60 150
Download Bookhungama App

बंडूचं गुपचुप - गंगाधर गाडगीळ

Description:

गंगाधर गाडगीळ यांच्या लेखणीतून सकर झालेलं 'बंडू' हे एक विनोदी पत्र आहे. ही त्या बंडूचीच कथा आहे.बंडूचं गुपचुप १९४२ ते १९४६ हा काळ बंडूच्या आयुष्यात मोठा धामधुमीचा गेला. तुम्हाला वाटेल की त्यानं स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला; बॉम्ब उडवले, किंवा तो भूमिगत झाला, त्यामुळे असं झालं असेल. पण तशातला काही प्रकार नव्हता. म्हणजे त्यानं स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला नाही असं नाही. पण घेतला तो आपला माफक घेतला. कॉलेजात हरताळ पाडणे, ‘इन्किलाब झिंदाबाद’ अशा दणकेबाज आरोळ्या, पोलिस जवळपास नाहीत असं पाहून ठोकणे, ९ ऑगस्टला रस्त्यातल्या ट्रामगाडीवर धडाधडा काठी आपटणं - असले प्रकार त्यानं केले. एकदा तर अचानक कर्फ्यू ऑर्डर लागू झाली तेव्हा गाफिल बंडूच्या पृष्ठभागावर एका गोऱ्या सार्जंटने काठीचा एक फटकाही लगावला होता. पण इतकंच. धामधूम उडाली ती वेगळ्या कारणानं. त्या काळात बंडूचे मित्र धडाधड लग्न करीत होते. तुम्हाला वाटेल की त्या काळातल्या लग्नात धामधूम ती कसली उडणार! फार तर वाजंत्र्यांची नाही तर विहिणींच्या भांडणांची. त्यात बंडूचा काय संबंध येणार? पण बंडूचे मित्र इतके हुशार आणि उपद्व्यापी की त्यांनी त्या काळातदेखील आपली लग्नं करताना भरपूर गोंधळ घातला. आणि कसा कोण जाणे प्रत्येकाच्या लग्नाच्या गोंधळात बंडू गुरफटत असे - इतका की यातून आपण बाहेर कसे पडणार याची त्याला विवंचना करावी लागे. या सगळ्या प्रकाराची सुरुवात केली जनूनं. जनू तसा चांगला मुलगा होता. त्याला रामरक्षा, विष्णु सहस्त्रनाम वगैरे सगळे पाठ होतं. दरवर्षी गणपतीच्या देवळात गीतेतला एक अध्याय घडाघडा म्हणून तो बक्षीस मिळवीत असे. पुढे कॉलेजात गेल्यावरसुद्धा आपला अभ्यास बरा की आपण बरा असा त्याचा खाक्या होता. अहो, ते आवश्यक होतं. घरची गरिबी म्हणून जर तो मामांकडे राहून शिकत होता, तर भांग वगैरे पाडून, चस्की करून कसं चाललं असतं. पण जनू बी. ए. ची परीक्षा पास झाला आणि त्याच्यात आश्चर्यकारक बदल व्हायला लागले. अहो, त्यानं टोपी घालणं सोडलं आणि चक्क केसांचा भांग पाडून फिरायला लागला. नंतर मग त्यानं एक पँट शिवली आणि तिच्यात शर्ट खोचून तो रेक्लमेशनवर ऐटीत फिरायला जाऊ लागला. आणि नंतर जेव्हा बंडूनं त्याला एकदा मसाला पान खाऊन वर पिवळा हत्ती सिगरेट ओढताना पाहिलं तेव्हा तर बंडू जवळजवळ कोलमडूनच पडला. बंडू आश्चर्यानं तोंडाचा चंबू करून म्हणाला, “जनू, सिगरेट! सिगरेट ओढतोस!! आणि मामांनी बघितलं म्हणजे?” जनू आकाशाकडे तोंड करून धूर सोडत म्हणाला, “बघितलं तर बघितलं. जास्ती बोलायला लागले तर त्यांना ऑफर करीन.” बंडू आ वासून त्याच्याकडे बघतच राहिला.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि