40.00 82.00
Download Bookhungama App

मिस्ड् कॉल - मिस्ड् कॉल

Description:

मिस्ड् कॉलही एका घडून गेलेल्या दुःखद घटनेची साद्यंत हकिगत आहे. थोड्या फार फरकानं असे दुर्धर प्रसंग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडून येत असतातच. आता सुजाण वाचकांनीच या पुस्तकाचा निवाडा करावा.लेखकाचे मनोगत

डिसेंबर २००८ हे माझ्या आयुष्यातील काळ्या तोंडानं पलायन करून सरलेलं वर्ष. ‘हॉजकिन्स लिंफोमानावाच्या कर्करोगाचा उद्भव होऊन माझ्या प्रिय पत्नीला काळानं ओढून नेलं, हे दुर्दैवच म्हणायचं! मी रंगवलेली भावी आयुष्यातील सुखचित्रं धूसर होत गेली. त्या सुमारास माझा मुलगा हृषी, सून सुमेघा आणि मुलगी ओजस्विनी आपापल्या वैद्यकीय कार्यक्षेत्रात कर्तृत्वाच्या यशाची एकेक पायरी गाठून वाटचाल करीतच होती. एकूणच त्या बिकट कालपर्वात मी जनरल प्रॅक्टिशनर म्हणून एकहाती ही दैवाची लढाई लढत होतो. ही एकाकी लढत देण्यावाचून मला अन्य पर्यायच नव्हता. सकाळी सूर्य उगवल्यापासून ते रात्र होईस्तोवर मी सतत कामात बुडून गेलेला असायचो. त्या रोजच्या दगदग-धावपळीतच मी पु. . देशपांडे, गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आदी मातब्बर सारस्वतांची अभिजात पुस्तकं वाचून काढली.

ही दुर्धर घटना घडून गेल्यानंतर उरी दुःख वागवत २००९ सालच्या मार्च महिन्यात मी पुण्यात येऊन गेलो. तिथं मला माझी जवळची आप्तमंडळी भेटली. थोरले साडू - ज्येष्ठ संपादक आनंद अंतरकर, चुलत मेहुणे दिलीप, किशोर जोगळेकर वगैरे सुहृदांनी कै. दीपाच्या जीवघेण्या आजारपणातील अखेरच्या दिवसांच्या अनुभवांवर लिहिण्याविषयी सुचवलं. या लिहिण्यामुळं माझं दुःख काही प्रमाणात हलकं होईल असं त्यांना मनापासून वाटलं असावं. मी बरेच दिवस त्यांचं हे म्हणणं मनावर घेतलं नाही. माझा माझ्या अतंर्मनाशी होणारा संघर्ष तसाच अविरतपणे चालू राहिला. खरोखरीच माझ्या हितचिंतकांनी माझ्यासमोर लेखनाचं हे एक जणू आव्हानच उभं केलं होतं.

२०१० सालातील वसंतागमन. एका शनिवारच्या शुभ्र सकाळी मी एका दमात नऊ पानं टाइप करून ती आनंद अंतरकरांना पाठवून दिली. चारएक महिन्यांचा कालावधी लोटला असेल नसेल, एके दिवशी अचानक आनंदरावांचा मला फोन आला : “तुमचं लेखन चांगलं उतरतं आहे, पुढं लिहीत राहा. या लेखनाचं एक सुरेख पुस्तक होईल. फक्त आणखी लेखनाची भर घालावी लागेल.”

मला क्षणभर वाटलं की आनंदराव म्हणतील,  “लिखाण सुमार झालं आहे.” पण ते वाढीव मजकूर लिहायला सांगून जणू माझी फिरकीच घेत नसतील? तसं असेल तर आपसुकच सुंठीवाचून खोकला जाणार होता.

 २०१० सालच्या सप्टेंबर महिन्यात मी उडून गेलेल्या काळाचं सिंहावलोकन केलं, आणि त्या विचार मंथनातून मला निखळ समाधान आणि पुढं जगण्याचं आत्मिक बळ प्राप्त झालं. मी आणि माझं आयुष्य यांतील विसंवादाला त्यातून पूर्णविराम मिळाला. ती एक दुःखमुक्तीकडे जाण्याची प्रक्रिया होती. २०११ सालच्या मे महिन्यात मी माझं लेखन संपवून हातावेगळं केलं. माझ्या मस्तकात चिंतांचं काहूर उठवणारा तो काळाकुट्ट ढग आता बरसून मोकळा झाला होता. माझं आकाश स्वच्छ, मोकळं निरभ्र, निळंभोर झालं होतं.

गेल्या वर्षभरात माझ्या परोक्ष या पुस्तकनिर्मितीचे सारे सोहाळे पार पडले; आणि आता तर माझा विश्वासच बसत नाहीये. माझे धाकटे मेहुणे शरतकुमार माडगूळकर आणि आनंदराव अंतरकर यांनी या साऱ्यातून एक सुरेख पुस्तक रसिक वाचकांसमोर सादर केलं आहे. त्या दोघाजणांना माझे शतशः धन्यवाद. त्यांनी वेळोवेळी केलेल्या अनमोल सूचना, दिलेलं प्रोत्साहन आणि घेतलेले अथक परिश्रम याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

मिस्ड् कॉलही एका घडून गेलेल्या दुःखद घटनेची साद्यंत हकिगत आहे. थोड्या फार फरकानं असे दुर्धर प्रसंग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडून येत असतातच. आता सुजाण वाचकांनीच या पुस्तकाचा निवाडा करावा.


Format: Adaptive

Publisher: Vishwa Mohini Prakashan