60.00 135.00
Download Bookhungama App

ऋषी परिचय - स्वामी श्रीकृष्ण भारती (पोंक्षे)

Description:

ऋषी परिचय

ऋषीपरिचय हा ग्रंथ सर्व जिज्ञासू व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण असा एक ठेवा आहे असे म्हटल्यास त्यात काही वावगे होईल असे वाटत नाही. श्री श्रीकृष्ण भारती पोंक्षे स्वामी यांनी आपल्या काव्यपूर्ण शैलीत लिहिलेले अनेक ग्रंथ आपल्या वाचनात आलेले आहेत. जगावेगळ्या विषयावर अतीशय अभ्यासपूर्ण लेखन ही स्वामिजींची एक खासियत आहे. प्रस्तुत ग्रंथात त्यांनी भारताच्या उज्ज्वल आणि तपस्वी परंपरेचे, वर्णन सर्व साधक वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहे यासाठी त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.

वेदांमध्ये, छंदऋषी मध्ये अनेक ऋषींचा उल्लेख येतो. सर्व वेदमंत्र अपौरुषेय आहेत. परंतु त्या मंत्राचा विनियोग, तसेच कोणत्या सूक्ताचा कोठे उपयोग करावा ही सखोल माहिती आपणाला ऋषींकडूनच उपलब्ध होते. तसा विचार केला तर, आमचे सर्व ऋषीगण हे खरे संशोधक शास्त्रज्ञ होते. इतर कोणत्याही साधनांशिवाय शरीर द्वारा, विशिष्ट मंत्राचे द्वारा, तपस्येच्या द्वारा जे शोध त्यांनी आपल्या सर्व जीवमात्रांसाठी दिले आहेत, ते खरोखरच अद्भुत आहेत. विश्वामित्रऋषींनी उर्जेवर लक्ष केंद्रीत केले आणि कधीही न संपणारा ऊर्जास्रोत सूर्यनारायणाची विविध अंगांनी स्तुती, ध्यान, जप करून गायत्री मंत्राचे महत्त्व सिद्ध केले. जमदग्नी किंवा परशुराम या पितापुत्रांनी युद्धतंत्र, स्वसंरक्षण, शस्त्रविद्या यांचा मंत्रांद्वारा सखोल अभ्यास करून अस्त्रविद्येचा उपहार दिला. गौतमांनी कृषीविभागात लवकरात लवकर निर्माण होणाऱ्या धान्यांचा शोध लावला. वेदामध्ये एक वाक्य असे आहे. ‘देवगृहावै नक्षत्राणिअर्थातच नक्षत्रे ही देवांची घरे आहेत. अशा नक्षत्र मंडळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने ज्यांनी आपले असे विशेष स्थान निर्माण केले ते ऋषी देवांपेक्षा कमी नव्हेत. आपल्या भारतीय वाङ्मयात काल्पनिकता नसून सत्यता पूर्णपणे भरलेली असल्यामुळे लाखो वर्षांचे कालखंडानंतर सुद्धा आपण आजही आपल्या ऋषींचे ऋण जाणतो. तसेच साभिमानाने आपले गोत्र सांगताना मी या ऋषीकुलाचा अंश आहे असे सांगतो.प्रस्तावना

।। श्रीराम ।।

ऋषीपरिचय हा ग्रंथ सर्व जिज्ञासू व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण असा एक ठेवा आहे असे म्हटल्यास त्यात काही वावगे होईल असे वाटत नाही. श्री श्रीकृष्ण भारती पोंक्षे स्वामी यांनी आपल्या काव्यपूर्ण शैलीत लिहिलेले अनेक ग्रंथ आपल्या वाचनात आलेले आहेत. जगावेगळ्या विषयावर अतीशय अभ्यासपूर्ण लेखन ही स्वामिजींची एक खासियत आहे. प्रस्तुत ग्रंथात त्यांनी भारताच्या उज्ज्वल आणि तपस्वी परंपरेचे, वर्णन सर्व साधक वाचकांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहे यासाठी त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.

वेदांमध्ये, छंदऋषी मध्ये अनेक ऋषींचा उल्लेख येतो. सर्व वेदमंत्र अपौरुषेय आहेत. परंतु त्या मंत्राचा विनियोग, तसेच कोणत्या सूक्ताचा कोठे उपयोग करावा ही सखोल माहिती आपणाला ऋषींकडूनच उपलब्ध होते. तसा विचार केला तर, आमचे सर्व ऋषीगण हे खरे संशोधक शास्त्रज्ञ होते. इतर कोणत्याही साधनांशिवाय शरीर द्वारा, विशिष्ट मंत्राचे द्वारा, तपस्येच्या द्वारा जे शोध त्यांनी आपल्या सर्व जीवमात्रांसाठी दिले आहेत, ते खरोखरच अद्भुत आहेत. विश्वामित्रऋषींनी उर्जेवर लक्ष केंद्रीत केले आणि कधीही न संपणारा ऊर्जास्रोत सूर्यनारायणाची विविध अंगांनी स्तुती, ध्यान, जप करून गायत्री मंत्राचे महत्त्व सिद्ध केले. जमदग्नी किंवा परशुराम या पितापुत्रांनी युद्धतंत्र, स्वसंरक्षण, शस्त्रविद्या यांचा मंत्रांद्वारा सखोल अभ्यास करून अस्त्रविद्येचा उपहार दिला. गौतमांनी कृषीविभागात लवकरात लवकर निर्माण होणाऱ्या धान्यांचा शोध लावला. वेदामध्ये एक वाक्य असे आहे. ‘देवगृहावै नक्षत्राणिअर्थातच नक्षत्रे ही देवांची घरे आहेत. अशा नक्षत्र मंडळात आपल्या असामान्य कर्तृत्वाने ज्यांनी आपले असे विशेष स्थान निर्माण केले ते ऋषी देवांपेक्षा कमी नव्हेत. आपल्या भारतीय वाङ्मयात काल्पनिकता नसून सत्यता पूर्णपणे भरलेली असल्यामुळे लाखो वर्षांचे कालखंडानंतर सुद्धा आपण आजही आपल्या ऋषींचे ऋण जाणतो. तसेच साभिमानाने आपले गोत्र सांगताना मी या ऋषीकुलाचा अंश आहे असे सांगतो.

प्रस्तुत ग्रंथात विश्वनिर्मिती पासूनच ऋषीपरंपरा कशी निर्माण झाली आहे याची कल्पना येते. सनत्कुमारांचा जन्म अयोनिजित ऋषींच्या पासून हा प्रारंभ होतो. आपण उत्तर दिशेस सप्त ऋषींचा जो विलोभनीय तारकासमूह पाहतो त्या सप्त सात संख्येचे ऋषींच्या सप्त समूहांचे यथार्थ वर्णन आपल्या ज्ञानात विशेष भर घालते. ऋषींप्रमाणेच ऋषी पत्नींनीही केलेल्या महत् कार्याची ओळख वसिष्ठपत्नी अरून्धती आणि भगवती संध्या प्रकरणात पाहावयास मिळते.

नवविधा भक्ति सूत्राचे प्रणेते देवर्षी नारद ही काय विभूति होती; कीर्तन, प्रवचने यामध्ये आपण जे नारदांचे वर्णन ऐकतो ते आणि प्रत्यक्ष नारदांचे व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व, यामध्ये असणारे महदंतर आपल्याला खूपच वेगळ्या विश्वात घेऊन जाते. तपस्येने पापांचे डोंगर सुद्धा जळून भस्मसात होतात आणि भगवंताचे अतिपावन नाम काय करू शकते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मीकी चरित्र. महर्षि ब्रह्मर्षी वसिष्ठ चरित्र म्हणजे सहनशीलतेचा कडेलोट आहे. देवदेवतांनी सुद्धा किती परीक्षा घ्यावी? आणि त्यात संपूर्णपणे उत्तीर्ण होणे आणि आदर्शरूप चरित्र कायम स्वरूपी होणे म्हणजेच वसिष्ठ चरित्र आहे.

जनमेजयाने सर्पसत्र केलेले वाचनात होते, परंतु पराशरांनी राक्षससत्र करून राक्षसांना त्राही त्राही केले होते. हा एक नवीन विषय आपल्या ज्ञानात वेगळी भर घालतो. विश्वामित्र चरित्र खरोखरच अद्भुत आहे. विश्वामित्रांच्या जन्माच्या पासून किंबहुना सत्यवतीने, अभिमंत्रित केलेल्या चरु भक्षणा पासून जमदग्नी सारखे अद्भुत रत्न, तसेच गाधी पत्नीच्या पोटी आलेले राजर्षि आणि तपस्येने ब्रह्मर्षिपद प्राप्त केलेले विश्वामित्र, ज्यांनी आपल्या तपस्येने प्रतिसृष्टी निर्माण केली. एक एक चरित्र वाचतांना रोमांच उभे होतात. ऋषी मंडलामध्ये वामदेव चरित्र म्हणजे चमत्कृतींचा खजिनाच आहे.

ज्यांनी देवतांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आपली तपस्या परिपूर्ण केली ज्यांचे वर सर्व ऋषी मंडळाने ब्रह्मा, विष्णू, महेशांचे मध्ये सर्वश्रेष्ठ कोण ही परीक्षा बघावयाची जबाबदारी सोपविली ते महर्षि भृगु त्रिकालज्ञानी होते. आजही ज्योतिर्विद्येत ज्यांचे नाव आत्यंतिक आदराने घेतले जाते ते हे भृगुऋषी.

च्यवन भार्गव आख्यानात सुकन्येने केलेला त्याग आणि जराजर्जर शरीराचा पुन्हा झालेला काया कल्प, अश्विनीकुमारांचे वरप्रदान, वाचकहो आज आपण टॉनिक म्हणून घेत असतो तो च्यवनप्राशही महर्षि च्यवनांची देणगी आपणास प्राप्त झालेली आहे. च्यवन भार्गव आख्यान खूप मोठे आहे परंतु अतिशय रोचक आहे.

दधीची दध्यङ्ग आथर्वणदधीची ऋषींनी आपल्या अस्थी देवकार्यासाठी दिल्या. तपस्येमुळे तसेच विशिष्ट मंत्रांच्या पुरश्चरणामुळे शरीरामधील हाडे सुद्धा वज्र बनून सज्जनांच्या मदतीस येतात. दधीची चरित्र आपल्याला हाच उद्बोध देते. ऋषी परंपरेत भरद्वाज मुनींचे स्थान अत्युच्च आहे. वेदासाठी संपूर्ण जीवन वाहून घेतलेल्या भरद्वाजांना भगवंताने तीन वेळा १००/१०० वर्षांचे आयुष्य प्रदान केले आणि विचारले या आयुष्याचे काय करणार? उत्तर एकच मिळाले वेदाध्ययन.

भरद्वाज चरित्र वाचल्यावर विद्या व्यासंग कसा असावा याचे उत्तर आपल्याला मिळून जाते. ‘वादे वादे जायते तत्वबोधःदोन महान विभूतींमधील वाद जगताला असामान्य भेट देतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे महर्षि याज्ञवल्क्य चरित्र. याज्ञवल्क्यांमुळे आपल्याला शुक्ल यजुर्वेद मिळाला.

अगस्त्य मुनींचे आख्यान किती अद्भुत आहे, विस्तृत आहे. एकच गोष्ट महर्षि अगस्त्य चरित्रात जाणवते की, समुद्र, पर्वत, औषधी वनस्पती, वायु, अग्नी आकाशावर त्यांची सत्ता चालत होती.

गौतम चरित्र कृषि शास्त्रावर प्रकाश टाकतेच तसेच गौतमी गोदावरी नदीचा संबंध दर्शविते आणि आपणा सर्वांना अपरिचित अशा वेगळ्याच अहिल्या आख्यानाची माहिती देते. जरत्कारू आख्यान आपल्याला आणखीनच वेगळ्या विश्वात नेते. परंतु प्रत्येक आख्यानाचा आपण केवळ गोष्ट म्हणून विचार न करता त्यातील गूढ अर्थ शोधावयाचा प्रयत्न करावयास हवा. तसेच त्यांनी सर्पभय मुक्तिमंत्र दिलेले आहेत, त्याचाही आपण योग्य उपयोग करून घेऊया.

महर्षि अत्रिअत्रिंचे नाव घेतले की, आपणास भगवान् गुरुदेव दत्तात्रेयांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. महर्षि अत्रि आणि माता अनुसूया हे चरित्र केवळ वाचनाने अनेकविध पापांचा नाश करणारे आहे.

एकाच वेळी दोन, तीन देहाने वावरणारे आणि आपल्या सामर्थ्याने देवराज इंद्राचे सुद्धा रक्षण करणारे गृत्समद ऋषी. तसेच या जगतातील आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक ज्ञान अष्टावक्रगीतेतून प्रगट करणारे महर्षि अष्टावक्र. तसेच ज्यांचे चरित्र आपणा पैकी अनेकांना पूर्णपणे अपरिचित आहे. जसे महर्षि संवर्त. जे बृहस्पतिचे अनुज आहेत. संवर्त आख्यान मननीय आहे. तर गुरुभक्त उत्तंक आख्यान केवळ गुरू भक्तीने काय घडू शकते याचे एक आदर्श उदाहरणच आहे.

मतंगमुनींचे आख्यान आपल्याला एक असा संदेश देते की वर्ण संकर हा किती वाईट असतो. सध्याच्या काळात राजाच वर्णसंकरास प्रोत्साहित करीत आहे. परंतु भगवत् गीतेत वर्णन केल्याप्रमाणेसंकरो नरकायैवहेच वचन किती बरोबर आहे हे पटते. एखादाच मतंगमुनी संकरित असून तपाचरणाने श्रेष्ठत्व पावलेला दिसेल. त्यामुळे आज जे लोक श्रेष्ठ कुळात उत्पन्न झाले त्यांनी निदान विचार करावा आपले कुल काय आहे आणि आपले वर्तन कसे आहे?

महात्मा गोकर्ण आख्यान बऱ्याच जणांना परिचयाचे आहे. बहुतेक अनेक जणांनी श्रीमत् भागवत कथेमध्ये गोकर्ण आख्यान अनेकवेळा ऐकलेले वाचलेले आहे. हा संपूर्ण ऋषिपरिचय ज्यांचे मुळे झाला त्या वेद व्यासांना विसरून चालणार नाही. व्यासोच्छिष्टं जगत् सर्वं हे वचन ध्यानात ठेवावे.

अचतुर्वदनो ब्रह्मा, द्विबाहुरपरो हरिः

अभाललोचनः शंभुः भगवान् बादरायणः

चार मुखे नाहीत परंतु ब्रह्मदेवाप्रमाणे आहेत. चार हात नाहीत परंतु नारायणाप्रमाणे कार्य करतात. त्रिनेत्र नाहीत परंतु भगवान् शिवाप्रमाणे आहेत असे एकमेव अद्वितीय रत्न म्हणजे भगवान् वेदव्यास. व्यास चरित्र आणि व्यास वाङ्मय रसानुवाद करणारा साधक स्वतःच व्यासांसारखा होतो अशी चमत्कृती आपल्याला इतरत्र कोठेही पाहावयास मिळणार नाही.

स्वामी श्रीकृष्ण भारतींनी ऋषी परिचय या शीर्षकाने समर्थ साप्ताहिकात जी लेखमाला जिज्ञासू वाचकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. स्वामिजी स्वतः भक्त आहेत पण नुसते भाबडे भक्त नसून ज्ञानोत्तर आणि अनुभवोत्तर भक्ति करणारे आहे. कवी मनाचे असून अत्यंत शोधक व्यक्तिमत्वाचे साधक आहेत. त्यांच्या तपस्येचेच हे फळ एकत्र आपल्याला पुस्तकरूपाने प्राप्त होत आहे. अशीच त्यांची कृपा आम्हा साधक वाचक वर्गावर राहावी. तसेच त्यांना उत्तम आयुआरोग्य प्राप्त व्हावे ही ईशचरणी प्रार्थना करून ही प्रस्तावना पुरी करतो. धन्यवाद!

- वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले.


Format: Adaptive

Publisher: श्रुतीगंध (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)