250 500
Download Bookhungama App

दुसरी झुंज - बाबुराव अर्नाळकर

Description:

बाबुराव अर्नाळकरांची थरारक झुंजार कथा.

 रहस्याची सुरुवात! ‘विजू, या मुंबई-पुणे हमरस्त्यावर मी बेहद्द खूश आहे. कारण याच रस्त्याने प्रवास करताना आपल्या आयुष्यातील अनेक मस्त भानगडी घडल्या आहेत. या योगायोगाचे माझ्याप्रमाणे तुलाही आश्चर्य वाटायला हवे.’ भरवेगाने मोटार चालविणारा झुंजार त्याच्या शेजारी बसलेल्या विजयेला म्हणाला. ‘होय. याच रस्त्यावर संकटांत सापडलेल्या कित्येक सुंदरींबरोबर तुमची मैत्री जुळून आली आहे आणि तुम्हाला त्यामुळे खूप मजा करता आली आहे हे अगदी खरे आहे.’ विजया कपाळावर आठ्या चढवून म्हणाली. ‘तू भलतीच संशयी बुवा!’ झुंजार हसून म्हणाला, ‘विजू, तुझ्यावर माझे प्रेम आहे. अगं, आपले लग्न झाले आहे!’ ‘तुमच्यासारख्या स्वच्छंदी माणसाबरोबर लग्न करण्यात माझा महामूर्खपणा झाला आहे.’ ती म्हणाली. ‘पण लग्नाच्या बाबतीत केलेला मूर्खपणा बिचाऱ्या बायकांना कधीच निस्तरता येत नाही.’ झुंजारने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तो म्हणाला, ‘गेल्या दीड दोन वर्षांत माझ्या वाट्याला जी प्रकरणे आली ती अगदीच शेळपट होती. विजू, आज मात्र काहीतरी बेफाम भानगड होणार आणि मला बुद्धी कसाला लावण्याची व शरीराची रग जिरविण्याची चांगली संधी मिळणार असे माझे मन मला सांगत आहे.’ ‘ते स्वप्न रंगविण्याच्या नादात आपली मोटार एखाद्या खड्ड्यात घालू नका म्हणजे झालं!’ विजया म्हणाली, ‘पण मी म्हणते, तुम्हांला या भानगडी हव्यातच कशाला?’ ‘त्याचे कारण आहे.’ झुंजार म्हणाला, ‘जगातील सर्वात मोठी भानगड मी लग्न करून गळ्यात अडकवली आहे. त्यामुळेच इतर भानगडी माझ्याकडे धाव घेत असतात. माझा हा तर्क बरोबर आहे हे तू सुद्धा कबूल करशील!’ विजया काहीच बोलली नाही. पण आपल्या नवऱ्याचे बहुतेक तर्क खरे ठरतात हा अनुभव असल्यामुळे ती मनातून अस्वस्थ झाली होती. या खेपेला काहीही भानगड होऊ नये असे तिला मनापासून वाटत होते. त्यांच्या मोटारीने खंडाळ्याचा घाट ओलांडून खोपोलीत प्रवेश केला. नंतर चौक व पनवेलही मागे पडले आणि विजयेने समाधानाचा सुस्कारा सोडला. आता मुंबई अवघ्या तासा दीड तासाच्या अंतरावर होती आणि तेवढ्या अवधीत काही विशेष घडणे शक्य नाही अशी तिची खात्री होती. त्या विचाराने विजया जितकी आनंदी होती तितकाच झुंजार कष्टी होता. आपल्या अंतर्मनाने या खेपेला दगा दिला असे त्याला वाटत होते. समोरून एक मोटार भरवेगाने येत होती. ती जवळूनच पुढे निघून गेली आणि झुंजारने आपल्या मोटारीचा ब्रेक दाबला. त्या दुसऱ्या मोटारीत आतल्या भागात बसलेल्या कोणा माणसाचे बूट त्याला दिसले होते आणि त्याच्या तीक्ष्ण कानाने अस्पष्ट आरेडणेही ऐकले होते. त्याने लागलीच आपली मोटार ब्रेक दाबून उभी केली. ‘तुम्ही मोटार का थांबविलीत?’ विजयेने विचारले. ‘म्हणजे ते तू पाहिले नाहीस?’ ‘काय पाहिले नाही?’ ‘त्या मोटारीतील एक माणूस खिडकीवर आपले पाय आपटीत होता. आणि तो इसम ओरडलासुद्धा.’ झुंजार उत्साहाने म्हणाला.


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि