Id SKU Name Cover Mp3
बाळाजी आवजी चिटणीस


30 110
Download Bookhungama App

बाळाजी आवजी चिटणीस - प्रभाकर भावे

Description:

महाराजांच्या खजिन्यातील एक अनमोल रत्न त्याचे नाव-“बाळाजी आवजी चिटणीस” होय.शिडे उभारण्यापूर्वी–! माणसांची अचूक अन् योग्य पारख करणे हा गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी प्रकर्षाने बसत होता. तानाजी, बाजी, येसाजी, पिलाजी, नेताजी, हंसाजी, कडतोजी, कोंडाजी नि अशी कितीतरी उदाहरणे त्यांच्या मनुष्य संग्रहाबद्दल व त्यांच्या अचूक निवडीबद्दल देता येतील. परंतु ही नामावली रणांगणावर जाऊन बलाढ्य शत्रूशी दोन हात करणाऱ्या वीर पुरुषांची झाली पण?... दप्तराचे कामात मात्र...? “दप्तराचे काम” ह्या लहानशा शब्दाला फार मोठा गहन अर्थ लक्षात आहे. महाराजांचे अष्ट प्रधान मंडळ जरी आपआपल्या खात्यांचा नेमून दिलेला कारभार चोख सांभाळणारे होते, तरी देखील “दप्तराचे काम” ह्या सदरा खाली फार मोठी अन् महत्त्वाची अशी बरीच कामे येत असत. अन् केवळ कारकून, हिशेबनीस वा फडणीसावर ह्यांवर कामांची जबाबदारी टाकून मोकळे होता येत नसे. अखेरीस नव निर्माण राज्याचा चोख कारभार हा शिस्तीनेच व्हायला पाहिजे होता. अन् लगत जबाबदार व स्वतंत्र बुद्धी अन् प्रतिभा वापरून शिवाजी महाराजांच्या सूचनाबरहुकूम चोख काम करणारी अशी (खास अन् योग्य) अधिकारी व्यक्तीच तेथे नेमणे आवश्यक होते. अन् हे अधिकाराचे पद म्हणजे राजांच्या “चिटणीसाचे” पद होय. अन् हे चिटणीसपद छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अत्यंत कडक शिस्तीने वागणाऱ्या व्यक्तीचे सांभाळणे म्हणजे काही येरागबाळाचे काम नव्हते. कारण स्वराज्य समृद्ध आणि समर्थ करण्यासाठी महाराज अविरत श्रम घेत होते. तेव्हा महाराजांचे चिटणीस होणे म्हणजे प्रत्यक्ष महाराजांची सावली होण्यासारखे होते. महाराजांनी उचललेला राजकारणाचा पहिला भार हा चिटणीसांच्या खांद्यावरच पडायचा! कुणाला पत्र रवाना करायची, राजकीय पाहुण्यांशी बोलणी करायची, गडकोटांच्या दुरूस्ती बांधणीची चौकशी पाहणी करायची, राजधानीतील अठरा कारखान्यांची आणि बारा महालांची तहान भूक वा इतर गरजा चिटणीसांनीच पाहायच्या! सतत महाराजांबरोबर राहायचं! सारी गुप्त राजकारणे तडीस न्यावयाची ती चिटणीसांनीच! एवढेच काय पण महाराजांच्या कुटुंबातील कुणाचं लग्न, बारसे, माहेरपण, सासरपण, हे देखील चिटणीसांनी पार पाडायचे. अशी हजार प्रकारची कामे सांभाळणारा, हजरजबाबी हरहुन्नरी अन् चतुर चिटणीसाच्या शोधांत महाराज होतेच. अन् महाराजांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर असा एक अतिशय सुंदर उपजतच अनेक पैलू असलेला एक “हिरा” जवळ केला. कोकणच्या किनारपट्टीवर एका गांवात हा असाच खितपत पडला असताना, महाराजांच्या घारीसारख्या शोधक नजरेने त्याला अचूक टिपले. अन् आपल्या खजिन्यात आणखी एका अनमोल रत्नाची भर घातली. त्याचे नाव-“बाळाजी आवजी चिटणीस” होय. बाळाजी आवजीवर विशेष असे स्वतंत्र लिखाण फारसे झालेले नाही. बाळाजी आवजी मात्र तसा उपेक्षितच राहिला. समरांगणावर जाऊन तलवार गाजविणाऱ्या शूर पुरुषांइतकीच घरी राहून राज्यकारभार करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळतेच असे नाही. दप्तरचा कारभार अक्कलहुशारीने आणि हिंमतीने चालविणे ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. रणांगणावर शत्रूशी दोन हात करणारे पहिल्या आघाडीचे वीर, तर घरी राहून दौलतीचा सांभाळ करणाऱ्यांची आघाडी दुसरी. तेव्हा माझे मित्र श्री. तु. वि. जाधव, विजय जाजू, गजानन म्हात्रे, यांचा मला फारच आग्रह झाला. त्यातच “बाळाजी आवजी” यांच्या समाधीबद्दल श्री. सुरेश परांजपे यांनी आधिक माहीती पुरविली तेव्हा मात्र माझी उत्कंठा शिगेला पोहोचली अन् मी या विषयाकडे वळलो. त्यातच विलेपार्ले (पूर्व) येथील जीवन हॉटेलचे मालक श्री. अप्पासाहेब जोगळेकर व त्यांचे मेव्हणे दत्तोपंत भावे हे मला त्यांच्या गांवी जांबुळवाडा येथे घेऊन गेले व तेथून पुढे “बाळाजी आवजीच्या” समाधीच्या “आवंढा” ह्या गावी जाण्याचा मार्ग सांगितला. तेथील भेटीत मला बऱ्याच दंतकथा, आख्यायिका, कानांवर आल्या अन् त्यातूनच हे बाळाजी आवजीचे शब्दचित्र मी रेखाटले आहे. मी ह्या दोघांचा आभारी आहे. विले-पार्ले येथील टिळक मंदिराच्या वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. मंजिरी वैद्य, मंडळ सभासद श्री. गजानन केळकर यांनी मला सर्व संदर्भग्रंथ वारंवार वाचावयास दिले व माझी तातडीची गरज भागविली. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. ह्या शब्दचित्राची मुद्रणप्रत तयार करण्याचे काम सौ. स्वप्ना पत्की व ओम विजयश्री सोसायटीतील श्री. बाळाराम साळवी यांनी केलं. मी त्यांचा आभारी आहे. वरदा बुक्सचे प्रकाशक व माझे स्नेही, श्री. कुमारशेठ उर्फ ह. अ. भावे यांच्या कानावर मी हे रेखाचित्र लिहिल्याचे घातले. त्यांनी नेहमीप्रमाणे माझ्या ह्या कल्पनेचे स्वागत केलं. बाळाजी आवजीचे ह्या शब्दचित्राचे सर्व बालक, पालक, तरुण, तरुणी, माता, भगीनी, आजी, आजोबा आदी वाचक मंडळी स्वागत करतील अशी अपेक्षा बाळगतो. बहुत काय लिहिणे? आमुचे अगत्य असो द्यावे; विज्ञापना राजते लेखनावधि:। - प्रभाकर भावे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि