Id SKU Name Cover Mp3
निवडक शान्ता शेळके - संपादक : पुरुषोत्तम धाक्रस


90 145.00
Download Bookhungama App

निवडक शान्ता शेळके - संपादक : पुरुषोत्तम धाक्रस

Description:

निवडक शान्ता शेळके - संपादक : पुरुषोत्तम धाक्रसएखाद्या साहित्यिकाच्या अगणित साहित्यातून निवडक असे साहित्य बाजूला काढून त्याचा एक संग्रह उभा करणे हे काम चांगले वाटले तरी असते बिकटच. त्यातून कथा वा काव्य अशा एकाच प्रकारातून ही निवड करायची असेल तर काम थोडे हलके होते. पण साहित्याच्या सतरा प्रकारांतून या ना त्या प्रकारे लक्षणीय तेवढेच निवडून काढायचे म्हणजे शंभर प्रकारांतून मोजक्या खाद्यपदार्थांनी भरलेले ताट पुढ्यात ठेवण्याइतके अवघड असते.

मूळ लेखकाला सुद्धा हे काम अवघड जागच्या दुखण्यासारखे होऊन बसते. कारणनिवडकया शब्दात निवड करणाऱ्या महाभागाचीआवडप्रमाण मानावी लागते. अनेकदा ही आवड म्हणजेच निवडशेळी जाते जिवानिशी- खाणारा म्हणतो वातडअसे म्हणण्याची पाळी मूळ लेखकावर आणते. त्याने आपल्या परीने अतिशय चांगला म्हणून ठरवलेला लेख किंवा कथा-कविता हे निवड करणारे गृहस्थपण मला नाही तेवढी आवडली-” म्हणून शांतपणे बाजूला सारतात. तरीही मूळ लेखकाला वरकरणीनाही म्हणजे तुमचं बरोबर. मला आवडेल ते तुम्हाला आवडेलच असं नाही!” असे म्हणूनखेळकरपणादाखवावा लागतो. एकंदरीत निवड करणारे गृहस्थ परीक्षक बनून मूळ लेखकावर परीक्षेला बसणारा विद्यार्थी बनण्याची पाळी आणतात. आजवर साहित्याच्या अनेकविध दालनांत निर्धास्तपणे चालवलेली लेखणी त्याला इथे म्यान करून ठेवावी लागते!

पण लेखकावर वरचष्मा ठेवण्याचा मौका मिळालेले हे निवडकार पुस्तक बाहेर आल्यावर साक्षेपी वाचकांपुढे स्वतः परीक्षार्थी बनत असतात. याचाच अर्थ तिकडचा परीक्षक नैतिकदृष्ट्या इकडचा विद्यार्थी ठरतो. शिकारी स्वतःच शिकार बनतो!

यात भाग्यवान असतो तो वाचक. त्याच्यापुढे येते ते समुद्रमंथन करून काढलेले अमृत. निवड कशीही असली तरी संख्येने तरी हे साहित्य निवडक असतेच! शिवाय निवड करणाऱ्या महाभागाची निवड ज्याअर्थी खुद्द लेखकानेच मान्य केलेली असते, त्याअर्थी त्याच्या हातून काही तरी चांगले हाती लागण्याचा संभव असतोच.

एवढे सारे सांगितल्यावर शांता शेळके यांचे एकूण साहित्य समुद्रासारखे अथांग आहे हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. खुद्द शांताबाईंनाच त्याचा नीटसा पत्ता नसावा. कारण शांताबाईंनी स्वतःच्या छापील-अछापील साहित्याचे अनेक गठ्ठे माझ्या स्वाधीन करूनसुद्धाआणखीही बरेच काही राहून गेले असल्याची खंत मागे राखून ठेवलेली आहेच. (त्यामुळे पुढेमागेनिवडक शांता शेळके- नंबर दोनबाहेर येण्याची वाट मोकळी राहिलेली आहे!)

शांताबाईंच्या या उदंड साहित्याचे नानाविध प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराला नाव काय द्यायचे असा प्रश्न पडण्याइतके हे प्रकार आहेत. कथा, काव्य, कादंबरी, व्यक्तिचित्रे, ललित लेख, संस्मरणे, आत्मकथन, गीते, चित्रगीते, लावण्या, बालगीते हे झाले त्यांच्या स्वतःच्या निर्मितीचे प्रकार. यांखेरीज इतरांच्या निर्मितीवरील स्फुट भाष्ये, समीक्षा, रसास्वाद, मुलाखती आणि अशा कोणत्याही ढोबळ वा रूढ प्रकारात नीटसे बसवता येणार नाही असे लेखन आहे ते वेगळेच. उदाहरणार्थ : ‘हंसमासिकात एका काळी त्यांनी इंग्रजी चित्रपटकथा अनुवादित केल्या होत्या. इतकेच काय शांताबाईंनी प्रारंभकाळात अर्थार्जनासाठी शालेय मुलांसाठी गाइडेही लिहून दिली होती! असा हा त्यांचा साहित्यसंभार डोंगरासारखा पसरला आहे, आणि त्यात अनुवादांचेही एक टेकाड आहे. (त्यामुळे हे पुस्तक म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्याचा आक्षेप माझ्यावर येणार आहेच!)

यांपैकी कादंबरी हा प्रकार त्यांच्या निवडक साहित्यात घेतला तर बाकी साहित्यप्रकार पुस्तकाबाहेर ठेवण्याचा प्रसंग येईल म्हणून तो यातून वगळला आहे. नमुन्यादाखल कादंबरीतला एखादा भाग देणे म्हणजे माणसाचा एखादा अवयव पुढे करण्यासारखे होते. हे पुस्तक जाणत्या वाचकांसाठी असल्यामुळे बालकथा-गीते आदींचा समावेश त्यात केलेला नाहीच. शांताबाईंनी अनुवादित केलेले साहित्य (मुळात निवडक असूनही) या पुस्तकात अंतर्भूत केलेले नाही. उरलेले बहुतेक प्रकार यात घेतले आहेत. तुम्ही म्हणाल, “तरी तुमचंबहुतेकआहेच का?” बहुतेक म्हणण्याचा हेतू असा की, विविध सदरांतून आपण नेमके काय आणि किती लिहिले आहे, याचा खुद्द लेखिकेलाच पत्ता नाही. (तो पत्ता लागेपर्यंत थांबायचे म्हटले तर तेवढ्यात आणखी काही साहित्यप्रकारांची भर त्यात पडण्याचा बाका प्रसंग ओढवला असता!) तेव्हा शेवटी आहे त्यात भागवून ही निवड केली आहे.

विपुल साहित्य-निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचे एक बरे असते. आपली प्रत्येक कृती ही कलाकृती असल्याचा त्यांचा दावा नसतो. ही मंडळी अनेक बैठकींतून एक कलाकृती घडवणाऱ्यांच्या संथ पंथातली नसते. थांबला तो संपला असा हा विपुलतावादी पंथ असतो. जे काही हाती लागेल ते घेऊन पुढच्याला हात घालायला त्यांना हात मोकळा हवा असतो. यातून सहजगत्या जे जमून जाईल त्यावर ही मंडळी समाधान मानून चाललेली असते. शांता शेळके यांचा पंथ अशांपैकी आहे.

त्यांचे बहुतांश साहित्य मागणी तेवढा (तसा नव्हे) पुरवठा अशा वाटेने आलेले आहे. म्हणूनच त्यांचे बरेचसे ललित गद्य हे एकपानी आणि पाचपानी असे आहे! स्फुट लेखनापासून रसास्वादापर्यंत मागणीनुसार त्यांना ललित लेखनाचे अनेक प्रकार हाताळावे लागले. त्यामुळे इतरांच्या मुलांचे करता-सवरताना पोटच्या पोराची आबाळ व्हावी तसा काहीसा प्रकार त्यांच्या काव्य-कथा-कादंबरीचा झाला आहे. त्यातल्या त्यात काव्य हा उपजत आवडीचा आणि वेळ कमी खाणारा प्रकार असल्यामुळे तिथे भरीव असे काही करता आले. पण कथा वाङ्मयात शक्य असूनही त्यांना आपला ठसा उमटवता आलेला नाही. तीच गोष्ट कादंबरीची. त्यांच्या सहा कादंबऱ्या आणि आठ कथासंग्रह प्रकाशित झाले. पण त्यात त्यांच्या मागे लागलल्या घाईगडबडीचा वाटा जास्त आहे.

त्यांच्या एकूण लेखनाचा व्याप पाहिला तर कथा-कादंबरीपेक्षा ललित आणि रसास्वादात्मक लेखनातच त्या जास्त रमलेल्या दिसतात. रसग्रहणामध्ये आपल्या अध्यापकीय पेशानुसार समजून घेण्यावर आणि समजावून देण्यावर त्यांचा विशेष भर दिसतो. समीक्षेत जो कटाक्ष, जी काटेकोरता अभिप्रेत असते ती शांताबाईंच्या वृत्तीत अभावाने दिसते. एखादे तत्वज्ञान घेऊन त्याचा पाठपुरावा करीत जाणारी ही लेखणी नाही. ती मधमाशीच्या वाटेने जाणारी, सौंदर्याच्या, भलेपणाच्या, आगळ्या-वेगळ्या कल्पनांच्या शोधात असणारी लेखणी आहे. ती तिखट वा खवचट होत नाही. नव्या वाटा धुंडाळण्यापेक्षा मळलेल्या वाटा अधिक मोकळ्या, सुशोभित आणि वेधक करण्याचे मोलाचे काम मात्र त्यांच्या लेखणीने साध्य केलेले आहे यात शंका नाही.

आपली कथा किंवा कविता उत्कृष्टच झाली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष नाही ती वाईट नाही ना, एवढेच त्या पाहतात. त्यांच्या काही कथा कथेच्या नेमक्या रूढ चौकटीत बसणाऱ्या नाहीत. सहज एखादी गोष्ट सांगून वा दाखवून जाणे हा तिचा स्थायीभाव आहे. इथे त्यांच्या चार कथा घेतल्या आहेत यांपैकी पहिलीलिलू’. यातील लिलू ही स्वतःचे महत्त्वपूर्ण स्थान टिकवण्यासाठी मैत्रिणींच्या वर्तुळात एकमेकींविषयी संशय, शंका, तिटकारा यांचे लोण पसरवीत जाते. संशयाचे एकेक पिल्लू एकेकीच्या मनात सोडून, त्यांच्यात्यांच्यात दुरावा निर्माण करून स्वतःचे त्यांच्यातील स्थान पुन्हा मजबूत करणारी ही लिलू उच्चभ्रू समाजातील रिकामटेकड्या जीवनाचे प्रत्ययंकारी चित्रण करते. कथेपेक्षा लिलूचे समर्पक व्यक्तिचित्र म्हणून ती मनात तरळत राहते. दुसरीकणवही कथा सत्य घटनेच्या वळणाने जाणारी आहे. ज्याच्याविषयी आपण सतत कणव बाळगली, वेळोवेळी आपण ज्याला मदत केली तोच माणूस पुढे आपलीच कणव बाळगून आहे, असे एक विस्मयकारी चित्र उभे करून ती संपते. तिसरीरहस्यही कथा शेवटपर्यंत वाचकाला रहस्यात ठेवते, परंतु तरीही तीरहस्यकथानाही. या कथेत जो कडेलोट करायला निघाला त्याचाच शेवटी कडेलोट होतो. गंमत अशी की, त्याच्यावर उलटलेला हा डाव त्याने उलटवलेला कुठेही न दाखवता तो त्यानेच उलटवलेला असावा असा एक आभास निर्माण करून ही कथा संपते. त्यामुळेच वाचकाच्या मनात ती खोल जाते. चौथीआंबाही कथा आंब्याच्या रोपाचे अल्पायुषी जीवन दोन माणसांच्या जीवनात तिसऱ्या माणसाचे स्थान कसे घेते याची अत्यंत वेधक हकीकत सांगते. या चारही कथा हकीकती वाटाव्या इतक्या सहजसुलभ शैलीत शांताबाईंनी लिहिल्या आहेत. त्या जितक्या सहजतेने मनात उतरतात तितक्याच नकळत मनात उरतात.

शांताबाईंच्या दीर्घ जीवनात खूप माणसे येऊनही त्यांचे व्यक्तिचित्रांचे पुस्तक एकच आहे : ‘वडीलधारी माणसे’. गंमत अशी की यांतील काही व्यक्ती शांताबाईंना कोणत्याच अर्थाने वडीलधाऱ्या नसूनही त्यांनी त्यांना वडीलधाऱ्या मानून स्वतःकडे लहानपण घेतले आहे. शांताबाईंच्या व्यक्तिमत्वाचा तो एक खास पैलू आहे. एवढा लेखनसंभार पदरी असूनही त्यांचा तोरा कुठेही नाही. भपकेबाज (आणि भंपकही) हिंदी चित्रपटवाल्यांच्या मेळाव्यात त्या बुजून जातात! आपणाला कादंबरीलेखन जमले नाही हे जेवढ्या मोकळेपणाने त्या बोलून दाखवतात तेवढ्याच मोकळेपणाने आपली आई आजही आपणाला बावळट म्हणते आणि ते बरोबर आहे, असेही त्या सांगून जातात.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि