65.00
Download Bookhungama App

अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा - चंद्रकांत काकोडकर

Description:

अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा - अरेबियन नाईट्समधील कथा आता इ-बुक स्वरुपात. अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा

चीन देशातल्या एका शहरामध्ये एक शिंपी राहात होता. तो फार गरीब होता. कपडे शिवून जे काय पैसे मिळत त्यावर तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे. त्याला एक मुलगा होता. त्याचं नाव अल्लाउद्दीन. तो लहानपणापासून उनाड होता. दिवसभर तो उनाडक्या करीत फिरत असे. शाळेत पाठविला तर शाळेत जात नसे. काही काम सांगितलं तर करीत नसे. थोडक्यात म्हणजे तो आळशी व कुचकामी होता.

त्याच्या वयाला दहा वर्षे पूर्ण झाली तरी तो उनाडक्या करीत गावभर फिरत असे. तेव्हा त्याच्या बापाला वाटलं की, मुलाला आता आपला धंदा तरी शिकवावा म्हणून त्याने अल्लाउद्दीनला आपल्याबरोबर घेतले. दंगामस्ती करण्याची सवय जडल्यामुळं त्याचं कामाकडे जराही लक्ष लागेना. बाप देणेकऱ्यांना भेटायला गेला की, तो तात्काळ दुकानातून पोबारा करीत असे आणि आळीतल्या उनाड, भिकारी पोरांबरोबर खेळत असे. नेहमी तो असाच वागत असे. त्याला कितीही मार दिला तरी तो ऐकत नसे. त्याच्या आईनं आणि बापानं त्याला नाना तऱ्हेनं समजावलं, प्रेमानं त्याची समजूत घालण्याचा प्रयत्नकेला. प्रेमानं सांगून ऐकत नाही म्हणून त्याला रागं भरून पाहिलं. त्याला उपाशी ठेवलं, मारहाण केली. परंतु त्याच्या वर्तनात काडीचीही सुधारणा झाली नाही. मुलाचं हे वागणं पाहून शिंपी अतिशय दुःखी बनला. मुलाच्या दुर्वर्तनामुळे त्याला अन्नपाणीही गोड लागेना. त्यामुळं तो आजारी पडला आणि शेवटी अल्लाघरी गेला.

परंतु अल्लाउद्दीनला मुळीच दुःख झालं नाही. तो आपल्या दुर्वर्तनातच दंग राहिला. आपला नवरा मेलेला आहे आणि मुलगा उनाड आहे आणि कुचकामी आहे, असं जेव्हा त्याच्या आईनं पाहिलं तेव्हा तिनं दुकान आणि आतली सर्व चीजवस्तू विकून टाकली. ती स्वतः सूत कातून आणि इतर कष्ट करून स्वतःसाठी आणि मुलासाठी मीठभाकरी मिळवू लागली. परंतु अल्लाउद्दीनला आपल्या आईला त्रास पडतो ह्याची मुळीच दया आली नाही. त्याला त्याबद्दल वाईटही वाटलं नाही. उलट बापाच्या कचाट्यातून सुटल्यामुळं तो जास्तच शेफारून गेला. त्याचा आळशीपणा वाढला. त्याला बऱ्याच घाणेरड्या सवयी जडल्या. जेवणाच्या वेळेशिवाय तो कधी घरात सापडायचा नाही. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत त्याचं असंच चालंल होतं. त्याची आई मात्र अतिशय काबाडकष्ट करून त्याचं आणि स्वतःचं पोट भरीत होती.

एके दिवशी अल्लाउद्दीन आपल्या मोहल्ल्यात उनाड सवंगड्यांबरोबर खेळण्यात दंग झाला होता. इतक्यात पश्चिमात्य देशांतील म्याग्रीन या ठिकाणचा एक दरवेशी त्या ठिकाणी आला. त्या मुलांकडे पाहता पाहता त्याचं लक्ष अल्लाउद्दीनकडे गेलं. त्याबरोबर तो त्याच्याकडे अगदी एकाग्रतेनं पाहू लागला. बाकीच्या मुलांकडे त्यानं पूर्ण दुर्लक्ष केलं.


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)