60 116
Download Bookhungama App

आभाळवाटांचे प्रवासी - किरण पुरंदरे

Description:

पक्षिनिरीक्षक किरण पुरंदरे यांचे पक्षिनिरीक्षणाबद्दल पुस्तकप्रस्तावना पक्षिनिरीक्षण हा शब्द आता वारंवार कानावर पडतो, वाचनात येतो. माझ्या लहानपणी म्हणजे छत्तीस-सदतीस साली हा शब्द मला किंवा माझ्या खेळगड्यांपैकी कुणाला माहीत नव्हता. मी औंध संस्थानातील किन्हई गावी होतो. संस्थानिकांची मुलंही किन्हईला येत. त्यांच्यापैकी कोणी दुर्बिणीतून पक्षी पाहताना कधी दिसले नाहीत. पक्ष्यांचा स्वभाव, बोलणं, राहणं, खाणं ह्यासंबंधीचा काही तपशील लोककथा, पुराणकथा, बोधकथा, लोकगीतं त्यांतून येई. मध्यमवर्गातील घरकोंबड्या मुलांपेक्षा शेतीशी संबंध असलेल्या शेतकरी, माळी, कुणबी ह्या मुलांना हा तपशील जास्त माहीत असे. लावा, तित्तर, पकुर्ड्या, कांड्या- करकोचे, ढोक, राघू, होला, पारवा हे पक्षी कसे दिसतात, कसे ओरडतात, काय खातात, त्यांची घरटी कुठे असतात, अंडी-पिल्लं कशी दिसतात हे त्यांना जास्त माहीत असे. जी पोरं दिवसभर गुरांमागे रानावनात, कुरणांत, काटेवनात, डोंगरात हिंडत त्यांना शेतकामाशी संबंध असलेल्या मुलांपेक्षा ही माहिती अधिक असे. रामोशी, पारधी, वैदू, गोसावी ह्यांना गुरे राखणाऱ्या पोरांपेक्षा अधिक खोलातील असे बारकावे माहीत असत. काही विशेष समजुतीही असत. गुरं राखणारा पोरगा एकवार मला म्हणाला, “टिटवी राती पाय आभाळाकडं करून निजती.’’ “हो! का बरं?” “आभाळ अंगावर पडंल म्हणून तिला भ्या वाटतं.” समुद्रानं हिरावून नेलेली आपली अंडी हिमतीने परत मिळवणाऱ्या टिटवीची गोष्ट मी वाचली होती; पण आभाळ खाली पडू लागलं. तर ते आपल्या पायांवर तोलून धरण्याची हिंमत बाळगून असलेली टिटवी ह्या पोराला माहीत होती. पोरंचाळवणी हा माळरानात आढळणारा पक्षीही गुराखी पोरानंच मला दाखवला. ह्याला पोरंचाळवणी का म्हणायचं, असं विचारल्यावर तो म्हणाला, “हा नदर पडला की पंख मोडल्यासारखं दाखवून भेलकांडत हळूहळू चालतो. बघणाराला वाटतं दुखावलेला दिसतो, टोपी वर टाकून धरावा. मग टोपी सुधारून पोर हळूहळू जवळ गेलं, की हा तुरुतुरु तुरगत लांबवर जातो. तिथं भेलकांडतो, पोरं तिथं गेली की हा पुन्हा लांब पळतो.” मी एअरगन घेऊन रानात हिंडत होतो त्या काळात उसन वैदू कावळा दिसला की मला म्हणे, “दादा एवडा मारून मला दे. त्येचं काळीज लई कामाचं असतं.’’ एकदा राघू दिसला. मी विचारलं, “उसन, ह्याला मारायचं का?” तर म्हणाला, “न्हाय न्हाय. तो राम राघव. त्येला कोन मारंल?’’ घुबडाला धोंडा मारला की तो ते झेलतं, उगाळतं. धोंडा मारणारा झिजतो. टिटवी यमाची तराळीण असते. माणूस फार आजारी असताना, रात्री अपरात्री टिटवी ऐकू आली तर तो माणूस खपतोच. सकाळी कुकुडकुंभा दिसला की दिवस उत्तम जातो. नीलकंठ पक्ष्याचं दर्शन झालं की काम फत्ते होतं, अशा काही समजुतीही होत्या, काही माहिती होती पण पक्षिनिरीक्षण हा छंद मात्र माहीत नव्हता. भारतीय पक्षिशास्त्राचा पाया इंग्रजांनी घातला. ईस्ट इंडिया कंपनीत लष्करी आणि मुलकी अधिकारी म्हणून बरेच साहेब भारताच्या वेगवेगळ्या भागांत पसरले होते. त्यांच्यापैकी काहींनी पक्ष्यांचा अभ्यास केला. भारतातील पक्ष्यांचा आधुनिक तपशील असं लेखन सन सतराशे तेरामध्ये एडवर्ड बर्कले ह्यांनी केलं आहे. हे मद्रास शहरात ईस्ट इंडिया कंपनीचे सर्जन म्हणून काम करत होते. फोर्ट सेंट जॉर्जभोवती व आत आढळलेल्या बावीस पक्ष्यांची चित्रे आणि वर्णन ह्या सर्जननी प्रसिद्ध केलं. विंध्य पर्वतराजीतील खडकांचा अभ्यास करणाऱ्या कॅप्टन जेम्स फ्रॅन्कलीन ह्यांनी अठराशे एकतीस साली एकशे छप्पन जातीचे दोनशे पक्षी जमवले. त्यातील बत्तीस आजवर माहीत नसले असे होते. कर्नल डब्ल्यू. एच. स्केज यांनी अठराशे बत्तीसमध्ये ‘ए कॅटलॉग ऑफ दी बर्ड्स ऑफ दी डेक्कन’ हा पेपर प्रसिद्ध केला. त्यात अनेक नवीन पक्षी होते. त्यांचं वर्णन करताना हिंदू देवतांची नावं दिलेली आहेत. Milvus migrans govinda (Pariah kite), Hippolais rama (Tree warbler), Monticola solitarius pandoo (Blue rock thrush), Hypsipetes madagascariensis ganeesa (Southern black bulbul) अशी ही नावं आहेत. ‘बर्ड्स ऑफ इंडिया’ हा जेर्डनचा दोन भागांतील ग्रंथ १८६२-१८६४ मध्ये प्रसिद्ध झाला. डॉ. सालिम अली आणि डिलॉन रिप्ले यांचे ‘हॅण्डबुक ऑफ दी बर्ड्स ऑफ इंडिया अॅण्ड पाकिस्तान’ हे दहा भाग १९६८-१९७३ मध्ये प्रसिद्ध झाले. मराठी मुलखापुरते बोलायचे तर पक्षिनिरीक्षणाच्या छंदाची सुरुवात १९४० मध्ये प्रकाशित झालेल्या डॉ. सालिम अली यांच्या ‘बुक ऑफ इंडियन बर्ड्स’ या सचित्र पुस्तकापासून झाली. डॉ. म. वि. आपटे यांचे १९५०- १९५५ च्या सुमारास प्रसिद्ध झालेले पक्ष्यांसंबंधीचे लेखही हा छंद वाढीला लागण्यासाठी उपयोगी पडले. ऑगस्ट बेचाळीसच्या चळवळीत, अहमदनगरच्या किल्ल्यात बंदिवान असताना मौलाना आझाद यांनी ‘बुक ऑफ इंडियन बर्ड्स’ या पुस्तकाचा उपयोग आपल्या लेखनासाठी केला असे डॉ. सालिम अली यांनी आपल्या व्याख्यानात सांगितलं आहे. पक्षिनिरीक्षण कशासाठी करायचं? पक्षी का राहिले पाहिजेत? पक्ष्यांचा माणसांना उपयोग काय? निसर्ग संतुलन म्हणजे काय? ते बिघडलं तर काय उत्पात होतात? या प्रश्नांसंबंधी आजवर बरंच लिहिलं आणि बोललं गेलं आहे. ते उगाळण्याची गरज नाही. पक्षिनिरीक्षणाच्या छंदातून पक्षिशास्त्र, पक्षिअभ्यासक निर्माण होण्याची शक्यता असते. अभ्यासातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. पक्षी कायमचे नष्ट होऊ नयेत, म्हणून काय केलं पाहिजे याची दिशा मिळते. नष्ट झालेल्या पक्ष्यांची वा वन्य प्राण्यांची एक जात पुन्हा जन्माला येण्यासाठी एक आकाश जाऊन दुसरे यावे लागते, हे भान येते. श्री. किरण पुरंदरे यांच्यासारखे व्रती पक्षिनिरीक्षक रानोमाळ हिंडून, बारीक नजरेनं पक्ष्यांचं जीवन न्याहाळतात. अलीकडे दुर्बिणी, स्पॉटिंग स्कोप, कॅमेरे, टेलिफोटोलेन्स, रंगीत फिल्म, टेपरेकॉर्डर असली साधनं उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून हे पक्षिनिरीक्षक अचूक, तपशीलवार, सचित्र अशी माहिती सुरेख ललितगद्यातून वाचकांना देतात. आलेले अनुभव वाचकांपर्यंत पोहचवतात. हे काम कोणाही संवेदनाक्षम वाचकानं ऋणाईत राहावं असंच आहे. कापशीची डायरी, आभाळवाटांचे प्रवासी अशी पुस्तकं मराठी भाषेत येत राहोत आणि आम्हाला शहाणं करोत. व्यंकटेश माडगूळकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि