चाकोरी - विनया पिंपळे

विनया पिंपळे ह्या दिवसेंदिवस समृद्ध होत जात आहेत. त्यांच्या कक्षा अंतर्मुख होऊन बहिर्गामी होत आहेत...ही कथा त्याचे उत्तम उदाहरण. चाकोरी - विनया पिंपळे ओट्यापाशी उभं राहून भांडी घासत असताना नेहमीप्रमाणे विचारांची तंद्री लागलेली असते. त्याच तंद्रीत एकेक भांडं नळाच्या धारेखाली आतूनबाहेरून स्वच्छ होत भांड्याच्या टोपल्यात आपसूक पडत असतं. हातानाही सवय होत जाते. डोकं नं लावताही ते आपसूक नेमून दिलेलं काम करत राहतात... आणि डोक्यात विचार कोणते?… तर असेच. म्हणजे जनरली बायकांच्या डोक्यात असतात ते. उदाहरणार्थ-'उद्या पोरीला डब्यात काय द्यायचंय?'- हा विचार येताच लगेच शाळेने दिलेली मेनूलिस्ट पाहिली जाते. फ्राईड राईसचा मेनू पाहून जरा निश्वास सोडला जातो. ड्रेस, बूट, मोजे, स्कुलबॅग, रुमाल, टाय सगळं एका ठिकाणी जमवून ठेवलंय का ते आठवलं जातं. ही आठवणही सवयीनेच ठेवली जाते. इतक्यात 'हं... पण आयकार्ड?…ते कुठाय?' असं छुटूकपिटुक काही आठवलं की…हातातलं अर्धवट धुतलेलं भांडं ठेवून आयकार्ड किंवा आठवलेल्या वस्तूची शोधमोहिम हातात घेऊन...मोहीम फत्ते केली जाते की पुन्हा सरावल्या हातानी भांडी नळाखालून आंघोळ करत टोपल्यात पडत जातात. पुन्हा डोक्यातलं चक्र सुरू...! इतक्यात नळाखाली धरलेल्या सुरीच्या पात्यावरून अलगद बोट फिरतं... हा आपल्या तंद्रीचा प्रताप असं म्हणत तिखटामिठाच्या डब्यातली चिमूटभर हळद बोटावर दाबली जाते. कधीतरी सगळी भांडी धुवून होतात. बाईच्या शरीरावरच्या जखमाही सोशिक असतात बहुदा. म्हणूनच सगळं काम आटपेपर्यंत त्या काही बोलत नाहीत. आताही फक्त चिमुटभर हळदीच्या सांत्वनावर बोटाची जखम गप्प बसते. एकदाची कामं आटोपली की बिछान्याला पाठ टेकवताना हळदुलं बोट अचानक ठणकू लागतं. सकाळी भाजी फोडणी देताना हातावर थोडंस तेल उडून बसलेला चटकाही तेव्हाच दिसतो. 'मी आहे' असं म्हणू लागतो. त्याचीही जळजळ थोडीफार जाणवू लागते. मग वाटतं इतका वेळ का नाही जाणवलं आपल्याला काही?… आपण पुन्हा विचार करू लागतो. विचार करता करता डोळे जड होऊ लागतात. अर्धवट झोप अन् अर्धवट जाग अशी धेडगुजरी अवस्था असते. त्याच सुषुप्तीच्या अवकाशात सकाळी पेपरात वाचलेल्या बातम्यांची ठळक अक्षरं डोळ्यासमोर नाचतात. *विवाहितेचा जळून मृत्यू* . जळून असेल की जाळून? बरं जळून असेल तर असं कोणतं कारण असेल की तिला जळणं जास्त सोयीस्कर वाटलं? किंवा जाळलं असेल तर त्याचंही काय कारण असावं?… हुंडा?… की संशय?… की अजून काही?… कारण काही असो. बाई मात्र जळाली एवढे खरे. जळालेल्या बाईची बातमी आठवल्यानं अर्धवट झोपेची उडी आपल्याला थेट अंगणवाडीतल्या छोट्याश्या बालीजवळ नेऊन पोचवते. बाली फक्त चार वर्षांची आहे! आठवडाभर आधीच तिची आई मेलीय. जळून. आईबापाचं कडाक्याचं भांडण झालं. तिनं तिरिमिरीत अंगावर घासलेट ओतून घेतलं आणि त्यानं संतापून पेटवून दिलं...हा ऐकलेला सगळा घटनाक्रम दृश्य स्वरूपात डोळ्यासमोर सरकत जातो. ह्या दृश्यातलं त्याचं क्रौर्य अर्धवट झोपेच्या डोळ्यांना सहन होत नाही. डोळे खाडकन् उघडले जातात. कशा कोण जाणे पण तिच्या अंगाचा कोळसा होतानाच्या सगळ्या वेदना आपल्यापर्यंत पोचत असल्यासारख्या वाटत राहतात. तिच्या अंगाची होणारी आग आपल्या हातावरच्या इवल्या चटक्याच्या वेड्यावाकड्या आकारात जमा झाल्यासारखी वाटते. त्या जखमेला कितीने गुणावं म्हणजे तिचं दुःख आपल्याला कळेल?… नाही मोजता येत. कसं सहन केलं असेल तिनं?…शिवाय पोरं पोरकी होतील म्हणून नवऱ्याचं नावही ओठावर येऊ दिलं नाही.. 'असोच…फार विचार करायचा नाही.' असं स्वतःला सांगत, समजावत आपण आपल्या जखमांवर इलाज करतो. 'उद्या काही महत्वाची कामं हातावेगळी करायला हवीत' असं म्हणत आपण 'वेगळ्या' कामांची लिस्ट डोळ्यासमोर आणून आपलं लक्ष दुसरीकडे गुंतवतो... त्यात गुंतताना येणारी गुंगी अनावर होत जाते. मग कधीतरी गाढ झोप लागते. सकाळी पाचच्या ठोक्याला जाग येते. सरावाने रोजची कामं केली जातात. आपण आपल्या चक्रात अडकू लागतो. वेगवेगळ्या व्यवधानांची तंद्री पुन्हा आपल्यावर आरूढ होत जाते... आणि छापील असल्यासारखे सगळे दिवस त्याचत्याच चाकोरीतून जात राहतात विनया पिंपळे ह्या दिवसेंदिवस समृद्ध होत जात आहेत. त्यांच्या कक्षा अंतर्मुख होऊन बहिर्गामी होत आहेत...ही कथा त्याचे उत्तम उदाहरण. चाकोरी - विनया पिंपळे ओट्यापाशी उभं राहून भांडी घासत असताना नेहमीप्रमाणे विचारांची तंद्री लागलेली असते. त्याच तंद्रीत एकेक भांडं नळाच्या धारेखाली आतूनबाहेरून स्वच्छ होत भांड्याच्या टोपल्यात आपसूक पडत असतं. हातानाही सवय होत जाते. डोकं नं लावताही ते आपसूक नेमून दिलेलं काम करत राहतात... आणि डोक्यात विचार कोणते?… तर असेच. म्हणजे जनरली बायकांच्या डोक्यात असतात ते. उदाहरणार्थ-'उद्या पोरीला डब्यात काय द्यायचंय?'- हा विचार येताच लगेच शाळेने दिलेली मेनूलिस्ट पाहिली जाते. फ्राईड राईसचा मेनू पाहून जरा निश्वास सोडला जातो. ड्रेस, बूट, मोजे, स्कुलबॅग, रुमाल, टाय सगळं एका ठिकाणी जमवून ठेवलंय का ते आठवलं जातं. ही आठवणही सवयीनेच ठेवली जाते. इतक्यात 'हं... पण आयकार्ड?…ते कुठाय?' असं छुटूकपिटुक काही आठवलं की…हातातलं अर्धवट धुतलेलं भांडं ठेवून आयकार्ड किंवा आठवलेल्या वस्तूची शोधमोहिम हातात घेऊन...मोहीम फत्ते केली जाते की पुन्हा सरावल्या हातानी भांडी नळाखालून आंघोळ करत टोपल्यात पडत जातात. पुन्हा डोक्यातलं चक्र सुरू...! इतक्यात नळाखाली धरलेल्या सुरीच्या पात्यावरून अलगद बोट फिरतं... हा आपल्या तंद्रीचा प्रताप असं म्हणत तिखटामिठाच्या डब्यातली चिमूटभर हळद बोटावर दाबली जाते. कधीतरी सगळी भांडी धुवून होतात. बाईच्या शरीरावरच्या जखमाही सोशिक असतात बहुदा. म्हणूनच सगळं काम आटपेपर्यंत त्या काही बोलत नाहीत. आताही फक्त चिमुटभर हळदीच्या सांत्वनावर बोटाची जखम गप्प बसते. एकदाची कामं आटोपली की बिछान्याला पाठ टेकवताना हळदुलं बोट अचानक ठणकू लागतं. सकाळी भाजी फोडणी देताना हातावर थोडंस तेल उडून बसलेला चटकाही तेव्हाच दिसतो. 'मी आहे' असं म्हणू लागतो. त्याचीही जळजळ थोडीफार जाणवू लागते. मग वाटतं इतका वेळ का नाही जाणवलं आपल्याला काही?… आपण पुन्हा विचार करू लागतो. विचार करता करता डोळे जड होऊ लागतात. अर्धवट झोप अन् अर्धवट जाग अशी धेडगुजरी अवस्था असते. त्याच सुषुप्तीच्या अवकाशात सकाळी पेपरात वाचलेल्या बातम्यांची ठळक अक्षरं डोळ्यासमोर नाचतात. *विवाहितेचा जळून मृत्यू* . जळून असेल की जाळून? बरं जळून असेल तर असं कोणतं कारण असेल की तिला जळणं जास्त सोयीस्कर वाटलं? किंवा जाळलं असेल तर त्याचंही काय कारण असावं?… हुंडा?… की संशय?… की अजून काही?… कारण काही असो. बाई मात्र जळाली एवढे खरे. जळालेल्या बाईची बातमी आठवल्यानं अर्धवट झोपेची उडी आपल्याला थेट अंगणवाडीतल्या छोट्याश्या बालीजवळ नेऊन पोचवते. बाली फक्त चार वर्षांची आहे! आठवडाभर आधीच तिची आई मेलीय. जळून. आईबापाचं कडाक्याचं भांडण झालं. तिनं तिरिमिरीत अंगावर घासलेट ओतून घेतलं आणि त्यानं संतापून पेटवून दिलं...हा ऐकलेला सगळा घटनाक्रम दृश्य स्वरूपात डोळ्यासमोर सरकत जातो. ह्या दृश्यातलं त्याचं क्रौर्य अर्धवट झोपेच्या डोळ्यांना सहन होत नाही. डोळे खाडकन् उघडले जातात. कशा कोण जाणे पण तिच्या अंगाचा कोळसा होतानाच्या सगळ्या वेदना आपल्यापर्यंत पोचत असल्यासारख्या वाटत राहतात. तिच्या अंगाची होणारी आग आपल्या हातावरच्या इवल्या चटक्याच्या वेड्यावाकड्या आकारात जमा झाल्यासारखी वाटते. त्या जखमेला कितीने गुणावं म्हणजे तिचं दुःख आपल्याला कळेल?… नाही मोजता येत. कसं सहन केलं असेल तिनं?…शिवाय पोरं पोरकी होतील म्हणून नवऱ्याचं नावही ओठावर येऊ दिलं नाही.. 'असोच…फार विचार करायचा नाही.' असं स्वतःला सांगत, समजावत आपण आपल्या जखमांवर इलाज करतो. 'उद्या काही महत्वाची कामं हातावेगळी करायला हवीत' असं म्हणत आपण 'वेगळ्या' कामांची लिस्ट डोळ्यासमोर आणून आपलं लक्ष दुसरीकडे गुंतवतो... त्यात गुंतताना येणारी गुंगी अनावर होत जाते. मग कधीतरी गाढ झोप लागते. सकाळी पाचच्या ठोक्याला जाग येते. सरावाने रोजची कामं केली जातात. आपण आपल्या चक्रात अडकू लागतो. वेगवेगळ्या व्यवधानांची तंद्री पुन्हा आपल्यावर आरूढ होत जाते... आणि छापील असल्यासारखे सगळे दिवस त्याचत्याच चाकोरीतून जात राहतात

विनया पिंपळे

24-Jan-2018

घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

30 58


दणका

30 58