60 140
Download Bookhungama App

बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती - प्रा. गंगाधर गाडगीळ

Description:

गंगाधर गाडगीळ लिखित तीन विनोदी नाटिका.बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती पात्र परिचय बंडू : एक उत्साही पण भाबडा प्राणी. मध्यम वयाचा पण बाळसेदार शरीराचा. हृदय सुपाएवढे पण डोके बेताचेच. चरितार्थ चालतो सनबीम आणि रेनबो कंपनीतून मिळणाऱ्या पगारावर. पण जगतो मुख्यतः स्वतःविषयीच्या गोड गैरसमजाच्या इंद्रधनुष्यावर. बहुधा फसतो पण क्वचितच खचतो. कारण आपण फसलो हे बहुधा त्याच्या ध्यानातच येत नाही. भाबडा असल्यामुळेच की काय तो दैवाचा लाडका आहे. ते त्याला नेहमीच अडचणीत टाकून आपली करमणूक करून घेत असते, पण दगा क्वचितच देते. स्नेहलता : बंडूची सौ. लग्न झाले तेव्हा प्रेमळ होती आणि लतेसारखी कृश देखील होती. पण नंतर सौभाग्य बरेच मानवले. अगदीच काही तेलाचा बुधला नाही पण लोणच्याची बरणी मात्र खरी. तसेच नवऱ्यावरच्या प्रेमाचे देखील आता संसाराच्या काळजीत रूपांतर झाले आहे. (पुष्कळशा इंग्रजी नाटकांचे मराठीत रूपांतर होते तसे). त्यामुळे तिच्या हृदयात आता नवऱ्याविषयी गाढ अनादर आहे, त्याच्या सद्हेतूविषयी शंका आहे आणि त्याच्या व्यवहारशून्यतेविषयी पूर्ण खात्री आहे. तिची जीभ आता झाली आहे खबरदार आणि नवऱ्याला व तर्कशास्त्राला डोक्यावर उभे करण्यांत वाकबगार. एकंदरीत स्नेहलता ही एक सुखी, संसारी स्त्री आहे. नानू : बंडूचा लहानपणापासूनचा जिवलग दोस्त. काटकुळा, जाड चष्मा लावणारा. पण त्या एवढ्या जाड काचांच्या तटबंदीआडूनदेखील बायकोच्या डोळ्याला डोळा देण्याचे धैर्य त्याला होत नाही. मग तिच्या तोंडाला तोंड देणे बाजूलाच राहिले. त्याचे डोक लांबोडके आहे हे सत्य. पण ते तल्लख आहे हा आपला बंडूचा समज. तसा तो शाळेत स्कॉलर होता पण व्यवहारांत जिवाच्या शर्थीने नोकरीला चिकटून राहणे हीच त्याची कर्तबगारी. बंडू आणि तो संसारांतल्या सुखदुःखांत एकमेकांना साथ करीत असतात, आणि एकमेकांच्या अडचणींत आणि दुःखांत भरही घालीत असतात. नलू : किरकोळ नानूची जबरदस्त सौ. नानूला संसार मानवला नाही त्याची कसर हिने भरून काढली आहे. स्नेहलतेप्रमाणेच मध्यम वर्गीय गृहिणीचे सारे मसालेदार व तिखट गुणधर्म तिच्या अंगी पुरते बाणले आहेत. नवऱ्याविषयीची भूमिका तीच. पण जीभ अधिक खबरदार. कल्पनाशक्ति अधिक तल्लख. इतकी की तिच्यापुढे तर्काची बोबडी वळते. त्याला फेफरे येते आणि तसेच नानूलाही.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि