60.00 116.00
Download Bookhungama App

आगे बढो फास्टर फेणे - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या गाजलेल्या फास्टर फेणे या पात्राच्या साहस कथातुमच्या खास मित्राने— फुरसुंगीच्या फास्टर फेणेने आपल्या पराक्रमांनी वीस पुस्तकं भरून टाकली. ती वीसही पुस्तकं तुमच्यापैकी कुणाकुणाच्या आई-बाबांनी, दादा-ताईंनी वाचली आहेत नक्कीच ! कारण त्यांनी तसं आम्हाला कळवलेलं आहे आणि त्यात आश्चर्य ते काय ! कारण हा फा. फे. कित्येक वर्षांपासून कुठेकुठे आपली हजेरी लावीत होता. ‘ कुमार ’, किशोर ’, ‘ आनंद ’, ‘ बालवाडी ’, ‘ टॉनिक ’ या मासिकांतून; ‘ सकाळ ’, ‘ केसरी ’, ‘ मराठवाडा ’, ‘ महाराष्ट्र टाइम्स ’, ‘ साधना ’ यांच्या बालपुरवणी या सदरातून तसेच हा अस्सल मराठी मातीतला मराठी पोरगा ‘ संडे टाइम्स ’, ‘ टिंकल ’ आणि ‘ टार्गेट ’ या इंग्रजी; ‘ धर्मयुग ’ या हिंदी; ‘ शिशुरंजन ’ या गुजराती तसेच ‘ पूमपत्ता ’ या मल्याळी नियतकालिकांतून अमराठी बालवाचकांनाही भेटलेला आहे. तिथे तो कधी गोष्टीरूपात होता, तर कधी चित्रपट्ट्यांवरच्या गोलांमधून नेमकेपणाने जाऊन बसला होता. ‘ कुमार ’ मासिकाने तर चार वर्षं याच्याशी सतत गळामिठी मारली होती. ‘ महाराष्ट्र टाइम्सच्या शंकर सारडांनी मागणी केली आणि त्याच्या बाबांनी म्हणजे लेखक भा. रा. भागवत यांनी त्याला १९६२ साली भारत-चीन युद्धात चक्क चोरून आघाडीवर पाठवला. तो अवतरला तोच मुळी किशोरवयात. आता इतका साहसी मुलगा युद्ध संपल्यावर थोडाच स्वस्थ बसणार ? तो लागला एकापाठोपाठ एकेक साहसं करायला. हा किडकिडीत, चळवळ्या मुलगा ‘ नवी नवी साहसं करायला पाठवा ’ म्हणून त्याच्या जन्मदात्याच्या मागेच लागला. त्याच्या उद्योगांनी भरलेली वीस पुस्तकं अखंड, छापील स्वरूपात आम्ही तुमच्या हाती दिली. विसावं पुस्तक प्रसिद्ध झालं नोव्हेंबर १९८८ मध्ये. पण जन्मापासून तो वेगवेगळे पराक्रम गाजवीत आहे आणि तुमच्या गळ्यातला ताईत बनला आहे. साहजिकच आहे, कारण तुम्हा मुलांना नेहमीच साहसं करायला आवडतात; पण सर्वांनाच संधी मिळते असं नाही. तेव्हा आपल्यासारखाच एक जण असे पराक्रम गाजवायला लागला की, तो तुमची स्वप्नं खरी करणारा तुमचा खास जिवाभावाचा मित्र बनतो. हीरो बनतो आणि गंमत म्हणजे हा तर कायम तुमच्यासारखा कुमारवयाचाच राहतो. कारण ‘‘ त्याला मोठं केलेलं आम्हाला आवडणार नाही ’’ असं तुमच्याच काही मित्र-मैत्रिणींनी भागवत काकांना धमकावलं. आत्तापर्यंत तुमच्या मागणीप्रमाणे संपलेली काही पुस्तकं आम्ही पुन्हा-पुन्हा छापली. पण या फास्टर फेणेची कीर्तीच इतकी अफाट की, अजूनही किशोरवयांच्या मुला-मुलींना या मित्राची भेट घेतल्यावाचून चैन पडत नाही. मग ती आमच्याकडे मागणी करतात. ‘‘ चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे द्याहो ! ’’ ‘‘ फास्टर फेणेची काश्मिरी करामत आहे का ? ’’ ‘‘ ‘ फास्टर फेणे टोला हाणतो ’ आणि ‘ प्रतापगडावर फास्टर फेणे ’ ही दोन पुस्तकं हवी आहेत. ’’ अशीच बऱ्याच पुस्तकांची मागणी ! आणि मग आमच्या लक्षात आलं की, दूरदर्शनवरसुद्धा गाजलेल्या, प्रतापगडावरून उतरून, आकाशवाणीत शिरून तुमच्या कानावर पडलेल्या या फास्टर फेणेचे पराक्रम इतक्या मुलांना वाचायला हवे असताना पुस्तकं नाहीत म्हणून त्यांना निराश करणं काही बरोबर नाही. तेव्हा आता फास्टर फेणेच्या साहसकथांनी भरलेली ही वीसच्या वीस पुस्तकं आम्ही ईबुक स्वरुपात आणली आहेत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि