80 160
Download Bookhungama App

बंडू - गंगाधर गाडगीळ

Description:

गंगाधर गाडगीळ लिखित विनोदी कथा“काँग्रॅच्युलेशन्स! मि. भातखंडे, अभिनंदन – त्रिवार अभिनंदन!” आरामखुर्चीत पेंगत पडलेल्या बंडूने दचकून उडी मारली आणि त्या परक्या इसमांच्याकडे तो विस्फारलेल्या नजरेने पाहात राहिला. त्यांतल्या मळकट माणसाच्या हातात एक वही होती, आणि कळकट माणसाच्या हातात एक यंत्र होते. “अहो! असं बघता काय?... काँग्रॅच्युलेशन्स!” “बरं! बरं! काँग्रॅच्युलेशन्स. पण तुम्ही कोण? म्युनिसिपालिटीतून आलात काय डी. डी. टी. मारायला? पण दिवाळीला वेळ आहे अजून. मारायचं तर मारा बुवा! पण पोस्त वगैरे काही मिळायचं नाही.” त्या कळकट माणसाच्या हातातील. कॅमेऱ्याविषयी बंडूचा विनाकारण गैरसमज झाला होता. “अहो, मुनिसिपालिटीतले नव्हे आम्ही. आम्ही ‘जनता’दैनिकातर्फे आलो आहोत. मी खास बातमीदार आहे आणि हे आहेत फोटोग्राफर– श्री. सुतार.” “‘जनता’दैनिकातर्फे!” बंडू विचारात पडला आणि मग तो किंचाळला, “भलतंच! अहो, हे पाहा मिस्टर बातमीदार, कुणी तरी तुम्हाला बनावट बातमी दिली आहे; बदमाषगिरी केली आहे कुणी तरी.” “असं काय करतांय्? कसली बातमी? आम्ही अभिनंदन करायला आलोय् तुमचं.” “काय वेड लागलंय् की काय तुम्हाला? मी साफ सांगतो, की गोव्याच्या सत्याग्रहात मला मुळीच भाग घ्यायचा नाही. काल आपल सहज बोलताबोलता बोलून गेलो, आणि त्या नान्यानं गाढवानं चक्क तुम्हाला कळवून टाकलं! काय आहे काय?” “पण– ” “पण– बीण काही नाही. आपल्याला ते जमायचं नाही. साफ सांगतो. अहो, तीन तीन दिवस बेशुद्ध पडून राहायचं म्हणजे आहे काय?” स्वतःच्या सडेतोडपणावर बंडू खूश झाला होता. “च्– च्! गैरसमज करून घेताय् तुम्ही! अहो, बक्षीस मिळालंय् तुम्हाला. शब्दकोडं नंबर ५७३ मधे. पहिल्या बक्षिसाच्या पाच वाटेकऱ्यांपैकी तुम्ही एक आहात.” “बक्षीस! मला! – मला आणि बक्षीस!” “होय, होय! टेन् थाउजंड. आहात कुठं मिस्टर?” “दहा हजार! एकावर चार शून्य?” बंडूच्या आविर्भावावरून तो आता कपाटावर चढून उडी मारणार असे वाटू लागले, 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि