110.00 130.00
Download Bookhungama App

माझ्या प्रकाशवाटा - प्रकाश पिटकर

Description:

प्रवास मग तो कोणताही असो, आपल्याला अनुभवसंपन्न करत जातो. “माझ्या प्रकाशवाटाहे पुस्तक वाचत असताना त्यातले निरनिराळे प्रवास वाचकही करतो आणि समृद्ध होत जातो. “धूप में निकलो घटाओं में नहा कर देखो, ज़िन्दगी क्या है किताबों को हटा कर देखोअसं हे पुस्तक प्रत्येकाला वाटायला लावेल.प्रस्तावना

दोन्ही बाजूला दाट जंगल आणि मधूनच जाणारा हा तांबडा रस्ता म्हणजे जलरंगातले एक सुंदर निसर्गचित्र होते. इथल्या हवेला झाडांच्या मोहोराचा, मोहाच्या फुलांचा, गवताचा मंद सुवास असे आणि नाना पाखरांच्या सकाळच्या कूजनाचा नाद असे. बाकी सर्वत्र शांत, प्रसन्न. भल्या सकाळी उठून एखादे ताजे वृत्तपत्र वाचावे तसा हा रस्ता मी वाचत असे. मोठमोठी शीर्षके असत. काल रात्रीपासून भल्या पहाटेपर्यंत घडलेल्या घटनांचा वृतांत इथे वाचायला मिळे. आजही तो रस्ता मी ताज्या वर्तमानपत्रासारखा वाचला आणि वाटा धुंडताना रहस्यकथेच्या पानातून वावरलो. सुतानं स्वर्गाला कसे जाता येतं ते ह्या वाटांनी मला दाखविले. काहीही मिळवायचं म्हणजे वाटा या तुडवाव्या लागतातच... !”

वाटाअसा शब्द उच्चारला तरी मला व्यंकटेश माडगूळकर यांनी अत्यंत नेटक्या शब्दात एका जंगलातल्या वाटेचं रंगवलेलं हे शब्दचित्र आठवतं. वाटा तुडवणं हे प्रत्येकासाठी अपरिहार्यच असल्यामुळे आयुष्याला अनेक लेखक आणि कवींनी प्रवासाच्या उपमा दिलेल्या दिसतात. जिंदगी एक सफर है सुहाना; जिंदगी का सफर, है यह कैसा सफर; चलते रहते है, के चलना है मुसाफिर का नसीब; अपनी मर्जीसे कहां अपने सफर के हम है आणि सफर में धुप तो होगी थोडी देर साथ चलो अशी असंख्य गाणी/गझल्स यावरुन आठवतात.

पणमाझ्या प्रकाशवाटाहे पुस्तक वाचूनहमको तो सफर प्यारा मंझिल का खुदा हाफिज़याच ओळींची प्रकर्षानं आठवण होते... ! या पुस्तकाच्या लेखकानं अतिशय प्रसन्न मनानं आणि खुल्या दिलानं आयुष्याचा आणि या पुस्तकात वर्णन केलेल्या ठिकाणांचाही प्रवास केला आहे.

माझ्या पहिल्या पुस्तकाला तुम्ही प्रस्तावना लिहाल का ?” असा प्रकाश पिटकर यांचा फोन आल्यावर मी ताबडतोब होकार दिला याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भरपूर भटकंती करणं हा प्रकार मला अत्यंत भावतो. त्यामुळेच एरिक वायनर हा माझा अत्यंत आवडता लेखक आहे. जगात सर्वात आनंदी लोक कुठल्या प्रदेशात आहेत आणि जगात सर्वात जास्त जिनिअस लोक कुठे आणि का पैदा झाले याचा शोध घेत एरिक जगभर भटकला. त्या भटकंतीतून त्यानंजिआॉग्रॉफी आॉफ ब्लिसआणिजिऑग्रॉफी ऑफ जिनिअसही दोन बेस्टसेलर पुस्तकं लिहिली आहेत... !

खरं तर प्रवासवर्णनं हा लेखनाचा प्रकार अनेकजणांना मोह घालतो. मराठी भाषेपुरतं आणि जरा परखडपणे बोलायचं झालं तर भारतातल्या दिल्ली, आग्रा, उत्तरांचल, काश्मीर, केरळ, कन्याकुमारी इथपासून थायलंड, सिंगापूर, बाली, मलेशिया, मॉरिशस या ठिकाणांची प्रवासवर्णनं मराठीत भरपूर सापडतात. युरोप आणि अमेरिकेला वलय आहे. त्यामुळे ती प्रवासवर्णनं लिहिल्यानंतर अनेकांना कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळतं. प्रत्यक्षात मुलाच्या किंवा मुलीच्या नवजात अपत्यांचा सांभाळ या कारणांसाठी गेलेले अनेकजण आमची अमेरिकावारी (विशेषत: कॅलिफोर्नियावारी) अशी वर्णनं लिहायला खूप उत्सुक असतात. “एका रानवेड्याची शोधयात्राअशी काही पुस्तकं मात्र याला नक्कीच अपवाद आहेत.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि