250 500
Download Bookhungama App

पार्कातल्या कविता - Parkatlya Kavita

Description:

पार्कातल्या कविता - पुणे येथे झालेल्या कार्यक्रमाचे ऑडिओबुक 

संकल्पना - सूत्रधार : स्वरूपा सामंत , विजय उतेकर 

सूत्रसंचालन : सदानंद बेंद्रेएखादा रविवार, दुपारी जेवणानंतरची वेळ, अन तरीही तुम्ही एखाद्या पार्कात, उतरत्या उन्हाच्या अन् पसरत्या सावलीच्या पाठशिवणीच्या खेळात, अवतीभवती हिरवागार निसर्ग अन समोर दहा कवी, कवितेच्या फौजफाट्यासह. तुम्ही भिडायला उत्सुक, बसायला खुर्ची नाही, हॉल नाही, एसी नाही, शांतताही नाही. झाडांकडे घरट्यात परतणाऱ्या पक्ष्यांचा अन् आसपास खेळणाऱ्या मुलांचा किलबिलाट हे सगळं आहेच. अशातच एक कवी आपली कविता वाचतो अन् तुम्ही फक्त त्यातच रमता. तो शब्दांमधून सूर पेरत जातो अन तुमच्या उरात त्याच्या संवेदनांच गाणं उमटत राहतं. त्याची धुंदी उतरते न उतरते इतक्यात दुसरा कवी त्याची कविता सादर करतो. तो देखील तितक्याच आर्ततेने तुमच्या रसिकतेला साद घालतो अन् तुम्ही आपल्या मनाचा हात सहज त्याच्या हातात देता अन् तो त्या पार्कात बसूनच शेकडो लोक सभोवती असताना फक्त तुमच्याशीच काहीतरी हितगुज करतो. हे भिडणं उत्तरोत्तर रंगतच जातं.  खरंय, कुठली कविता कुणाला कशी भेटेल हे ती अनुभवण्याआधी सांगता येणं अशक्यप्राय आहे आणि या भेटीचा हा असा सर्वात अनौपचारिक अनुभव म्हणजे "पार्कातल्या कविता" हा कार्यक्रम. 

कवितेची जी काही बलस्थानं आहेत, त्यातलं मला सर्वात भावलेलं बलस्थान म्हणजे कविता ही उलगडत जाते. तिचा हा प्रवास अनुभवण्यासाठी रसिक श्रोतादेखील तितकाच उत्सुक आणि तत्पर हवा. काही कवीसंमेलने आणि मुशायरे पाहून प्लास्टिकची फुले अन् लाकडी फळे वाट्याला आल्यासारखे वाटलं तसेच अस्सल कवितेला भेटण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं हे मनात रुजलं. त्याच दरम्यान स्नेही प्रो. संजय शिंदे यांची संकल्पना असलेला 'मुक्काम पोस्ट कविता' हा एक दर्जेदार कार्यक्रम पाहण्यात आला. आपल्याला नक्की काय करायचंय हे मला आणि स्वरूपा सामंत यांना या कार्यक्रमानंतरच जाणवलं. पुढे आमच्या गप्पांमधून 'पार्कातल्या कविता'ची रूपरेषा घडत गेली. आम्हाला सर्वात आधी हे जाणवलं कि कवितेला भेटण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ती कवितेची मोबिलिटी वाढवणं. चार भिंतीत तिला अनुभवण्यासोबतच अनेक ठिकाणी तिची भेट घडवून आणणं गरजेचं आहे. याआधी पण काही मोजकेच स्नेही कुणा एकाच्या घरी भेटून आपलं नवीन लिहिलेलं एकमेकांना वाचून दाखवत होते नि काही प्रमाणात आजही हे घडतं पण त्याला कुणीही अशा कार्यक्रम स्वरूपात पुढे आणलं नव्हतं. 

कवितेच्या मोबिलिटीसाठी आम्ही पार्क म्हणजेच उद्यान हा समान धागा ठेवला कारण एकतर निसर्गाचा थेट सहवास आणि दुसरं म्हणजे पार्क कुठल्याही लहान मोठ्या शहरात, उपनगरात नि गावात सहज उपलब्ध असतात. रसिक श्रोत्यांसाठी दहा कवी अन् त्यांच्या प्रत्येकी दोन अशा वीस कवितांचं सादरीकरण करायचं ठरलं. प्रत्येक प्रयोगाला पार्क आणि कवी नवे असतील अशी मूळ रूपरेषा ठरली अन् आकाराला आला 'पार्कातल्या कविता' हा एक बॅनरलेस तसेच विनामूल्य प्रवेशाचा कार्यक्रम जिथे स्टेजही नसेल अन माईकही. कवी, श्रोता, निसर्ग आणि कविता या साऱ्यांना एकाच प्रतलात आणणारा कार्यक्रम. 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि