60.00 140.00
Download Bookhungama App

भावार्थ भक्ति - सूत्र - स्वामी श्रीकृष्ण भारती (पोंक्षे)

Description:

भावार्थ भक्ति - सूत्र

नारद भक्ति-सूत्राचा मागोवा घेत श्री स्वामी श्रीकृष्ण भारती यांनी त्याचे भक्तियुक्त चिंतनातूनभावार्थ भक्ति-सूत्रहे हृदयस्पर्शी काव्यात्मक विवरण केले आहे. ते वाचून मला अतिशय आनंद झाला. प्रस्तुत भक्ति-सूत्राद्वारे भावातीत भाव जो स्वभावतः शब्दातीत आहे, त्याला सोप्या शब्दात शब्दांकित केला आहे ही ईशकृपाच होय.

ही काव्यात्मक सूत्रे भक्ति-साधना करणाऱ्या साधकांना त्यांचे मनन चिंतन केल्यास भक्ति-साधनेत साधनपथदर्शिका म्हणून उपयुक्त ठरतील अशी मला निश्चित आशा वाटते. त्यांचा जास्तीत जास्त साधकांनी लाभ घ्यावा ही ईश चरणी प्रार्थना.प्रास्ताविक

भक्ति-सूत्र वाचण्याचा विषय नसून जगण्याचा - जागण्याचा विषय आहे. भक्ती म्हणजे प्रेमाचा खळखळता प्रवाह. भक्ती म्हणजे व्यक्ती-व्यक्तीतील प्रेम नव्हे तर व्यक्ती आणि समष्टी या दोघांमधले प्रेम आहे. भक्ति म्हणजे समग्राला आलिंगनाचे निमंत्रण आहे.

खरं तर भक्तीचे कुठले शास्त्र नाही, भक्ती एक यात्रा आहे, प्रवास आहे. भक्तीचा कुठला सिद्धांतही नाही. भक्ती आहे जीवनरस. म्हणून भक्तीमधे जे डुंबून जातात त्यानाच खरे भक्तीचे रहस्य कळते - हाती येते.

म्हणूनच भक्ती नेहमीच गात असते, नाचत असते. भक्ती म्हणूनच शब्दांपेक्षा स्वरांना आपंगते. भक्ती शब्दांमध्ये बांधलेले शास्त्र नाही. सिद्धांतही नाही. भक्ती आहे जीवन सत्य. म्हणून तुम्हाला जेव्हा एखादा भक्त भेटेल तेव्हाच तुम्ही तिला वाचू शकाल. त्याच्या गीत गायनातून. त्याच्या स्वतःला हरवलेल्या अवस्थेतून. भक्तीला भक्ताच्या व्यवसायातून पाहू नका, व्यवहारातून पहा.

प्रेमाच्या माध्यमातून मनुष्याला ईश्वराशी जोडण्याचे विज्ञान म्हणजे भक्ती आहे. हाच मानवाला ईश्वरसन्मुख करण्याचा एकमेव सुगम मार्ग आहे. या करताच साऱ्या संत-महतांनी, ऋषी-मुनींनी एकमताने तिचे माहात्म्य गायिले आहे.

देवर्षी नारदांची ही सूत्रे म्हणूनच प्रत्येकाने अभ्यासली पाहिजेत. पचविली पाहिजेत. रुजविली पाहिजेत. जगविली पाहिजेत, जागविली पाहिजेत. तरच अशाश्वत आणि अशांत जगात शांति-सुख लाभण्याची शक्यता आहे.

जे शांत जाहले चित्त। ते परमानंदा प्राप्त।

तो सत्-चित्घन आनंद। मग हृदयी हो साक्षात्।।

या ग्रंथ प्रकाशनाचे कामी ज्या ज्या सुहृदांचे मला अनमोल साहाय्य झाले त्या सर्वांचा मी कायमचा ऋणी आहे.

- स्वामी श्रीकृष्ण भारती


Format: Adaptive

Publisher: श्रुतीगंध (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)