60 140
Download Bookhungama App

भारद्वाजाची भरारी - भा.रा.भागवत

Description:

खास शाळकरी व युवक वर्गासाठी हे लेख लिहिले गेले आहेत.निवेदन चांगले लिखाणसुद्धा पुष्कळदा मागे कुणाची तरी टोचणी असल्याखेरीज लिहून होत नाही असा अनुभव आहे. ‘भारद्वाजा’ने भराऱ्या मारल्या त्याही अशाच कारणाने. ‘सकाळ ‘चे संपादक श्री. श्री. ग. मुणगेकर यांनी आम्हा पतिपत्नींना एकदा बोलावून घेतले आणि ‘रविवार सकाळ’चे मुलांचे पान आम्ही सजवावे असा आग्रह धरला. माझ्या मनात आले की, या निमित्ताने मुलांशी दर आठ – पंधरा दिवसांनी हितगुज करावे – प्रचलित विषयांवर, म्हणजे मुलांच्या किंवा मुलांसाठी चाललेल्या चळवळींविषयी, मुलांना ज्यात रस वाटेल असे जे जे काही घडते आहे त्याविषयी. कुणीतरी नित्य भराऱ्या मारून अशा घडामोडींचे विहंगमावलोकन करतो आहे आणि त्याबद्दल मुलांशी बोलतो आहे. असा विहंगम कोण? मला भारद्वाज हे माझे आवडते नाव सुचले. शिवाय ‘भरारी’च्या मागे ‘भारद्वाज’ जोडणे हे माझ्या अनुप्रासप्रियतेला धरून होते! भकार मग आणखीच वाढला. कारण लीलाबाईंनीही आपल्या सदरासाठी भिंगरी आणि भवऱ्या या दोन सुविचारी पोरांची नियुक्ती केली. पण हे सर्व ठरून घरी गेलो आणि रात्री मुणगेकरांचा फोन आला. ते म्हणाले, ‘अहो, आमचे आर्टिस्ट म्हणतात की भारद्वाज कधी भराऱ्या मारीत नाही. तो कोंबड्यासारखा जमिनीलगत उडतो! आता आली का पंचाईत? मग भराऱ्या कोण मारतो? गरूड, घार असे भव्य पक्षी मला मुलांच्या चिमण्या जगात नको होते, आणि गिधाड तर अजिबात वर्ज्य होते. शेवटी भारद्वाजावरची संकल्पित बंदी उठवून आम्ही त्याचीच योजना पक्की केली. फक्त विष्णुदेवाने त्याला खास आज्ञा करून ‘‘तू पृथ्वीतलावर बालकांसाठी काय काय चाललं आहे ते बघून मला रिपोर्ट देत जा, त्यासाठी भराऱ्या मारण्याची शक्ती मी तुला देतो” अशी प्रारंभाला मखलाशी करून हा यज्ञ सुरू केला. त्यातून काही बऱ्यापैकी गप्पाटप्पांची समयानुसार निर्मिती झाली, हे आता या संग्रहात एकसमयावच्छेदें करून दिसतेच आहे. खास शाळकरी व युवक वर्गासाठी हे लेख लिहिले गेले. या पुस्तकात ‘सकाळ’मधल्या मूळ चित्रांचा वापर करण्याची परवानगी दिल्याबद्दल सकाळकारांचा व चित्रकार श्री. प्रभा काटे यांचा आभारी आहे. भा. रा. भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि