125 300
Download Bookhungama App

Publishड अनपब्लिशed - उमेश पटवर्धन

Description:

जुलै २०१६ मध्ये मी विक्रम भागवत सरांच्या नुक्कड कथा कार्यशाळेत सहभाग घेतला आणि सुप्तावस्थेत गेलेल्या माझ्या लेखनाला नवसंजीवनी मिळाली. कार्यशाळेच्या प्रभावामुळे मी काही लघुकथा लिहिल्या. त्यातल्या बऱ्याचशा नुक्कडवर प्रसिद्धही झाल्या आणि माझा हुरूप वाढला. तेव्हापासून परत सुरू झालेला हा कथालेखनाचा प्रवास आजतागायत चालू आहे. हा एकूणच कथाप्रवास आणि या कथा आता ऐका ऑडीओ-बुक स्वरुपात.प्रास्ताविक

 

उमेश पटवर्धन यांची ‘परी’ ही कथा पहिल्यांदा माझ्या वाचनात आली. वाचता क्षणी आवडली, मी लगेच तिचे इंग्रजीत भाषांतर केले... आणि माझ्या अमराठी मैत्रिणीनी तिला मनापासून दाद दिली. कथा आकाराने छोटीच, लघुत्तमच, पण वाचकांना भिडण्याची तिची क्षमता मोठी !

 

जसे काव्यात ‘हायकू’, तसे गद्यात ‘लघुत्तम कथा’. लघुकथा लिहिण्यातले सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे कथानकातला ‘तो क्षण’ नेमका पकडता आला पाहिजे. मर्यादित शब्दात, तीव्र विचार-भावनांचा परिणाम साधते ती लघुत्तम कथा बराच काळ मनात रेंगाळत राहाते. विचार करायला लावते. या संग्रहातील इतर अनेक कथांप्रमाणेच, ‘दहा रुपये’ ही गोष्ट बाजारशरणता, आणि माणुसकी पासून तोडणारी बाजारविवशता पटकन अधोरेखित करते. अरे, हे मी पण केलेय कधी ना कधी ! डोळे उघडतात, आपल्याच छोट्यामोठ्या कृतीमागचे कार्यकारण शोधायला लावणारी ही कथा, केवळ उदाहरण आहे. या संग्रहातील अनेक छोट्या छोट्या कथांमधून समोर येणारी मूल्य व्यवस्था, तिच्यातील ताणेबाणे मला फार महत्त्वाचे वाटतात. बहुतेक पात्रे मध्यमवर्गातून येतात, सोबत आपली सुख दुःखे घेऊन येतात, काही आपल्यालाच नव्याने समजते, काहीवेळा ‘हे इतकं साधं पण लक्षात कसं आलं नाही’, असं म्हणून आपण पुढे जातो.

 

‘शिकार’, ‘उंची’ सारख्या रूपक कथा लिहून लेखकाने आणखी एका समृद्ध दालनाला हात घातला आहे. रूपक कथा जे सांगायचेय, ते तंतोतंत वाचकांपर्यंत पोहोचवू शकल्या तरच यशस्वी होतात.... आणि लेखकाने यात बाजी मारली आहे. इथे आणखी एक गोष्ट विशेष नमूद करावीशी वाटते, यातील ‘चित्रवत’, ‘गूढकथा’, ‘ओळख’ सारख्या कथा, लेखन प्रक्रियेचा, कलामाध्यमांचा उहापोह करताना दिसतात. सत्य, आभास, त्यांची सरमिसळ, कलाकार, त्याची कलाकृती याविषयी या कथा बोलत राहातात. असे लेखन प्रदीर्घ चिंतनातून जन्माला येते. या दिशेने लेखकाने आपली चिंतनशीलता, वाचन वाढवल्यास वेगळ्या धर्तीचे लेखन नक्कीच होईल, असा विश्वास वाटतो.

 

या सगळ्याच कथा, केवळ मनोरंजनाचे मूल्य घेऊन येत नाहीत. त्यांना रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींची झालर आहे, चांगल्या वाईटाची जाण आहे, हरपल्याची हुरहूर आहे, नाविन्याचा ध्यास आहे, मानवी मनाचे सूक्ष्म तरंग टिपण्याची तीव्र ओढ आहे.... म्हणूनच या निरनिराळ्या लांबीच्या कथांना कोणतेही लेबल न लावता वाचावे. यात ‘चांगले काही’ वाचल्याचा आनंद नक्कीच आहे.

 

बाकी लघुत्तम, लघु, दीर्घ किंवा कुठल्याही लांबीच्या आकृतिबंधात किती अडकायचे, त्यातून कसे बाहेर पडायचे, पडायचे की नाही, हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण अनुभवमांडणीत संपन्नता येत गेली की आकृतिबंधाच्या अधिकउणेपणाला फारसे महत्त्व उरत नाही.

 

उमेश पटवर्धन यांचा हा पहिलाच कथा संग्रह आपणा सर्वांना आवडेल, ही खात्री आहे. त्यांच्या पुढील लेखन कारकिर्दीस माझ्या मनापासून शुभेच्छा. खूप लिहा, उत्तम लिहा, लिहिते रहा.

 

शुभेच्छांसह,

 

शिवकन्या शशी

 


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि