80 150
Download Bookhungama App

सिनेमानुभव - Rekha Deshpande

Description:

जागतिक सिनेमावरील लेखांचे संकलन आता इ-बुक स्वरुपात.डिसेंबर २०१६. गोव्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भरणारा, ‘इफ्फी’ या सुटसुटीत नावानंच ओळखला जाणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला होता. पाहिलेल्या चित्रपटांची धुंदी मनावर होती. आणि ‘पुण्यनगरी’च्या पुणे ऑफिसमधून सुनील देशपांडे यांचा फोन आला, “पुण्यनगरीसाठी सदर लिहाल का?” 

“…?” 

 “मी हिंदी लोकप्रिय सिनेमावर लिहितोय. तुम्ही वेगळा विषय निवडा.”- तत्काळ त्यांनी स्पष्टच करून टाकलं. “जागतिक सिनेमावर लिहिते”, म्हणून टाकलं खरं, पण म्हणजे आता विषयाचं स्वरूप ठरवायचं. जबाबदारीचं ओझं! वर्षभराची बांधीलकी! म्हणजे काम! वाटलं, आत्ता इफ्फीमध्ये पाहिलेले बरेच चित्रपट आहेतच हाताशी. पण ते अधाशासारखे पाहिलेले.... अजून रवंथ बाकी आहे. ते नको. तरी नमुन्यादाखल एक लेख लिहून सुनील देशपांडेंना पाठवला, तो नुकत्याच पाहिलेल्या आंद्रे वायदा या पोलिश दिग्दर्शकाच्या ‘आफ्टरइमेज’ या अखेरच्या चित्रपटाच्या संबंधात. आंद्रे वायदांचं नुकतंच निधन झालं होतं. एकेकाळी कम्युनिस्ट राजवटीत पोलंडमधल्या कलावंताची - चित्रकाराची कशी मुस्कटदाबी होते त्याचं चित्रण होतं त्यात. आणि आता आपल्या देशातही झोंबरे राजकीय वारे वाहू लागलेले होते. या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर मला वायदांचा हा ‘आफ्टरइमेज’ महत्त्वाचा वाटत होता. मात्र ‘पुण्यनगरी’च्या वाचकवर्गाची नेमकी कल्पना मला नव्हती. सुनील देशपांडेंनीही “वाचकवर्गाची जागतिक सिनेमाशी फारशी ओळख नाहीय”, म्हणून इशारा दिला. तो इशारा म्हणजे कसोटीच होती. ‘आफ्टरइमेज’चा विचार बाजूला सारला. महोत्सवातल्या देशोदेशीच्या चित्रपटांवर लिहिताना मला गेली अनेक वर्षं एकप्रकारचं अपराधीपणही वाटायचं. आपण हे चित्रपट पाहतो, तसे सर्वांना काही ते पहायला मिळत नाहीत, मग आपण त्यांच्यावर लिहून त्यांना खिजवतो की काय? पण “असाही सिनेमा असतो”, “भारताबाहेरचा सिनेमा किती वेगळा आहे”, किंवा “आपल्याच देशातले इतर भाषांतले चित्रपट किती वेगळे आहेत हे माहीतच नव्हतं, ते लेखामुळे कळलं”, अशा अर्थाच्या वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या की दिलासा मिळायचा. आपण नवीन काही तरी त्यांना सांगितलंय तर, असं समाधान मिळायचं. तेव्हा आता आपल्याला जाणवलेलं आहे ते ते या वाचकांनाही सांगायचं आणि ‘पुण्यनगरी’च्या वाचकांनाही त्यांच्यात सामील करून घ्यायचं, असं ठरवलं. हे ठरता ठरता कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेले. त्या आठवड्यात काही लिखाण झालं नाही. पण महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘पुण्यनगरी’च्या संपादक राही भिडेंशी फोनवर बोलणं झालं. डेडलाइनच्या आत लेख मिळेल की नाही अशी काळजी त्यांना होती. ती अगदी साहजिक होती. डेस्कवरच्या माणसाचा तो ताण मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे त्यांना जरी आश्वस्त केलं तरी आता माझा ताण वाढत होता. आणि त्या ताणामुळेच मुंबईत परतल्या परतल्या सदराचा पहिला लेख लिहून झाला. 

इतकी वर्षं इतके वेगवेगळ्या प्रकारचे असे किती चित्रपट आपण पाहिले जे आपल्याबरोबर असल्याचं कायमच जाणवत आलंय. कोणत्या ना कोणत्या कारणानं, रोजच्या जगण्यातल्या, वाचण्यातल्या, पाहण्यातल्या एखाद्या अनुभवानं डिवचलं की मध्येच एखादा चित्रपट जागा होतो. कधी कधी एका चित्रपटामुळे दुसरा चित्रपट जागा होतो. एकच चित्रपट वेगवेगळ्या टप्प्यावर पुन्हा पुन्हा पाहताना वेगवेगळ्या गोष्टी नव्यानं जाणवू लागतात. जसजसा जगण्याचा अनुभव वाढतो, तसतसे नवे पैलू दिसायला लागतात. ‘अरे, हे मागे नव्हतं लक्षात आलं’ असं वाटतं आणि त्या चित्रपटाची मजा आणखी वाढते. कधी वास्तवात काही तरी घडतं आणि आपण हे अमुक चित्रपटात अनुभवलं होतं अशी ‘देजा वू’ भावना होते. देशकालाच्या मर्यादा ओलांडून किती वेगेवगळ्या प्रकारे सिनेमा आपल्याला भिडत असतो, आपल्याबरोबर असतो. ही जाणीव मनाच्या पृष्ठभागावर आली आणि वाटलं सिनेमाचा हा आणखी एक अनुभव - अगदी आवर्जून सांगण्यासारखा. सिनेमानुभवाचं आत्तापर्यंत दुसऱ्या पानाला चिकटून राहिल्यामुळे लपून राहिलेलं एक नवीनच पान उघडत होतं. देशोदेशीच्या चित्रपटांवरच्या सदराचं स्वरूप ठरलं होतं!... १ जानेवारीला पहिला लेख प्रसिद्ध झाला आणि मग दर दुसऱ्या आठवड्यासाठी वर्तमानातल्या अशा घटना, असे अनुभव कधी तरी पाहिलेल्या कोणत्या ना कोणत्या चित्रपटाची आठवण जागवायला लागले. ते चित्रपट पुन्हा नव्यानं पाहताना नवा अनुभव तर आलाच, जुना आणखी धारदार झाला. मग वाचकांना सांगायची निकडच भासू लागली. वाचकांच्या प्रतिसादानं आधी वाटत होती ती काळजीही मिटली आणि उत्साहानं वेगवेगळ्या चित्रपटांचा शोध घेत सुटले. वर्ष कसं संपलं कळलं नाही आणि ३१ डिसेंबर २०१७ च्या लेखानं सदराची सांगता झाली. मलाही या सदरानं सिनेमानुभव घेण्याची एक नवी दृष्टी मिळाली. यासाठी कारणीभूत झालेले माझे मित्र सुनील देशपांडे आणि ‘पुण्यनगरी’च्या संपादक राही भिडे यांचे आभार मानावे तितके थोडे. 

या लेखांचं संकलन व्हायला पाहिजे असं या सदराची वाचक असलेली मित्रमंडळी सुचवायला लागली. प्रकाशकाकडे पुस्तक किती रखडतं याचा अनुभव असल्यामुळे मी हा विचार फारसा गंभीरपणे घेतच नव्हते. आणि अचानकच अलूरमधल्या शेतातल्या फिल्मोत्सवात ‘बुकहंगामा’चे विक्रम भागवत यांची भेट झाली. त्यांच्या उत्साहामुळेच आल्या आल्या त्यांना लेख मेल करावे असं वाटलं. लेख वाचून त्यांनी प्रतिक्रिया दिली, “सिनेमा आपल्याला एक एनर्जी देत असतो. या लेखांतून ती एनर्जी जाणवतेय.” आणि त्यांनी ई-पुस्तक करायचं ठरवलं. प्रतिक्रिया एनर्जेटिक होती. या गोष्टी इतक्या वेगानं झाल्या की अजून माझं आश्चर्य ओसरलेलं नाही. त्यांच्यामुळेच हे संकलन सिद्ध होतंय. धन्यवाद विक्रम भागवत. आणि धन्यवाद अर्थातच माझ्याबरोबर सिनेमा ‘शेअर’ करणाऱ्या सगळ्यांना. 

 

रेखा देशपांडे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि