60.00 116.00
Download Bookhungama App

सांजसूर - अनिल रघुनाथ कुलकर्णी

Description:

सांजसूरहा अनिल रघुनाथ कुलकर्णी ह्यांचा, दीर्घकालच्या विरामानंतर प्रसिद्ध झालेला, तिसरा कथासंग्रहकाळोखात बुडणारा संध्याप्रकाश

सांजसूरहा अनिल रघुनाथ कुलकर्णी ह्यांचा, दीर्घकालच्या विरामानंतर प्रसिद्ध झालेला, तिसरा कथासंग्रह. काही वर्षांपूर्वीअस्तही त्यांची कथा माझ्या वाचनात आली होती आणि त्यांच्या कथालेखनाचा वेगळेपणा व सामर्थ्य तीव्रतेनं प्रत्ययास आलं होतं. ही कथा मला इतकी आवडली, की भारतीय ज्ञानपीठाच्या एका कथासंग्रहासाठी मी तिचा हिंदी अनुवाद केला. विविध भारतीय भाषांतील प्रातिनिधिक कथाकारांच्या कथा त्यांच्या हिंदी अनुवादांच्या रूपानं अखिल भारतीय वाचकवर्गासमोर ठेवण्याचा त्या कथासंग्रहाचा हेतू होता. प्रस्तुत कथासंग्रहातअस्तह्या कथेबरोबरच त्यांच्या अन्य सात कथाही अंतर्भूत आहेत. ह्या प्रस्तावनेच्या लेखनासाठी ह्या सर्व कथांचं वाचन करणं हा एक आनंददायक अनुभव होता. ह्या कथांवर लिहिताना, त्या कथांच्या परिचयाबरोबरच कुलकर्णी ह्यांच्या कथांची काही वैशिष्ट्यं मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.

ह्या कथासंग्रहातल्या त्यांच्या जवळजवळ सर्वच कथा स्थळकाळाच्या दृक्प्रत्ययाच्या प्रभावी भानानं सुरू होतात; आणि त्यातूनच हळूहळू ते विलक्षण कल्पनाशक्तीनं भारलेलं एक संसारचित्र आणि व्यक्तिमानस उभं करतात. एका बाजूला त्यांच्या कथांतील माणसांना त्यांच्या आसपासच्या, भोवतालच्या परिस्थितीचा ठाशीव स्पर्श तर असतोच; पण दुसऱ्या बाजूला त्यांतील सामान्य घटितांना, माणसांना, त्यांच्यातील परस्परसंबंधांना त्यांनी असा काही आगळा मानसस्पर्श दिलेला असतो, की त्या कथा वाचताना मातीतून, दगडधोंड्यातून शिल्पकारानं निर्माण केलेल्या सौंदर्यकृतींचा प्रत्यय यावा. ह्या कथा म्हणजे संध्याकाळच्या प्रकाशानं, काळोखाच्या पोटात बुडत जाणाऱ्या अस्तित्वावस्थांना दिलेला आणि मनात सतत रेंगाळत राहणारा रंगस्पर्श; किंवा विनाशाच्या अटळ भवितव्याला सामोरे जाताना आळवलेले करुण सूर. त्यांच्या कथांतील वास्तव हे त्यांनी निर्मिलेल्या व्यक्तिरेखांच्या भीषण भवितव्यतेचं असलं, वाचकांना अस्वस्थ, व्याकुळ करणारं असलं, तरी त्याचा ते देत असलेला कलात्मक प्रत्यय संमोहित करणाराही असतो. प्रत्येक कथा आर्त सांजसूरांना शब्दरूप देताना काहीसा अस्पष्टतेचा, धूसरतेचा, एक प्रकारच्या रहस्यमयतेचा अनुभव देणारी; पण त्यातूनच विदग्ध सहृदयाला भारावलेपणाचा शब्दातीत प्रत्यय देणारी. तसं पाहिलं तर ह्या कथांतली माणसं सामान्य, चारचौघांतली; पण त्यांच्या विशिष्ट जीवनप्रवाहात ती वाहताना, तरंगताना, गटांगळ्या खाताना, कधी पूर्णतः बुडून जाताना त्यांच्या मनांच्या तंतु-जाळ्यांचं जे कलात्मक संविधान कुलकर्णी करतात, त्यामुळे ते अनन्यसाधारण होतं; पुनः पुन्हा वाचावंसं वाटतं. ह्यात कुलकर्णी ह्यांना लाभलेल्या भाषावैभवाचं आणि चित्रमय शब्दकळेचं स्थान मोठं आहेकथेतल्या माणसांच्या मनाचे क्षोभ, त्यांचे उद्रेक, त्यांचे परस्परांशी असलेले आणि परिस्थितीमुळे विकृतीच्या पातळीवरही जाणारे मानसिक संबंध कुलकर्ण्यांच्या कलात्मक मांडणीमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण निवेदनशैलीमुळे प्रभावीपणे प्रकट होतात.

कुलकर्ण्यांच्या कथा वाचताना मला जो आनंद मिळाला, त्यातून त्या कथांवर विस्तारानं लिहावंसं वाटलं आणि ही प्रस्तावना आकारास आली.

चंद्रकांत बांदिवडेकर

 


Format: Adaptive

Publisher: Vishwa Mohini Prakashan