120 200
Download Bookhungama App

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रे व नियतकालिकातील लेखांचा अभ्यास - प्रकाश बंद्रे

Description:

अगदी अलीकडे दोन वर्षापूर्वी एका शाळेत १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणा म्हणून प्रस्तुत लेखक गेला असताना तेथल्या व्यवस्थापकांशी बोलताना प्रस्तुत लेखकाने म्हटले, ‘मला महात्मा गांधीजींपेक्षा डॉ. बाबासाहेब अधिक मोठे वाटतात’. चटकन व्यवस्थापकांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पहात, मला एक प्रकारे बजावले. ‘अरे असे काही मुलांसमोर बोलू नकास्वतःला पुरोगामी परिवर्तनवादी वगैरे वगैरे म्हणविणाऱ्या त्या गृहस्थांची ही मल्लीनाथी पाहून प्रस्तुत लेखक नेहमीच्या निष्कर्षाला अधिक घट्ट झाला. वरून दाखविले जात असले तरी अजूनही आमच्यात अस्पृश्यता ठासून भरली आहे. एवढेच की डॉ. बाबासाहेबांच्या पुण्याईने निदान राजकीय हक्कांमुळे त्याची स्पष्ट वाच्यता करता येत नाही. अस्पृश्यतेचा शेवट डॉ. बाबासाहेबांसारखा महामानव जेव्हा परत जन्माला येईल व परत चातुर्वर्ण्यजाती उच्चाटनाचा समूळ कार्यक्रम हाती घेईल तेव्हाच ह्या प्रश्नांचा शेवट होईल. अन्यथा सध्या उलट जातीजातींच्या भिंती अधिक घट्ट होत चालल्या आहेत. तो प्रवाह असाच वाहत राहणार.देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी प्रस्तुत लेखक पंधरा वर्षाचा होता. त्या वयापासूनच त्याला जातिभेदाबद्दल तिरस्कार वाटत आला आहे. आमच्या कामगार वस्तीच्या आसपास मुसलमानवाडा, महारवाडा, गवळीवाडा व आमची ब्राह्मणेतर वस्ती. दलित नसतांनाही एका कामगाराच्या मुलाची - प्रस्तुत लेखकाची जीवनपद्धती शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या जवळ जवळ दलितांसारखीच होती. त्यामुळे बाजूला असा महारवाडा वेगळा का असावा असा प्रश्न बालमनाला सतावीत असे. स्वातंत्र्य प्राप्ती म्हणजे जणू काय आकाशातून सुबत्तेचे गाठोडे पडणार आणि सर्व काही आपोआप आलबेल होणार ही त्या वेळच्या त्या पंधरा वर्षाच्या बालकाची भाबडी समजूत. इंग्रज गेले म्हणजे आता शाळेतून इंग्रजी विषयही जाणार हा दुसरा भाबडेपणा. परंतु एकंदर परिस्थितीत कोणताच फारसा काही फरक पुढे पुढे जाणवत नव्हता. स्वातंत्र्यानंतर जातीभेद नष्ट होणार होते. नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कानावर पडत होते. घटना शिल्पकार म्हणून २६ जानेवारी १९५० रोजी त्यांचा झालेला सन्मान वाचून, ऐकून आता निश्चित जातीभेद नष्ट होईल असे वाटे. पण हळूहळू चित्र उलटच दिसायला लागले. जातीभेद नाहीसे होणे दूरच राहिले; हिंदुत्ववाद्यांनी आपल्या चातुर्वर्ण्याची नखे आणखी तीक्ष्ण करून दाखवायला सुरुवात केली. महात्मा गांधींसारख्या महान आत्म्याचा अक्षरश: खून करण्यात आला. गावोगावी पेढे वाटण्याचा कार्यक्रम झाला.
हे सारे घडत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मात्र आपल्या अंगिकारलेल्या निर्णयावर ठाम राहून मोठ्या तयारीने बुद्ध धम्मात धर्मांतर करून हिंदू धर्माला धक्का देण्याची सर्वतोपरी तयारी करीत होते. हिंदू धर्मात राहून आपणास ह्या अस्पृश्यतारूपी विषाचे अमृत करता येणे शक्य नाही हे पूर्णपणे उमगल्यावर जवळ जवळ वीस वर्षांच्या चिंतनानंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या पाच लाख दीन - दलित - पीडित बांधवांना आपल्याबरोबर बुद्ध धम्माची दीक्षा देऊन न्याय मिळवून दिला.

पंचविशीतला प्रस्तुत लेखक सारं पहात होता. यात आपल्याला काही करायला मिळावे अशी सारखी मनोमन घालमेल करून घेत होता. पुढे त्याने नामांतर सत्याग्रहात भाग घेतला. .......


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि