60 116
Download Bookhungama App

हौसा - संजन मोरे

Description:

हौशी वयात आली. हौशीचं लग्न ठरलं. भर दुपारी एकांत बघून घरात घुसलेल्या धटींगणांकडून देहाचा अर्धवट चोळामोळा करून घेतलेली हौशी, भडकती आग पदरात बांधून, अभंग देहाने लग्नाला सामोरी गेली. हौशीचं लग्न लागलं......(१) हौशी तशी चांगली होती.... काळी सावळी, तुकतुकीत अंग कांतीची. टप्पोऱ्या भोकऱ्या डोळ्याची, तरतरीत. बिनधास्त, स्वच्छंदी रान पाखरासारखी. मुलांत खेळणारी, पोरांत रमणारी, डोहात पोहणारी, अवखळ चंचल पण तेवढीच रागीट अन् तापट. राना वनात हुंदडायची. पोरगाच जणू. चुकून पोरगी झाली. पोरांशी मारामारी करायची, पोरांच्यात खेळायची. दिवसभर उंडारत असायची. मग वयात आली. पोटरीत कणीस भरावं तशी गच्च भरू लागली. ज्वानीचं पाणी अंगावरून फुटू लागलं तशी ती बावरली. उफाड्या देहावर फुलून, तटतटून येणारी उभार गोलाई बघणारांच्या डोळ्यात मावेनाशी झाली. सवंगडी कावरे बावरे झाले. तिची शाळा आगोदरच बंद झाली होती. हौशी न्हाती धुती झाली अन् तिची म्हसरं बंद झाली. रानावनात हुंदडणं बंद झालं. एखादं मुक्त पाखरू खुराड्यात कोंडून ठेवावं तसं हौशीला झालं. स्वैर, बेबंद जगण्याची सवय असलेली हौशी, तिला घर खायला उठलं. दिवसभर म्हसरं राखायची तेंव्हा दिवस कसा जायचा तिला कळायचं नाही. आता दिवस कसा घालवायचा तिला कळत नव्हतं. आई बाप दिवसभर मजूरीला. धाकटा भाऊ शाळेत, दिवसभर ही मोकळीच. आईचं स्वयंपाक पाणी उरकेपर्यंत हौशी वढ्याला जाऊन धुणं धुऊन आणायची. हौशी तरूण पोरांच्या डोळ्यात भरू लागली. पाण्याची खेप करणाऱ्या हौशीच्या वाटेवर पोरं डोळे लावून बसू लागली, नजरांच्या पायघड्या अंथरू लागली. धुण्याची बादली डोक्यावर घेऊन घराकडे येणाऱ्या हौशीला पोरं डोळ्यात साठवू लागली. तिची ती मागून पुढून दिसणारी डौलदार चाल पोरांना घायाळ करू लागली. हौशीवर नजर ठरेना झाली. हौशीच्या घराम्होरनं पोरांच्या चकरा सुरू झाल्या. घराभोवतीनं मोटारसायकली फिरू लागल्या. असंख्य नवनवीन डोळे तिला न्याहळू लागले. नजरेला नजर भिडू लागली. हौशीच्या देहात झंकार उमटू लागले. अंग मोहरू लागलं. कुणीतरी आपल्या रूपाचं कौतुक करावं म्हणून हौशीपण समोरच्या नजरांना प्रतिसाद देऊ लागली. तिचं पुरूषीपण कधीच संपलं होतं. स्त्रीत्व खळाळू लागलं होतं, लाज वस्तीला आली होती. वर नजर उचलून पाहणारे, बेदरकार, उर्मट डोळे भुई वरून उठेनासे झाले. दिवस जाऊ लागले, तिच्या देहात खळबळ माजू लागली. मनाला धुमारे फुटू लागले. तारूण्य सुलभ भावना उमलून आल्या. नजरेचं मोरपीस फिरल्यावर रोम रोम पुलकित होऊन उठू लागला. ओढ, आकर्षण, हुरहुर, प्रेम, जाग्या झालेल्या चित्रविचित्र भावनांच्या गुंतावळ्यात ती गुरफटून जाऊ लागली.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि