाळभूतपणे भिकेसाठी पसरले जात होते. तिला रेव्हरंड टिळकांची कविता आठवली, ‘अन्नासाठी साठी दही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा.!’ तिला पाहताच एका सधन कुटुंबातल्या लहानगीचं कुतूहल जागं झालं. तिनं आपल्या आईला विचारलं, ‘आई ! ही छोटी मुलगी कोण आहे गं? ती सर्वांकडे पैसे का मागते? तिला खायला पैसे नाहीत म्हणून? तिचे बाबा नाही जात ऑफिसला? तिचं घर कुठे आहे? ती शाळेत नाही जात? तिच्या घरी माझ्यासारखी छान बाहुली आहे? मम्मी ममी म्हणून रडणारी? हसणारी? तिच्या या कुतूहलासाठी तिच्या आईकडून तिला काय मिळालं? तर कार्टे ! तुला कशाला गं हव्यात नसत्या चौकश्या? गप बस ... म्हणून एक जोरदार धपाटा. लहानाना मोठ्यांकडून अशावेळी मिळणारं हे उत्तर खरं तर तसं ठरलेलंच ना! आपल्याही लहानपणी आपण अश्याच प्रकारची उत्तरं मोठ्यांकडून मिळवेलेली आहेतंच ना! सुरेखाला आपलं बालपण आठवलं आणि क्षणभर तिच्या मनाची ‘बाळपणीचा काळ सुखाचा आठवतो घडीघडी’ अशी अवस्था झाली. खरंच रम्य ते बालपण, तो सुखाचा काळ आता परत येणे नाही. तिनं शेजारी बघितलं तर एक नव-युवती आपल्या छोट्याश्या पर्समधून छोटासा रुमाल काढून चेहेरा अलगत पुसत होती. आणि लिपस्टिकची कांडी ओठावरून फिरवत आपलं तारुण्य जपण्याचा व आणखी बहारदार करण्याचा प्रयत्न करीत होती. तर तिच्याच बाजूची आयुष्याची खडतर चढण चढून आलेली आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं मिरवणारी एक म्हातारी दमून, भागून जाऊन डोक्यावरचं ओझं जरा बाजूला ठेऊन, रस्त्यावरच फतकल मारून ऐसपैस बसली होती. तिच्या जरा बाजूनेच एक पोराबाळांचा तांडा येऊन दाखल झाला, एखादी कोंबडी आली पिलावळ घेऊन दिमाखात निघावी, तशीच एक सखी आपल्या पोराबाळांचा तांडा आपल्या भोवती मिरवत होती. आता हा सगळा तांडा बसच्या लाईनीत घुसणार म्हणून एक आजोबा आपल्या हातातल्या काठीने त्या साऱ्यांना शिस्त लावण्याच्या तयारीत होते. तीन अवस्थांतून जाणारं माणसाचं जगण तिच्या समोर साक्षात उभं होतं. आणि साऱ्यांचं धेय्य एकच, येणारी बस पकडायची. सुरेखाला वाटलं काय हा जगण्यासाठीचा लढा आणि जिंकण्याची उमेद मनात बाळगून आहे. खूप वेळ झाला होता. बस काही येत नव्हती. इतक्यात तिला ‘तडम ताड ताड’ असा तशा बडवण्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजा पाठोपाठ डोंबाऱ्याचे एक कुटुंबही दाखल झालं. तिचं लक्ष त्या डोंबारणीने आपल्याकडेच वळवलं जणू, हे सांगण्यासाठी की जगण्याचा मांड मी माझ्या पद्धतीने कसा मांडते बघ! काही वेळातच तिच्या भोवती सारी मंडळी जमा झाली. माणसांच्या पोटासाठी मांडलेला खेळ बघण्यासाठी माणसांचं रिंगण. त्या रिंगणाच्या मधोमध उंच बांबूच्या तिकाटण्या लावून डोंबारणीने खेळाची सिद्धता केली. डोंबारी तिकाटण्याची बांधाबांध करेपर्यंत डोंबारीण आपल्या कमरेला ताशा बांधून बडवीत होती, ‘तडम ताड ताड’ ‘देखलो भाई देखलो! खेळ तमाशा देखलो’! डोंबारीण बेंबीच्या देठापासून ओरडत गर्दी जमवीत होती. आरोळ्या ठोकून लोकांना खेळ बघण्याचे आवाहन करत होती. तिची कच्ची बच्ची तिच्या अवती-भवती बागडत होती. हसत हसत कसरती करत होती. कोलांट्या उड्या मारत लोकांना रिझवत होती. एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ते सारं डोंबारी कुटुंब कोणासमोर हात पसरत नव्हतं, दया, याचना करत नव्हतं. आपल्या कष्टाची मीठ-भाकर खावून, जीवावर उदार होऊन जगणायचा खेळ कसा मांडायचा हे त्यांची आई त्यांना शिकवत होती. आणि स्वतःच्या मेहनतीवर कसे जगायचे हा आईचा कित्त ते गिरवत होते. फुकाचे पैसे न घेण्याचं व्रत त्यांनी आईकडूनच घेतलं होतं जणू !! खेळाची पुरती सिद्धता झाल्यावर डोंबारणीने तशा आपल्या नवऱ्याजवळ दिला. आणि तिनं बांबुच तिकाटण निट बांधलेलं गेलं आहे याची खात्री करून घेतली. आता ती खेळ खेळायला सिद्ध झाली. क्षणभर तिनं आरोळी ठोकली आणि बघता बघता बांबूच्या तिकाटण्यावरून चढून गेली सुद्धा. दोन तिकाटण्या धरून तिच्या नवऱ्याने दोर बांधून ठेवलेला होताच. डोंबारीण आता त्या दोरावरून चालायला सिद्ध होती. तिने कमरेभोवती गुंडाळून घेतलेला पदर आणखी घट्ट गुंडाळून घेतला.. केस अस्ताव्यस्त, शरीर कमनीय, शेलाटा बंधा, मन कणखर, कपाळावर कुंकवाची ठसठशीत आडवी चिरी, रंग सावळा पण तजेलदार. नाकी डोळी नीटस. आणि मुख्य म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि चापल्य! ती अगदी सहजपणे तिकाटण्याच्या टोकावर जाऊन उभी राहिली. भला मोठा बांबू तिने अगदी लीलया पेलला. जमिनीलासमांतर धरला. आता ती दोन तिकाटण्यांना बांधलेला दोर पायाची बोटं आणि अंगठा या मध्ये धरून चालायला सिद्ध झाली. तिने एकवार मोकळ्या आभाळाकडे नजर टाकली, खोल श्वास घेतला, आता ती तिच्या कुटुंबासाठी काहीही दिव्य करायला जणू तयार झाली. आता तिला सर्वस्व पणाला लावून हातात धरलेल्या बांबूच्या सहाय्याने शरीराचा तोल सावरत, मन स्थिर करून समोरच्या दोरावरून लीलया चालत दोराचं दुसरं टोक गाठायचं होतं. हे सारं ती का आणि कोणासाठी करत होती? आपल्या बछड्यांसाठी आणि साऱ्यांच्याच दीड वितीच्या पोटासाठी साठी ही कसरत होती. तिला क्षणभर आपल्यामध्ये आणि त्या डोंबारणीमध्ये साम्य दिसलं. आपणही तर अशीच दोरावर चालण्याची कासरत करीत असतो. दोराचं एक टोक बांधलेलं असतं जन्माला आणि दुसरं मृत्यूला. आयुष्याची ही दोन टोकं पक्की बांधलेली. मधे आयुष्याच्या वाटचालीची कसरत करायची. प्राण पणाला लावून. शरीर आणि मनाचा तोल सांभाळत..सांभाळत. ही कसरत कुणाला चुकली नाही. अजब कसरत. आता तो डोंबारी डोंबारणीसाठी ताशा अधिकच जोरानं लयदार वाजवायला लागला, आणि त्या तालावर आपलं देहभान विसरून त्या डोंबारणीनं दोरावरून चालायला सुरुवात केली. आता तिला जणू सभोवतालचं काही काही दिसत नव्हतं. आपलं सारं लक्ष तिनं आता दोर पायाच्या अंगठ्यात धरून चालण्यावर फक्त केंद्रित केलं होतं. निर्धाराने ती चालू लागली. क्षणभर साऱ्यांचेच श्वास रोखले गेले. हातात धरलेल्या आडव्या काठीनं तोल सावरता सावरता ती दोराच्या मध्यावर आली. साऱ्यांचेच श्वास रोधले गेले होते. जीवघेणाच खेळ होता तो !! असा जीवघेणा खेळ खरं तर प्रत्येक जणच खेळत असतो. डोंबारीण हे त्या खेळाचंच आता प्रतिक आहे असं तिला वाटायला लागलं.. सुरेखा आता तो खेळ गांभीर्याने बघत होती. खेळ बघण्यात तल्लीन झाली होती. क्षणभर डोंबारणीच्या जागी तिला ती स्वतःच दिसू लागली. मुलांच्या मायेने घेरलेली, संसारासाठी कोणत्याही प्रकारची कसरत करायला सदैव तत्पर असणारी, शरीर मनाचा तोल सावरत जन्म आणि मृत्युच्या दोरावरून मनस्वीपणे चालणारी. डोंबारणीने दोरावरून चालत चालत दुसरं टोक गाठलं सुद्धा. तिनं हातातला बांबू खाली टेकवला. आणि ती एका झटक्यात खाली आली. तिला खाली आलेली पाहून तिची पिलं तिला झटकन लपकली. तिनेही त्यांचे चेहेरे कुरवाळत पटापट मुके घेतले. आणि ते सारं कुटुंब खेळ संपल्यावर पदर पसरून पदरात पडेल ते दान हसत मुखाने झेलायला तयार झाली. आपणही तर हेच करतो नं? आयुष्याच्या खेळत पदरी पडलेलं बरं वाईट दान आपण हसत मुखाने स्वीकारतोच की! तिचा हात पर्स मध्ये गेला. तिनं भारावलेल्या मनानं भरघोस दान तिच्या पदरात टाकलं आपल्या परीने! एक भिकारीण जणू दुसऱ्या भिकारणीला भिक्षा घालत होती. दोघीही अटीतटीचा आयुष्याचा डाव मांडून बसल्या होत्या. आपल्या परीनंतिनं भरघोस दान तिच्या पदरात टाकलं होतं, तिला मात्र किती दान नियती तिचं म्हणून तिच्या पदरात टाकणार हे माहित नव्हतं. बस वेगाने तिच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. डोंबारणीनंही आपला खेळ आवरला होता. आता पुढचा थांबा आणि पुढचा खेळ खेळायचा होता. आणखीन एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती त्यामुळे ती अस्वथ झाली होती. आज पर्यंत ढोल ताशे बडवण्याचं काम होतं ते पुरुषांकडून खेळाच्यासाठी मात्र जीवापाड कसरत करीत असते ती बाईच. सुरेखा एकदाची बसमध्ये चढली. गर्दीत उभ्या राहिलेल्या सुरेखाची तंद्री मोडली, ती कंडक्टरच्या कर्कश प्रश्नानं, “बाई ! तिकीट घेतलं का? इथे फुकट नाही प्रवास करायला मिळत !” ---------------------------------------------------------------------------------------------------- Read more....

स्ट्रीट लाईट्स- शशी डंभारे

शशी डंभारे एक आवडती लेखिका - तिच्या शोधक नजरेतून जीवनाकडे पाहणे हा एक शोधच असतो.... विक्रम स्ट्रीट लाईट्स- शशी डंभारे अंधाराची चाहूल लागली की काजळी धरलेली कंदीलाची काच कोरडया मऊ कपडयाने स्वच्छ पुसून घ्यायची. मग रॉकेल भरुन असलेल्या स्टिलच्या बेसवर ती मोहक आकाराची काच फिट्ट बसवायची. आणि प्रकाशमान झालेल्या घराच्या त्या टप्प्यात एखादं पुस्तक घेऊन झोकात अभ्यासाला बसायचं अशा देखण्या बालपणाचे दिवस आजही चकचकीतपणे नजरेसमोर येतात. स्वच्छ पुसलेल्या काचेसारखेच. त्यानंतर काही दिवसांत, घरोघरी लाईट्स येण्याआधी चौकाचौकात स्ट्रीट लाईटस् आले. चौकातली पोलची जागा आधी ठरवली जाई. एमएसईबीच्या माणसांना हाताशी धरुन लाईटचा पोल आपल्या घराजवळ येईल असे प्रयत्न वस्तीतली माणसं करत. बाबाने काही प्रयत्न केला होता की नाही माहित नाही पण आमच्या घरासमोरच इलेक्ट्रीकचा पोल लागला नी काही दिवसांतच संध्याकाळी 7.30 वाजता दारात लख्ख प्रकाश पडू लागला. घराबाहेर, ओसरीत लाकडी बांबूची, नारळाच्या दो-यांनी विणलेली एक बाज नेहमीच पडलेली असायची. स्ट्रीट लाईट लागायच्या आधी ओसरीवर पडलेल्या त्या निर्जिव बाजेवर लवंडून अनेक स्वप्नं सजीव होऊन चांदण्यांशी शेअरही केली जायची. या कानाची त्या कानाला खबर व्हायची नाही. आईवरचा राग, शाळेतले लूटूपूटूचे अपमान आठवून गूपचूप अश्रू ढाळले जायचे. आतून हाक आली की डोळे पूसून लगेच 'जैसे थे ' घरात. स्ट्रीट लाईटने ही सोय अचानक बंद केली. ओसरीपासून चौकातला कितीतरी मोठा परिसर चट्ट प्रकाशात आला आणि बाजेवर लवंडण्यावर अनेक नियम लागले. कसे नी किती वेळ, येणा-या जाणा-याचे लक्ष जाणार म्हणून हात पाय व्यवस्थीत पसरुन, खरंतर आक्रसूनच बसायचे उठायचे वगैरे ठरले. मला मग जामच पोरकं वाटायचं त्या प्रकाशात. आधीसारखी उब देईनाशी झाली बाज. मग नुसतंच पुस्तक हातात धरुन बसायचं. पूर्ण परकेपणानं. आधीचा, अंधारात लोळत पडतानाचा काँफीडन्सच गायब झालेला. घाबरे घुबरेपणाच वाढलेला. दुसरा पोल पुढच्या चौकात, नाक्यावर लागलेला. दारातल्या पोलच्या प्रकाशाचा टप्पा संपला की मधे बराचवेळ नुसता अंधार, पण त्या अंधारानंतर नाक्यावरच्या पोलचा पुन्हा प्रकाश. या स्ट्रीट लाईटचा प्रकाश मात्र जीवाला दिलासा द्यायचा. कारण नाक्यावर त्या वेळी म्हणजे 7.30 ते 8.30 च्या दरम्यान वेगळीच हालचाल असायची. बस, रिक्शा थांबायच्या. सकाळी घरातून बाहेर पडलेले बहुतेक सगळेच चाकरमानी या वेळेत बस-रिक्शातून उतरायचे. त्यांच्या हातात त्यांच्या कुटूंबासाठी आणलेल्या भाज्या, फळं, खाऊ बीऊ असायचा. त्यात बाबा पण असायचा. या पोलवरील लाईटच्या प्रकाशात अवघडलेली मी त्या पोलवरील लाईटच्या प्रकाशाकडे बघायचे तेव्हा हुरुपायची. त्या लाईटचा प्रकाश बाबासारखाच वत्सल वाटायचा. बाबाचं नी आईचं भांडण झालं की जीव कासावीस व्हायचा. दिवसभर काहीतरी चूकचूक वाटत रहायचं. मग रात्री बाबा येण्याची नी त्यांच्यातलं भांडण मिटण्याची वाट पाहत राहणं इतकंच हातात उरायचं. बाबा त्या दिवशी नेमका उशीरा यायचा, मुद्दामच येत असेल. तेवढं समजायचं नाही तेव्हा. पण जीव थांबून असायचा. नजर सारखी नाक्यावरच्या प्रकाशात थांबणा-या एसटी- रिक्शाकडे. ब-याच उशीरा एखाद्या एसटीतून बाबा उतरायचा. तो दिसला नुसता तरी जीव खळ्कन् भांडयात पडायचा. त्या दिवशी त्याच्या हातात पिशवी नसली तरी खूपच्या खूप खाऊ मिळाल्याचं समाधान वाहायचं डोळयातून. लख्ख प्रकाशात ते दडवता यायचं नाही. भरभर पुसावं लागायचं. बाबा आता प्रकाशाच्या कितीतरी टप्प्यांच्या पार गेलाय. पण अजूनही एखाद दिवशी संध्याकाळी 7.30 ते 8.30 च्या दरम्यान अचानकंच पोरकं पोरकं वाटायला लागतं, ते त्याचमुळे बहुतेक. Read more....

दु:ख ना आनंदही – माधवी भट

चक्रीवादळात झाड कशी गदागदा हलतात...तेसेच काहीसे माधवीचे लिखाण वाचून होते...हे कसे लिहिले जाते असे प्रश्न व्यर्थ...परतत्वाचा स्पर्श असलेली ही प्रतिभा आहे... विक्रम दु:ख ना आनंदही – माधवी भट आणि हा पुढ्यात पसरलेला विस्तीर्ण भूप्रदेश...कोरडा, रुक्ष झालेला. भूमी अशी मलूल झालेली बघवत नाही. जिथवर नजर जातेय तिथवर पिवळसर वाळले गवत आणि उघडी बोडखी निष्पर्ण झाडं!!!!! क्वचित कुठेतरी हिरवं काहीतरी दिसतं पण या रखरखाटात ती हिरवळ म्हणजे मृगजळ वाटू लागते. आणि आता इतक्या प्रवासात मृगजळाच्या नादी लागणं हा मूर्खपणा आहे हे चांगलं कळलं आहे. तिला मनातच हसू आलं. या पुरातन गडाच्या अगदी शेवटच्या टोकावर आपण उभ्या आहोत. कुठून चालत आलो? किती चाललो? चालताना कोणकोण आपल्या सोबत होतं? कोण इथवर आलं? कोण मधेच थांबलं? याचा हिशेब आता महत्वाचा नाही. जो जिथवर आला त्याचे आभार ....इतके महत्वाचे. मग तिने आधी खांद्यावरली झोळी काढली...आणि ती त्या कडावरून भिरकावून दिली. हाती एक भिक्षापात्र होते....ते निरखत राहिली. इतके दिवस त्या भिक्षापात्राने तिला जिवंत ठेवले होते म्हणून कृतज्ञता वाटून तिने ते आधी डोळ्यांना लावले. का कुणास ठाऊक मात्र त्याला आईच्या पदराचा गंध आला.....तिने गंगेत दिवा सोडावा तितक्या सहज ते पात्र सोडून दिले. आता उरली ती....ती विचार करू लागली..आपल्यातलं सारं सुटलं आहे नं? काही बाकी उरलंय का? असेल तर पुन्हा प्रवास अटळ आहे.... चालत राहावं लागेल..पुन्हा....आणि त्यासाठी देखील एका निर्णायक क्षणाची वाट बघावी लागेल ज्या क्षणाला सहज पाऊल बाहेर पडतं...विनासायास...कुठल्याच गुंत्यात न अडकता...! आणि तो प्रवास पुन्हा किती लांबेल याची काहीही शाश्वती नाही...एकदा जमलं ते...पुन्हा जमेल? आता एक मागोवा घ्यायला हवाच म्हणत सहज मागे गेला काळ पाहिला तर वा-याने गडाच्या बुरुजांवर खोवलेले ध्वज फडफडू लागले तसे वाटले. तिचं नाव काय हा प्रश्न महत्वाचा नाहीय. आपण तिला नावडती म्हणूया....हो हो तीच..गोष्टीतल्या राजाच्या दोन राण्यांपैकी एक. तसलीच ती नावडती. नावडती यासाठी की ती कुणालाच आवडली नाही कधी. ना राजाला, ना प्रजेला...ना घरी ना दारी...कुणालाच नाही. आता तुम्ही म्हणाल की ती तिला तरी आवडत होती का? तर ते माहित नाही. पण सर्वसाधारणपणे व्यक्ती ही स्वत: स्वत:ची लाडकी असतेच. म्हणूनच ती स्वत:ला गोंजारते....ही अत्यंत सुप्त जाणीव आहे. काहींमध्ये फार ठसठशीत असते....तिच्यात ती होती का नाही ते माहित नाही. दरवेळी प्रत्येक ठिकाणाहून पदरी पडलेले अपमान, अवहेलना पचवत जगणं हे तसे अवघडच. तिला वाटे आपण कुब्जा आहोत. आपल्या पाठीवर तिरस्काराचं कुबड उगवलं आहे. तिरस्कार! प्रत्येक ठिकाणाहून मिळालेला. त्या तिरस्काराचे थरावर थर साचल्याने आपण वाकलोय आणि आता अत्यंत निरिच्छ भावनेने चंदन उगाळत बसलो आहोत...अगदी मथुरेच्या त्या कुब्जेप्रमाणे! मात्र ते चंदन आता आपल्याला गंध देत नाही..आपला दाह शांतवत नाही..कारण आता आपली घ्राणेन्द्रीय उरली नाहीत, आता आपल्याला जाणिवाच उरल्या नाहीत. बहुदा आता आपल्याला कुबडासोबत महारोग देखील झालाय. आत्मताडनाचा.....! वेगात झडत जातायत बोटं हातापायांची ...असा शिशिर देह एकदिवस संपूर्ण संपेल....! आटत जातो माणूस असल्या माणुसकीच्या दुष्काळात...मुळची अंतरीची ओल कितीही खोल आणि सर्जक असली तरी शापवाणी लवकर बाधत जाते....सारं शोषून घेते...तसा आटत गेला तिचा गहिवर...! वा-याच्या झुळकीने फुल हिंदोळावं तितकं सहज आयुष्य जगणारी ती..आता तिच्याने जाणीवपूर्वक हसणे, बोलणे होईना....सहजता हरवली की सारं संपू लागतं....! तिचा सहजीया पंथ! अगदी जन्मत:च! एकदिवस अशाच हरवल्या अवस्थेत रानातून अरुंद पायवाटेने तल्लीन होत गाणारा बाऊलांचा समूह दिसला.... शोहोज शोहोज शोबाई कोहोय ,शोहोज जानिये के? तिमिर ओंधार जे हैया छे पार ,शोहोज जेनेछे से!! त्याक्षणी तिला त्या यात्रेत सहभागी व्हावं वाटलं..आणि ती निघाली...सहजतेचा ध्यास धरत....सासरी निघाल्या मुलीने पदरात बांधून दिलेल्या मालत्या, गहुले वाटेने थोडे थोडे टाकत पुढे निघावं..मनातून माहेरची एकेक आठवण मनाच्या कप्प्यात दडवत नव्याने उभ्या ठाकणा-या सासराला जवळ करण्यासाठी मनाची तयारी करत जावं...तसे तिने वाटेत तिचे जुने अपमान टाकले...आणि आता नव्याने सामो-या येणा-या निराकाराला स्वीकारायची तयारी करू लागली...नव्हे ती तिच्याकडून आपसूक होत गेली.....खांद्यावर झोळी आली...हाती पात्र...बास...सकाळी भाकरी पुरतं अन संध्याकाळी भाता पुरतं ......! अपरिग्रह....कसलाच संग्रह नको..आठवांचा देखिल नाही.....! नदीचा काठ धरून चालत जायचं...अखंड प्रवास करायचा...प्रवास शिकवतो..प्रवास मोठं करतो....मागे पडत जातं पुष्कळ..! सोबत बाऊल रचना...बरंच शिकवणा-या! सावकाश ती त्या मेळ्यातूनही अलगद नकळत बाहेर पडली. आणि स्वत: एकटी चालू लागली.....सोलून निघालेली पावलं..कोरडे ओठ..जटा झालेले केस..आणि सुटत गेलेलं जगाचं, भोवतालाचं भान...वाट फुटेल तिथे चालत जाताना ही अशी गडाच्या टोकावर भणाण वा-यात ठाम उभी....! हात मोकळे पसरले तिने....आभाळाकडे बघत म्हणाली.... ”बघ उधळून दिलाय आजवरच्या प्रवासात सापडलेला सारा काळाकभिन्न बुक्का वंचनेचा, मानहानीचा....माझा नाही तो....तुझ्या दिगंतात घे सामावून त्यालाही..म्हणून तुझ्याकडे पाठवते .....जमू दे आता मेघ...आणि बरसून जाऊ दे सारं मळभ तुझ्यातही साचलेलं....मोकळा हो....ये....! तुझ्या बरसण्याने पुन्हा गाऊ दे आता वा-याला गर्भाधानाचे मंत्र....आणि रुजू दे आता भुईत, इथे तिथे सर्वत्र फक्त प्रेम!” तशी वीज कडाडली.....लोटून दिलं तिने स्वत:ला सहज कड्यावरून खाली....खोल दरीत! सृष्टी सुरु आहे..राहिलंही...ती कुणासाठी कधी थांबलीय? नाव आहेच चाललेली.....कालही अन आजही.......! . – Read more....

भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये

सर्व कथेने एक विलक्षण मनोद्न्य वळण घेतले...शांताबाई शेळके शांताबाई का होत्या आणि दिलीप लिमये ह्यांचे त्यांच्याशी इतके हृद्य नाते का होते...हे किती सहज उलगडते. शांताबाई आणि माझी ओळख हा एक वेगळा विषय आहे.ओळख मैत्रीत बदलत खूप गाढ झाली..रजनीश हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पुस्तकांची देवाणघेवाण होई. एका गप्पांच्या दिवसात कधीतरी मी हा कवितेचा किस्सा त्यांना सांगितला..तो एकपात्री प्रयोगच झाला. मी रंगवून सांगितल्यावर आम्ही खूप हसलो. शेवटी किस्सा संपला आणि मी म्हणालो, “ आत्याबाई, तुमच्या एवढया कवितांच्या जगात ही एक कविता समाविष्ट झाली आहे..माझी माहेरवाशीण तुमच्याकडे आहे, आणि तुम्हाला दाद न फिर्याद..” आधी शांताबाई हसूनहसून खूष झाल्या होत्या..त्यांनी पर्स उघडली आणि म्हणाल्या.. “ लिमये, हा घ्या हुंड्याचा एक रुपया...” नंतर एकाएकी गंभीर झाल्या...आणि म्हणाल्या..त्याही काही कमी नव्हत्या... “ लिमये, तुम्हाला तुमच्या लेकीच्या मानाचा रुपया दिला..आता पाकीटातल्या त्या नोटा तेवढ्या द्या मला...आता मी त्यांची मालकीण झाले..” पुन्हा गप्पा. चहा. त्यांनी त्या दिवशी त्यांचा जन्मजान्हवी हा संग्रह सही करून दिला... नंतर इतकी काही परिस्थिती बदलली की त्या काळातील आठवणीच कधीतरी निघतात. दिवाळी जवळ आली की दर दिवसागणिक वाढत जाणारे कष्ट, दोघांची होणारी धावपळ, ते स्क्रीन प्रिंटींग, रंगांचा विषारी वास, पाकीटांचे कारखाने,आणि टाईपसेटरच्या ऑफिसमध्ये वाट पहात बसणे , पेपरकटिंगसाठी खांद्यांवर गठ्ठे उचलून घातलेले हेलपाटे,... या वर्षी अचानकच बूबसाहेबांची आठवण झाली... Read more....

चिऊ - स्वाती चांदोरकर

फिरस्ती साठी घराच्या बाहेरच जायला हव असा नियम नाही.... विक्रम चिऊ - स्वाती चांदोरकर मेधा जड झालेली होती. तिच्या उदरातल्या बाळाने तिच्या शरीराला एक वेगळाच आकार दिलेला होता. तिची चाल बदलली होती आणि तिच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं. माधव मेधाची पुरेपूर काळजी घेत होता. त्याला आपण बाप होणार असल्याचा अभिमान वाटत होता. बाळाच्या सुखासाठी दोघंही कष्ट घेत होते. आनंदाने त्याच्या भविष्याचे मनोरे रचत होते. मेधाच्या घराच्या खिडकीला लावलेल्या बॉक्स ग्रीलच्या कोपऱ्यात चिमणा घरटं बांधत होता. एक एक काडी चिमणी आणि चिमणा आणत होते आणि घरटं आकार घेत होतं. शेवटची काडी चिमणी घेऊन आली तेव्हा चिमण्याने तिच्याकडे डोळे भरून बघितलं. चिमणी थकली होती पण तिची चोच हसली. तिने मान झटकली तशी तिचे केस विस्फारले. तिचं जड झालेलं पोट त्याक्षणी चिमण्याच्या नजरेत भरलं. आपण बाप होणार म्हणून त्याला अभिमान वाटला. बाळाच्या सुखासाठी दोघांनी कष्ट घेतले होते. आता फक्त काही पिसं मिळाली, कापूस मिळाला की चिमणीसाठी आणि अंड्या साठी गादी यार होणार होती. चिमणा भुर्रर्र करून उडून गेला. चिमणी जरा विसावली. बाळासाठी माधव झोपाळा घेऊन आला. त्यावर मऊ सुत गादी घातली आणि शुभ्र चादर घालून पाळणा सजला. आता बाळाची येण्याची वाट बघत रहायचं... घरटं सजलं. पिसं मिळाली, शिवरीचा कापूस मिळाला. चिमण्याने गादी तयार केली. आता पंखाचं वळण बदलेल्या चिमणीकडे चिमणा बघत राहिला. आता किती अंडी चिमणी देणार ह्याची वाट बघत बसायचं. मेधाला माधवला मुलगा झाला. गोजिरवाणा, सुरेख. मोठ्या समारंभाने मुलाचं नाव ठेवलं गेलं. चिमणीने तीन अंडी दिली आणि चिमणा आनंदला. चिमणी अंडी उबवू लागली. तीन पिल्लं जन्माला आली. पिल्लं मोठी होत होती, बाळ मोठं होत होतं. बाळाचं रडणं, हसणं ह्याने घर भरून जात होतं. पिल्लांच्या चिवचिवाट घरटं भरून टाकत होता. चिवचिवाटाने बाळ झोपेतून जागं होत होतं. मेधा त्रासली होती. “तू ते घरटं पाडून टाक बघू. दिवसभर कलकलाट. जरा शांतता नाही. माधवाने घरटं पाडून टाकलं. पिल्लं कोवळी, खाली पडली, मेली. चिमणी चिमणा आक्रोश करत उडून गेले. सर्व काही शांत झालं. बाळाची झोप गाढ होत गेली. बाळ उठलं, मेधा त्याला खेळवू लागली, भरवू लागली. म्हणू लागली,“हा घास काउचा, हा घास चिऊचा... ती बघ चिऊ..ती बघ चिऊ. बाळ खिडकीत बघू लागलं. त्याला तिथे अर्धवट तुटलेलं घरटं दिसलं, अर्धवट लोंबणाऱ्या सुकलेल्या काड्या दिसल्या आणि त्या काड्यांना चिकटलेला शिवरीचा कापूस, त्याचे काही तंतू... धुळीने मळलेले.. लोंबत राहिलेले.... Read more....

पाउलखुणा – संगीता गजानन वायचळ

फिरस्ती मध्ये पाउलखुणांचा मागोवा येणारच न? विक्रम पाउलखुणा – संगीता गजानन वायचळ हल्ली तू वाळवंटातून फिरतोस म्हणे मी मागोवा घेऊ नये म्हणून तुला माहित आहे तू कुठेहि जा तुझ्या पाउलखुणांचा अदमास मी घेणारच मी तुझ्या मागोमाग येणारच पूर्वी किनाऱ्यावरून जायचास लाटेने पाउलखुणा मिटतील नि थांबतील माझी तुझ्या मागची पाऊलं म्हणून ... पण अरे हृदयावर अंकित झालेल्या तुझ्या पाऊलखुणा कशाने मिटणारेत ? ... जा तू कुठेहि वाळवंटातून का असेना तुझ्या हृदयात माझीही पाउलं रुतलीएत हे ठाऊक आहे तुलाही ...नि...मलाही Read more....

कॉफी – विद्या भुतकर

फिरस्तीची ही आणखी एक भेट .... विक्रम कॉफी – विद्या भुतकर तुला आठवतंय, तू माझ्या डीपार्टमेंटच्या बाजूने जायचास मला दिसशील अशा हेतूने, अगदी शक्य तितक्या सावकाश आणि वेळ काढत. माझं लक्ष नसताना तुझा किती हिरमोड झाला असेल माहीत नाही. पण माझं अचानक लक्ष गेल्यावर तुझ्या ओठतलं हसू पटकन सांडायचं आणि माझ्या शेजारच्या त्या ढापण्या काकू टायपिंग सोडून माझ्याकडेच बघायच्या. पण तो पर्यंत मलाही हसू आवरता यायचं नाही आणि केव्हा एकदा कॉफी मशिनकडे येतेय असं व्हायचं. सोबत बॉस असेल तर मग अवघडच. त्यांनाही दिसत असेल का रे माझं हसू? असू दे मेलं. मग त्या मशिनजवळ पोचताना दोन-दोन पायऱ्या चढत यायचे. :-) आता ती कॉफी कशी होती माहीत नाही पण अख्ख्या जगाला आपल्याबद्दल माहीत असूनही नॉर्मल होऊन बोलणं अवघडच होतं नाही का? ते एकमेकांसारखे दिसणारे दोन कारकून, तुझे साहेब, तर कधी तुझ्याच डीपार्टमेंटचा एखादा वर्कर, सगळे फक्त 'काय साहेब?' म्हणून जायचे. त्यांचं ते मिश्कील हसू पाहून पळून जावंसं वाटायचं,but who cared? :-)ते कॉफीमशिन म्हणे महिन्या-दोन महिन्यात कधीतरी साफ करायचे. कुणीतरी एकदा एक माशी तोंडात आली हे ही सांगितलेलं. But who cared? :-) माझ्या कंपनीतल्या शेवटच्या दिवशी आपण ५.३० ला तिथे भेटलो होतो, मला आठवतंय चांगलं. चार लोकांत अवघडलेपण आलेलं आणि एकटं भेटल्यावर केव्हा एकदा मिठीत येऊन रडेन असं झालेलं. हम्म्म्म्म्म...चार-पाच वर्षं झाली त्याला. होय ना?...... तुला इथली कॉफी आवडते का रे? फार कडू असते, अगदी उलटी येईल इतकी कडू. दुपारी नाईलाज म्हणून किंवा सकाळी भुकेवर एक उपाय म्हणून घेते मी कधीतरी. तुला आवडली असती का रे अशी कडू कॉफी ? माहीत नाही आज-काल तसं तुझ्याबद्दल काहीच माहीत नसतं मला म्हणा. असो. तर ही कॉफी ना, इतकी कडू असते. मग मी त्यात दूध ओतते बरचसं, पण तेही मेलं पातळ पाणी. तरीही ओततेच. कितीही प्रयत्न केले तरी रंग काही सुधारत नाही त्याचा. मग बाकी लोक एखादं पाकीट साखर घालत असतील तर मी ४-५ घालते. पण तरीही कडूच. असो. सगळ्य़ाच गोष्टी हव्या तशा थोड्याच मिळतात, फक्त कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करता येतो इतकंच! Read more....

ती …. मृणाल वझे

मृणाल तू काय लिहून गेली आहेस...ह्याची कदाचित तुला सुद्धा कल्पना नसेल...मी कितीतरी माझ्या खोलीत बसून ह्या दृश्याचा विचार करीत होतो...स्वतःला सहानुभूती मिळवत जगणे खूप सोप्पे असते...हे असे जगायला निष्ठा लागते...जीवना प्रती... विक्रम ती …. मृणाल वझे एक आई …. पुन्हा एकदा रेल्वे फलाटावरची …. रोज दिसायची मला …. एक १५ वर्षाचा मुलगा बरोबर … हाताचे बोट धरलेला …। आई छानश्या पेहेरावातली…. उच्चवर्गातली …. छानशी ब्रान्डेड पर्स एका खांद्याला तर दुसर्या खांद्यावर एक दप्तरासारखी sack …. ! वय वर्षे ४५ ते ५० मधली …. एखादी बट रुपेरी … ती नक्की त्या मुलाची आईच असेल…. ! शांत चेहेरा …. निश्चल भाव …! तिच्या बरोबर तिचा मुलगा … शाळेचा गणवेष घातलेला …कायम चेहेर्यावर खूप उस्तुकता….. तर …. रोज संध्याकाळी तो मला दिसायचा …. त्याच्याकडे नी त्याच्या आईकडे बघून मला मात्र रोज असंख्य प्रश्न निर्माण करून जायचा …! एखादी गाडी आली की त्याच्या चेहेऱ्यावरती खूप चलबिचल जाणवायची …. तो नुसतेच हात हलवत राहायचा (टा टा करताना हलवतात तसे नाही ) पूर्ण गाडी जाईपर्यंत त्या गाडीकडे उत्सुकतेने बघत राहायचा … गाडी गेली की ती बिचारी आई त्याचे बोट ओढत त्याला तिथून न्यायाचा प्रयत्न करायची … पण तो तिला अजिबात दाद द्यायचा नाही … तेव्हड्यात दुसरी गाडी यायची …. की पुन्हा तेच सर्व संगतवार याच क्रमाने घडायचे …. ! आपली एखादी गाडी चुकली तर दुसरी पटकन यावी असे आपल्याला नेहेमी वाटते पण मला मात्र रेल्वेचा राग यायचा. असे वाटायचे की जरा गाडी लेट यावी म्हणजे त्या आईला जरातरी वेळ मिळेल याला फलाटावरून बाजूला न्यायचा …. असे किती वेळ चालायचे कोण जाणे ….!त्याच्या चेहेऱ्यावरचा भाव … नी … त्याच्या आईच्या चेहेऱ्यावरचा शांत भाव !…. माझ्या मनात खळबळ माजवून जायचा ! मला फार वाटायचे …. त्या आईशी बोलावे ….! तिला काय नक्की वाटते ते विचारावे …. त्या मुलाशी बोलावे …. त्याला नक्की कशाची उत्सुकता आहे … काय हवय त्याला …? तिच्या मनात नक्की असेल की हे असे किती दिवस चालायचे …. ? ती तर दिवसेंदिवस थकत चाललेली … ! कसे होईल ह्याचे …? कोण करेल ह्याचे ….? पण तिचा तो शांत चेहेरा मला मात्र विचार करायला भाग पाडायचा ….! पण माझी गाडी आल्यावर मला वेळ नाही अशी लंगडी सबब मीच माझ्या मनाला द्यायचे नी गाडीत चढायचे असंख्य प्रश्न मनात घेऊन … ती आई अशी किती वेळ उभी राहत असेल ?…. न थकता … न कंटाळता … न चिडता …. ! Read more....