30.00 58.00
Download Bookhungama App

अनुभूती - सी. एल. कुलकर्णी

Description:

मूर्तरूप घेतलेली गोष्ट आपल्या मागे अनंतकाळ टिकून राहू शकते. अमूर्त अनुभव, अनुभूती आपल्याबरोबर लोप पावतात. म्हणून अस्ताचलाकडे झुकताना मी खुडून आणलेले हे चार सोन्याचे किरण अभिलाषांचा पुढचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी.मनोगत

मंडळी हा माझा संवाद आहे स्वतःचा स्वतःशी. आठवणींचा तास होता गतकाळाशी. भारलेले अक्षांश रेखांश होते हाताशी. म्हणून दाखवावीशी वाटली मला गवसलेली काशी.

रामायण-महाभारत ह्या ग्रंथात जगातली सारी व्यक्तिमत्त्व प्रणाली सामावलेली आहे असं म्हणतात. माझ्या ह्या छोट्या व्यक्तात, कुठल्याही माणसाला रोजच्या व्यवहारात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणी मांडलेल्या आहेत. अडचणींवर जाणीवपूर्वक सामना करून ऊर्जा वाया न घालवताही, सबूरीने, कालमानपरत्वे आपोआप घडत जाणाऱ्या आणि अदृश्यातून पाठराखण करणाऱ्या हातांची मदत कशी होत रहाते ह्याचं वास्तव चित्रण ह्यात केलंय.

ह्यातमाझं कर्तृत्वयापेक्षानियतीचं नैसर्गिक दातृत्वसमोर आणून, गीतेतील निष्काम कर्मयोगाचा पुरस्कार करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. कुठलंही काम आपल्या अत्युच्च क्षमतेने करत राहिलं तर यश कसं स्वतःहून सोबत करतं ह्याचा माफक अनुभव यात आहे. दोन पावलं चाललं की पुढची चार आपोआप दृष्टीक्षेपात येतात ह्याची प्रचिती ह्यात आहे. माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती आणि त्यातून वळसे घेत जाणारे सहज सापडलेले काही मार्ग ह्यात आहेत. आपण समजतो तसा हा संसार फक्त एकट्याचा नसून सर्वांचा कसा आहे ह्याची अनुभूती ह्यात आहे.

प्रत्येकासोबत असलेली माणसे आणि त्यांची नशिबे, ही कायम एकत्रित काम करीत असतात. कारण सर्वच परस्परावलंबी असतात. निसर्गही ह्याला अपवाद नाही. त्याच्या अस्तित्त्वाचं संचित अथवा प्राक्तन आपल्या स्वतः इतकंच आपल्या जगण्याशी संलग्न असतं. म्हणून आपण एकटे कधीच नसतो. तरीही आपण स्वायत्त एकटेच असतो सर्व उपभोगांसाठी असं आपण समजतो.

येणारा आपणहून येतो; आवश्यक तेवढी मदत करतो आणि काम झालं की निघून जातो, जन्मानंतर मृत्यू येतोच, तसा. जाणाराही जाताना वांझ हातानी जात नाही. काहीतरी अनुभव शहाणपण देऊनच जातो. तुमच्या पुढच्या वाटचालीला सुकर करण्यासाठी.

आई-वडील-शिक्षक यांनी वेळोवेळी केलेलं ताडन; परीक्षेत चांगले मार्क मिळविण्यासाठी सहाय्यभूत असतं. तसंच इथंही, जगण्याच्या प्रक्रियेतील अवघड प्रश्न सोडविण्यासाठी लागणारं, क्षमता निर्माण करणारं कर्म निसर्गानं योजून ठेवलेलं असतं. आपण मागे वळून पाहिलं की ह्या निमित्ताचं आकलन होतं.

युद्धाच्या कथा रम्य असतात. कारण त्यात शौर्य, क्रौर्य, औदार्य, हार-जीत, आनंद-दुःख सर्वच असतं. धारातीर्थी पडलेल्यांचं समर्पण उपभोक्त्याला सिंहासनावर बसवतं.

सिंहासनाची निश्चित अशी कुठली व्याख्या नाही. तुम्ही ज्या आसनावर बसला आहात तेच त्या दिवशीचं सिंहासन असतं.

वय वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. जन्म घेणाऱ्याला जन्म घेण्यासाठी श्रम पडत नाहीत. ते दुसरे कोणीतरी केलेले असतात. जन्मतः अनाथ अर्भकांना सांभाळणारा हात, त्याच्या आधीच निर्माण झालेला असतो.

हे असंच असतं. पण सामान्यपणे माणूस, आपलं कार्य सिद्ध झाल्यावर हे विसरतो. बऱ्याचदा कार्य करत असताना त्याच्या आसपास ध्यान देत नाही. स्वतःचा अनुभव, सुखदुःख अथवा यशाचं श्रेय वाटून घ्यायला कचरतो, संकोचतो आणि व्यक्त होत नाही.

मूर्तरूप घेतलेली गोष्ट आपल्या मागे अनंतकाळ टिकून राहू शकते. अमूर्त अनुभव, अनुभूती आपल्याबरोबर लोप पावतात. म्हणून अस्ताचलाकडे झुकताना मी खुडून आणलेले हे चार सोन्याचे किरण अभिलाषांचा पुढचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी.

 

- सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि